प्रिय विद्यार्थी रमेश,

प्रिय विद्यार्थी रमेश,


आज दहावीचा निकाल घोषित झाला.
तू नापास झाल्याचे कळाले.
तसे ते अपेक्षितच होते
तुझा वर्गशिक्षक असल्याने 
मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे
तू अधूनमधून शाळेत गैरहजर रहायचा ,
त्याची कारणे कळाली तेव्हा,
तुझा मला अभिमानच वाटू लागला
तू सुटीच्या दिवशी, 
लोकांच्या शेतात काम करायला जायचा 
हे मला ठाऊक होते
शाळेचा गणवेश तू मजूरीच्या पैशावर 
खरेदी केल्याचे मला तुझ्या मित्रांनी सांगितले होते
एकदा प्रार्थनेसाठी तू उभा असतांना 
भोवळ येऊन कोसळला होता,
 त्यावेळी तू मला त्याचे कारण सांगितले होते
तू त्यादिवशी उपाशी होता तरीही,'
जगाला प्रेम अर्पावे 'हि प्रार्थना मनोभावे म्हणत होतास
तुला एकदा पैशाची पिशवी सापडली होती
ती तू माझ्याकडे आणून दिली होती
तुझा तो प्रामाणिकपणा मी अजून विसरलो नाही.
वर्गात एकदा एक मुलगा बेंच लागून
जखमी झाला होता
तू तात्काळ त्यास दवाखान्यात घेऊन गेला होतास ,तुझ्यामधली माणूसकी मला
 त्यावेळी दिसून आली होती.
विहिरीत बुडणाऱ्या एका बालकाला तू
वाचवले होते तेव्हाच 
तुझ्या शौर्याची चुनूक मला दिसली होती.
तू रेखाटलेले चित्र
मी घराच्या भिंतीवर लावले ,
बघणारे खुपचं कौतुक करत असतात त्या चित्राचे ,
हे तुला सांगण्याचे राहूनच गेले होते.
एकदा मी आजारी असतांना दवाखान्यात
मित्रांसोबत भेटायला आला होतास,
तेही रिकाम्या हाताने नाही.
हे का मी कधी विसरु शकतो 
तुझे वकृत्व खुप छान असल्याचे
तू अनेकवेळा दाखवून दिले आहे
मागच्या वर्षी तू शाळेला मिळवून
दिलेली ढाल मोठ्या दिमाखात
शाळेच्या शोकेसमध्ये चमकते आहे
कबड्डी हा तर तुझा आवडता खेळ
संघात तू असला की विजय निश्र्चितच
तू गाणे गातो हे कुणालाच ठाऊक नव्हते
पण स्वातंत्र्यदिनी तू गायलेले
'कर चले हम फिदा ' हे गाणे ऐकून
सर्वांचे डोळे पाणावले होते
अभ्यासात कच्चा असतांनाही
सर्व शिक्षकांचा तू लाडका होता
तुझ्यामधले गुण बघता 
तुच खरा गुणवान आहेस
तुझे गुण परीक्षेतून मोजता येण्यासारखे नाहीत, 
त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव हवा
जो आम्हाला आहे
माझ्या नजरेत तू शाळेतील
सर्वांत गुणवान विद्यार्थी आहेस
भले तू नापास झाला असेल
जीवनाच्या परीक्षेत तु केव्हाच
पास झालेला आहेस
तु खरा 'गुण' वंत आहेस
मी तुझा वर्गशिक्षक होतो
याचा मला अभिमान आहे
तुला मिळालेल्या गुणांपेक्षा
तुझ्यामध्ये असलेले गुण
मला महत्त्वाचे वाटतात
तु सदैव यशस्वीच आहे
त्यासाठी तुला कागदावर
मिळालेल्या गुणांची गरज 
नाही.
                       तुझा वर्गशिक्षक
                         ना.रा.खराद
                        मत्स्योदरी विद्यालय,अंबड
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.