कुणाच्या संकल्पनेतून जन्माला आला की गरजेतून पण विलक्षण असा तो आठवडी बाजार.
पंचक्रोशीतील लोकांनी गजबजलेला .विक्रेते आणि ग्राहक यांचा गोपाळकालाच तो.जिकडे तिकडे लगबग, आरडाओरड,धावपळ.किरकोळ वाद.
बालके, बाया बापडे यांचा संगमच.आठवडाभर राबून मिळालेल्या पैशांवर गरजेच्या वस्तू खरेदी करतांना मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.फुटलेला आरसा बदलला की पोरगी पुन्हा पुन्हा त्यात बघून गालात हसते.आम्ही नवा आरसा आणला म्हणून लेकरू गल्लीत सांगते.सुखाची व्याख्या इथे कळते.
बाजारात रस्त्यावर विकणाऱ्या वस्तू. गरीबांना खुणावत असतात. आपल्याला परवडणारे आहे ,खरेदी करततात.स्वतः च्या कष्टाच्या पैशाने,परवडणारी वस्तू खरेदी करायची यापेक्षा प्रामाणिकता काय असू शकते.
भाजीपाला विक्रेते आपल्या मालाची जाहिरात करतात. फार गंमतीशीर विधाने करतात. कानावर पडणारे हे विविध स्वर एक लय निर्माण करतात आणि बाजारातला वेळ कसा जातो कळतच नाही.
आवडीची फळे,भाजी दिसली की कसा आनंद होतो.आपल्या लेकरांना अमूक आवडते ,घेतले पाहिजे. हा विचार किती पवित्र.
बाजारात शहरातील शिक्षित लोकही असतात. ,साहेब, सर,सेठ असले बिरुदवाले.
फार चोखंदळपणे भाजीपाला खरेदी करतात.
इतरत्र सतत फसवला जाणारा मात्र भाजीमध्ये दोन रुपये वाचवले असे गर्वाने बायकोला सांगणारा ग्राहक.बायको मात्र एखादी खोट काढून त्याचे गर्वहरण करते.
बाजारात दलाल मोठ्या प्रमाणात असतात. हा नफ्याचा व्यवसाय आहे. इतर क्षेत्राप्रमाणे इथेही तो यशस्वी होतो.फक्त मध्यस्थी.
गर्दी म्हंटले की चोरांची सुगी.मोबाईल, रोख रक्कम किंवा वस्तू चोरीस जातात.त्यामुळे सावधपणे वावरावे लागते. काही बदमाश धमकी देवून आपले पोट भरतात.भांडण उकरून काढतात. एखादी वेधक नारी अगदी
अलगदपणे भाजी खरेदी करते.पाहिजे त्या दरात ती मिळते.इतर ग्राहक कुतूहलाने बघतात.सौदर्यांचे महत्त्व त्यांना कळते.
बाजारात काही किन्नरही असतात. आपले
सावज शोधतात. काही यशस्वी होतात.भिकारीही नशीब आजमावतात.सहजपणे पोट भरतात. मालकाकडून पैसे मिळाले नाही म्हणुन रिकाम्या हाताने गावी परतणारेही असतात. तर बाजारचे पैसे दारूमध्ये खर्च करून. झिंगत पडलेलेही असतात. डोळ्यांवर काळा
चष्मा चढवून ,अरे ती बघ माझी...म्हणणारे मजनूही असतात.
बाजार हे प्रेक्षणीय स्थळ आहे. माणसांचा तो मेळा आहे. याचा आनंद मिळवला पाहिजे.
. - ना.रा.खराद