अरसिक
- ना.रा.खराद
या जगात अनेक प्रकारच्या कला आहेत, कलाकार आहेत आणि त्यांचे रसिक आहेत.
रसिकांच्या रसास्वादामुळे या कला फोफावत आहेत, कलाकारांना मानसन्मान मिळतो आणि उपजिविका चालते.
मनुष्य हा कलाप्रेमी आहे,त्यास मनोरंजन हवेत असते.तो विविध कलेचा आस्वाद घेतो आणि स्वतः एखाद्या कलेत निपुण असतो.संगीत , साहित्य कलेचे यश बघता हे लक्षात येते की या क्षेत्रातील रसिक अधिक आहेत.नृत्य,चित्र,शिल्प अशा कितीतरी कलेने जगाला अक्षरशः खिळवून ठेवले आहे.
संगीत हे तर मानवी मनाचा प्रमुख खुराक आहे.
करोडो लोक संगीताचा आस्वाद घेतात.कर्णमधुर संगीत कानावर पडत असते.संगीत काहींचे जीवन बनले आहे तर काहींनी संगीताने जीवन बनवले आहे.संगीत हा खूप लोकप्रिय प्रकार आहे.कुठल्याही प्रसंगी संगीत वापरले जाते.भजन ,आरती, भारुड,लावणी, गौळण अशा कितीतरी प्रकारात संगीताचे साम्राज्य पसरलेले आहे. संगीत हे मानवी मनाचे स्पंदन आहे.तरल भावनांचा आविष्कार आहे.जे शब्दांच्या पलीकडले आहे,ते संगीतबद्ध करता येते.भावनांचा विकास संगीतामुळे होते.संवेनशील मनाला संगीत दिलासा देते.
साहित्य क्षेत्र तर अफाट आणि अचाट आहे.प्राचीन काळापासून तर आजतागायत हजारों ग्रंथ साहित्यीक आणि विचारवंतानी लिहिली आहेत.कोट्यावधी वाचक त्यांचे अर्थ ग्रहण आणि रसग्रहण करत आहेत.साहित्याच्या विविध प्रकारात विविध भाषांमध्ये ग्रंथ उपलब्ध आहेत.बुद्धीचा विकास आणि मशागत या ग्रंथामुळे होत आहे .प्रगल्भता आणि विवेक वाढीस लागतो.मानवी जीवनाचे सार समजून घेता येते आणि चिंतनशीलता वाढीस लागते.कथा, काव्य,नाटक, तत्वज्ञान अशा कितीतरी प्रकारात हे साहित्य उपलब्ध आहे.चोखंदळ वाचक अचूक ज्ञान प्राप्त करून घेतात.
मानवी जीवन अशा विविध कलेमुळे अर्थपूर्ण व रंजक बनले आहे.जीवनाचा आनंद या कलेमुळे मिळतो.जीवन समृद्ध होते.परंतु अरसिक लोकांना वरील सर्व कलांचे वावडे असते.त्यांना कोणत्याही कलेचे मोल नसते.संवेदना नसते.कला आणि कलाकार ह्यांचे मोल त्यांना नसते.अरसिक हा निराश अवस्थेत असतो.कशानेही तो आनंदीत होत नाही.जनावरा प्रमाणे फक्त खायचे आणि झोपायचे एवढेच तो करतो.