- ना.रा.खराद
मला हा प्रश्न कायम सतावतो की, मोक्याच्या वेळी विचारवंत मूग गिळून का बसतात? एरवी भाषणे झोडणारी ही मंडळी सामाजिक प्रश्नांवर लोकांसमोर येऊन का बोलत नाही,चुकणाऱ्या लोकांची कान उघडणी का करत नाही?
आज समाज पुर्णपणे सत्ताधारी लोकांच्या हातात गेला आहे, सत्तेतील लोक मस्तवाल होऊन वाटेल तसे वागत आहेत,मग अशा वेळी त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण नको का? लेखनीतून उतरणारी मिजास दिसायला नको का? लेखनी जेव्हा पोट भरायचे साधन बनते, तेव्हा ती बटीक झालेली असते.शब्द हे शस्त्र आहे,असे विचार मांडणारे, आपल्या शब्दांना बोथट का बनवत आहेत?
मस्तवाल सत्ताधाऱ्यांना विचारवंत तर खुपणारच यामध्ये नवल नाही, म्हणून का शेपूट घालून बसायचे? आणि जर तसे करावयाचे असेल तर कशाला लेखणी उगळीत बसता, हारतुरे आणि शाली घेता?
हा देश विचारवंतांनी घडवलेला आहे आणि विचारवंतांची अवहेलना संपूर्ण मानवजातीची अवहेलना आहे.जर विचारवंतांनी समाजाकडे पाठ फिरवली तर समाजाचा वाली कोण राहणार? हजारों संत,महात्मे,लेखक,वक्ते, विचारवंत यांनी समाजमन घडवले आहे, विचारवंतांची समाजाला कायम गरज आहे.परंतू
ताटाखालचे विचारवंत कधीच समाजप्रबोधन करु शकत नाही.आज समाजाला झनझनीत अंजन घालणारे विचारवंत हवे आहे.पुस्तके प्रकाशित करुन चार पैसे व पुरस्कार मिळवणारे मिळमिळते
नकोत.
आपल्या चिंतनशील बुद्धीतून निघालेले मानवहीत साधणारे विचार हा सामाजिक ठेवा आहे.तो एकाच्या डोक्यातून निघत असला तरी त्याची बाजारपेठ हा समाज आहे , परंतु जेव्हा आवश्यकता आहे, तेव्हाच विचारांचा तुटवडा जाणवत आहे.निर्भयता हा विचारवंताचा पहिला गुण आहे,आज तो दिसून येत नाही.
विचारवंत जो कुणी असेल आणि जिथे कुठे असेल त्याने गप्प बसता कामा नये.कितीही दडपशाही केली तरी बाणेदारपणे उभे राहिले पाहिजे, परिणामाची पर्वा विचारवंतांना असता कामा नये.
विचारवंत गप्प बसले तर मूर्खांची बडबड वाढते.कावळ्यांनी मिळून आवाज करुन कोकिळेला गप्प बसवावे तसा हा प्रकार आहे.
वेगवेगळ्या तऱ्हेचे विचारवंतांना गप्प केले जाते.कधी त्याचा सन्मान करुन तर कधी धमकावले जाते.कधी आमिष दाखवून.या गोष्टीला बळी पडून विचारांचा बळी देणे विघातक आहे.ज्या विचारांचा आपण प्रसार करत आहोत,तो रुजवणे हे त्याचे यश आहे.
आज समाजाला परखड विचार मांडणारे विचारवंत हवे आहेत.निर्भयपणे सत्ताधाऱ्यांना वेसन घालणारे व त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचारवंत हवे आहेत.