- ना.रा.खराद
सकाळची वेळ होती,बाया अंगणात झाडझूड करत होत्या, अत्यंत काटेकोरपणे त्या आपलेच अंगण झाडून घेत होत्या.मनात सहज विचार आला की झाडू
थोडा शेजारच्या अंगणात जर चालवला तर
काही डोंगर कोसळेल का? शेजारी अंगावर धावून येईल का, की तुमचे अंगण का स्वच्छ केले? हद्द खरेच कशाला असते.चांगले करण्यासाठी हद्द असते का? तसे असेल तर मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारे महापुरुष, समाजसेवक यांना ही हद्द कळत नव्हती? का आपण इतके संकुचित झालो आहोत? पाऊस पडतो तेंव्हा हद्द बघत नाही,हवा वाहते तेव्हा ती हद्द बघत नाही.मग या इतक्या भिंती, इतक्या सीमा कशासाठी?
राजकीय पुढारी तर आपल्या मतदारसंघाबाहेरचा विचार करत नाही, मंत्री असले तरी मतदारसंघाचे संकुचित डबके ते सोडत नाही.आपले वर्तुळ आपण मोठे केले पाहिजे.रस्त्याच्या कडेला कुणी तडफडत असला तरी त्याची मदत जर त्याचा मतदारसंघ बघून करत असाल तर हा मनाचा कोतेपणा आहे. स्वार्थासाठी , मतदानासाठी केली जाणारी लोकसेवा,लोकसेवेचा फक्त फार्स आहे.त्यामध्ये कुठलीही हार्दिक भावना नसते.
पोलिस तर अगोदर हद्द बघतात.तमूक पोलिस स्टेशनला जा, हे आमच्या हद्दीत नाही.असे हजारों प्रसंग, घटना वाचायला मिळतात की पोलिस उपलब्ध असतात, परंतु हद्द आमची नाही म्हणून मदत मिळत नाही.
सरकारी दवाखान्यात एखादे अत्यंत गंभीर पेशंट येते, अशावेळी तातडीची मदत हवी असते, परंतु,' आमची ड्यूटी संपली , आम्ही आपली मदत करु शकत नाही.' एखाद्याचे आयुष्य संपून जाते, परंतु ड्यूटी संपली खल्लास! कुणाचे भले करण्यासाठी,जीव
वाचविण्यासाठी हद्द बघितली जावी ,इतकी
मानवजात रसातळाला जाईल असे कधी वाटले नव्हते.
शाळांमध्ये शिक्षक इतर वर्गातील विद्यार्थी आपली तक्रार घेऊन आला तर,' तु वर्गशिक्षकाकडे जा.' अशी तंबी दिली जाते.
बैंकेत धावतपळत गेलो, दोन मिनिटे उशिराने पोहचलो तर वेळ संपली म्हणून परत फिरावे लागते.सुरु करण्याची वेळ मात्र पाळली जात नाही.येथे हद्द संपते.
रिकामी बस असते, रस्त्यावर अनेक ठिकाणी प्रवासी ताडकळत ज्यामध्ये बाया, लहान सहान मुले ,वृद्ध व्यक्ती असते, परंतु गाडी थांबत नाही,कारण ती सुपर गाडी आहे.
अरे,लोकांची मदत करण्यासाठी,त्यांचे
भले करण्यासाठी हद्द आणि नियम दाखवता,मग त्यांची लूट करताना ती हद्द का सोडता? कुठल्या नियमात राहून लुबाडणूक करता?
हद्द वाईट कृत्य करु नये, यासाठी असावी , कुणाचे भले करण्यासाठी कुठे हद्द असते?
माझ्या हद्दीत नाही, ते माझे काम नाही,माझी वेळ संपली, अशी वल्गना काय कामाची? विश्वाचे कल्याण व्हावे म्हणून अहोरात्र झटणाऱ्या मानवांना आपण का विसरतो.आयुष्याची राखरांगोळी करुन देशासाठी प्राण देणाऱ्या देशभक्तांनी आपणास कोणता विचार दिला?
महापुरुषांचा उदोउदो करणारे आपण लोक इतके खुजे कसे झालो आहोत?
हद्दीच्या बाहेर जाऊन चांगले आणि मोठे काम करता आले पाहिजे.विचार आणि मानवतेला हद्द नसते.अखिल मानवजात त्याची हद्द असते.चला तर आकाशाला गवसणी घालूया,
समुद्राच्या लाटा सारखे उसळुया, वायुसम
सुसाट होऊया.ब्रम्हांडाचे पाईक होऊया!