- ना.रा.खराद
माझे जीवन म्हणजे दुःखाचा डोंगर आहे.माझ्या वाट्याला फक्त दुःखच आले आहे.वयाच्या पन्नाशीनंतर देखील ते कमी न होता वाढतच चालले आहे.प्रारब्ध वगैरे असे काही असते,यावर माझा विश्वास वाढत चालला आहे.एक दोन वर्षे वय असताना आईचा मृत्यू झाला, पुढे सावत्र आईने सांभाळ केला, परंतु अधुनमधून तीही खुप विखारी बोलायची.तीची तरी काय चूक,सवतीच्या तीन मुलांना सांभाळणे सोपे नसते.
कसेबसे बी.एड.झाले.नोकरी मिळाली, आर्डर नाही, पगार नाही,लग्न झालेले.मुलाखतीसाठी जायचे,जवळ बसभाडे नाही, बायकोची अंगठी मोडली आणि जालना गाठले.गावातील एका भांडणात मला जाणीवपूर्वक गोवल्या गेले,मी भांडण सोडवत होतो, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, मारहाण करण्यात आली,हथकडी घालून मला न्यायालयात पायी नेण्यात आले.एम.ए.बी.एड शिक्षण असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीचा अतोनात छळ करण्यात आला.गावच्या राजकारणात खोट्या केसेस दाखल करण्यात येऊ लागल्या.माझ्यावर गुन्हा दाखल असताना मी नोकरी करत होतो.जमीन, गुरेढोरे, घरदार सर्व विकले गेले होते, त्यामध्येच मोठा भाऊ आजारी पडला आणि त्यामध्येच मृत्यू ओढवला, वडील भावाचे निधन आणि निर्धन याच्या कचाट्यात कुटुंब सापडले, खुप हाल होऊ लागले.
भावाच्या पाच मुली लग्नाच्या वयात येऊ लागल्या होत्या, संपत्ती तर मुळीच नव्हती.माझी पत्नी आईवडील नसलेली,तीही बिचारी . विवाहानंतर पहिल्याच वटपौर्णिमेला मला पोलिसांनी ताब्यात घेतले,कस्टडी काढली.जे थोडेसे दागिने लग्नात होते,ते
तीने मला सोडवण्यासाठी दिले.इतके कमी होते की काय वडीलांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांनी कायमचे अंथरुन धरले.
अशा गरीबीमध्ये पत्नी आजारी पडली.तीला दवाखान्यात घेऊन गेलो, एकटाच होतो.तिच्या जवळ अगतिक होऊन रडत होतो, शेजारी एक मुस्लिम स्री होती, तिने विचारले," साथ में कोई नहीं है क्या?" मी फक्त रडत होतो. त्या मुस्लिम स्रीने म्हंटले",सब ठीक होगा,अल्लाह पर भरोसा करो." त्या शब्दांनी मला धीर दिला.शस्रक्रिया झाली.अठराशे रुपये बील झाले.मला तीन महिन्यांचा अठराशे पगार मिळाला होता,तो खुप उपयोगी पडला.
लग्नाची पंधरा महिने उलटली, पत्नीने मुलाला जन्म दिला.इकडे भावाच्या पाच मुली लग्नाच्या.वडील कायमचे अंथरुनावर, जमीन,घर नाही.पगार नाही.कुणाची मदत नाही.खोट्या केसेसचा ससेमिरा वेगळाच!
उपासमार होऊ लागली, कित्येकदा मुलाच्या गळ्यातील सोन्याचे ओम वगैरे मी गुपचुप विकले आणि त्या पैशातून तिखट मीठ आणले आहे.
माझी कुणाविषयी तक्रार नाही.मी कुणालाही दोषी मानत नाही.माझ्या वाट्याला जे आले ते मी माझे प्रारब्ध समजतो.वरील घटना माझ्यासाठी दुःख नाही तर केवळ संघर्ष होत्या.आजही मी कुणी मोठा माणूस नाही, परंतु कालच्या पेक्षा आज माझा बरा आहे.
ह्याला जीवन ऐसे नाव 🙏