एक शिक्षक म्हणून....

        एक शिक्षक म्हणून....



    विद्यार्थी असतांना माझ्या मनावर शिक्षकांचा फार पगडा होता.मित्रांमध्ये देखील बहुदा शिक्षक किंवा सर हाच गप्पांचा विषय असायचा.आजही जूने मित्र भेटले की शिक्षकांच्या आठवणी निघतात.प्रत्येक विद्यार्थ्यांवर कुणा तरी शिक्षकांचे गारुड होते आणि ते आजही कायम आहे. शिक्षक वरवर वाटतो तितका साधा नसतो.शिक्षकांचे कार्य लोकांना वाटते तितके सोपे नसते.
प्रचंड विद्यार्थी संख्या असलेल्या 🏫 शाळेत गेली पंचवीस वर्षे मी अध्यापन कार्य करतो.त्या अनुभवातून मी समाजाला सांगू इच्छितो , शिक्षकांना कमी लेखू नका.'
लोकांना शिक्षकांचा राग नसून त्यांना मिळणारा पगार डोळ्यात खुपतो.लोकांना असे वाटते की ,"शिक्षकांना काही काम नसते किंवा काम कमी किंवा सोपे आहे व
तुलनेने पगार जास्त आहे." हा समज धांदात खोटा आहे. शिक्षकांना किती काम असते आणि ते किती कसरतीचे असते हे शिक्षक असल्याशिवाय कळणार नाही.
आजच्या स्थितीत तर शिक्षकांचे काम अधिकच कठीण झाले आहे.अगोदरचे शिक्षण आणि शिक्षक याविषयी समाज बोलतो परंतु फक्त शिक्षकच बदलला असे वाटते का? 
लोकांना करोडोंचा भ्रष्टाचार करणारे नेते दिसत नाहीत, पैशाशिवाय काम न करणारे अधिकारी दिसत नाहीत.गुंडेगिरी करणारे गुंड दिसत नाहीत,भेसळ करणारे दिसत नाही, तस्कर दिसत नाही.महसूल मधला सावळागोंधळ दिसत नाही.त्यांना दिसतो फक्त शिक्षक.
   आपल्या कामासाठी चिरीमिरी देऊन उलट साहेब म्हणून मागे मागे फिरणारे लोक शिक्षकांना मात्र कमी लेखतात.कारण शिक्षक जे कार्य करतो ते आर्थिक नाही.लोकांना तात्काळ आणि सरळ फायदा कळतो.त्यांना वाटते शिक्षक शाळेत नुसती वटवट करतो.पुस्तकामध्ये आहे ते शिकवतो.
बरे शिक्षकांना नावे कोण ठेवतो ?जे लोक शिक्षणामध्ये'ढ' होते ते किंवा अपयशी ठरले ते.शिक्षणात अपयश आले की ओघाने शिक्षकांना नाव ठेवण्याची प्रवृत्ती वाढते.
शिक्षणाचे महत्त्व मान्य करायचे परंतु शिक्षकांचे नाही म्हणजे एस.टी. बसचे महत्व मान्य करायचे परंतु चालकांचे नाही.
इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत शिक्षक संख्या जास्त आहे.शिक्षक लोकांमध्ये मिसळतात.हजारों विद्यार्थी त्यांच्या ओळखीचे असतात.वस्ती तांड्यावर देखील शाळा असतात.शिक्षकाचे कार्य सोपे समजण्याची चूक समाजाने करु नये.जन्माबरोबरच हातात मोबाईल असणारे विद्यार्थी , घरामध्ये अवैध मार्गाने मिळवलेला पैसा, चंगळवादी समाज , खालावलेली शारिरीक क्षमता, विस्कटलेली मानसिकता, विसंवाद अशा अनेक जोखडात अडकलेला विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो तेव्हा त्याची योग्य जडणघडण करणे किती मोठे आव्हान असते हे शिक्षकांनाच ठाऊक असते.
    शिक्षणातून यश मिळवलेले विद्यार्थी शिक्षकांसमोर नतमस्तक होतात मात्र अयशस्वी विद्यार्थी शिक्षकांवर‌ त्याच्या अपयशाचे खापर फोडतो.
महसूल आणि पोलिस खात्यात कितीतरी घोटाळे उघड झालेले आहेत.अनेक व्यापारी , उद्योगपती यांचे काळे कारस्थाने जगासमोर आहेत.मात्र जिथे ज्ञानदानाचे, नीतीचे,न्यायाचे,सत्याचे , जडणघडणीचे कार्य चालते त्या
शिक्षकांविषयी कंड्या पसरवायच्या आणि त्यांच्या वाढलेल्या पगारांविषयी असूया बाळगायची हा धूर्तपणा झाकला जात नाही.
       शिक्षक तरी कोण असतात.तुमच्या आमच्या कुटुंबातील शेतकऱ्यांची, कष्टकरी समाजातील मुले , ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले, काबाडकष्ट करून हलाखीची परिस्थिती सोसली.बिनपगारी,अर्धपगारी अध्यापन केले
    आज तो सुखाचे दोन घास खाऊ लागला तर अनेकांचे पोट दुखवू लागले.महाराज लोक किर्तनातून, संपादक आपल्या अग्रलेखातून,पारावरच्या गप्पांतून शिक्षकांचे वाभाडे काढू लागले.पण लक्षात असू द्या,जो पर्यंत शिक्षक प्रामाणिक आहे तोपर्यंतच हा समाज टिकणार आहे.सगळे बिघडले असतांना शिक्षक अजून प्रामाणिक आहे.त्याची समाजाने
परीक्षा घेऊ नये.गुरुजनांचा आदर शिकवणारी संस्कृती अचानक इतकी घसरली आहे कुण्या सोम्यागोम्यांनी टीका करावी, निंदा करावी?
शिक्षकांचा उपमर्द, अवहेलना थांबणे गरजेचे आहे.करोडो विद्यार्थ्यांना श्रद्धास्थानी असलेले शिक्षक केवळ त्यांना चांगला पगार मिळतो म्हणून टिकेचे विषय बनवावे ही असूया सोडली पाहिजे.
    एकीकडे मोठमोठे अधिकारी आपल्या शिक्षकांसमोर नतमस्तक होत असतांना, आपल्या शिक्षकांविषयी आदर बाळगत असतांना कुणीतरी फडतूसाने शिक्षकांविषयी गरळ ओकायची हे का खपवून घ्यायचे.
शिक्षक हा गरीब,नेभळट, सज्जन ,भित्रा , विनम्र असाच रंगवलेला आहे.आता काळ बदललेला आहे.आता तो उच्चशिक्षित, आर्थिक समृद्ध ,एकजूट,धाडसी आणि संख्येने मोठा वर्ग आहे.अकारण छेडला गेला तर सर्व  तऱ्हेचे उत्तर तो देऊ शकतो.
                                - ना.रा.खराद
        
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.