हरिणी गाय (कथा).
आठवडी बाजारचा दिवस.हरिणी गाय बाजारात विकायला जाणार होती.शिरपाच्या कानावर भावाचे आणि बा चे शब्द पडले होते. शिरपा दचकला ,आपली हरिणी गाय विकणार! त्याचे संवेदनशील मन हळहळले तो ढसाढसा रडू लागला.बा बाहेर गेल्यावर आईकडे विचारणा करु लागला.'आई नको ना गं विकू आपल्या हरिणीला' हुंदका आवरत माय म्हणाली,पोरा मग खाणार काय,जवळ दमडी नाही, तुहा बा तिळ तिळ तुटतोय.त्यांचा डोळ्याला डोळा नाही. लई वंगाळ वाटतयं.हरिणी म्हंजं आपल्या गाईचं लेकरु,लहानचं मोठं आपल्या दावनीला झालं आणि असं बाजारात जाणार ,काळीज तुटतयं शिरपा!'
दिवस उजाडला तसा शिरपाचा मोठा भाऊ तयार झाला.हरिणीला चाहूल लागल्यासारखी
ती अस्वस्थ वाटू लागली.चारा पाण्याकडे बघेना.शिरपाच्या आईनं सुपात दाने,कुंकू आणलं .तिच्या कपाळावर कुंकू लावतांना हाताला ओले लागले.तसी आई चरकली.मनातले हुंदके आवरत ,पदराने अश्रू लपवत ती आत गेली.शिरपा लहान होता.त्याला हरिणीचा खुप लळा होता.एकामागून एक जनावरं विकली जात होती पण हरिणी त्याच्यासाठी गाय नाही तर माय होती.तिच्या दूधावर तो पोसला होता.दूधाचे उपकार तो विसरू शकत नव्हता.शिरपाचा भाऊ आला.आता बाजारात
निघायची वेळ झाली होती.त्याने खुंटीचे दावे
सोडले.पडल्या नजरेने शिरपाचा भाऊ हरिणी ला घेऊन चालला.ते मूके जनावर.मागे मागे
चालू लागले.शिरपा आक्रोश करु लागला.बाजारच्या दिशेने पळत सुटला.हरिणी बाजारच्या ठिकाणी प्रथमच आली होती.ती बावरली,चुकचुकली.हंबरडा फोडू लागली.जनावराच्या बाजारात ती उभी होती.शिरपा बाजारात शिरला.हरिणीची नजर
त्याच्यावर पडली.तसी तीने ताकत लावली.दावे तोडले.शिरपाला चाटू लागली. मूके जनावर ते काय बोलणार!पण प्रेम अबोल असते.शिरपाचा भाऊ गहिवरला. हरिणीचे आणि शिरपाच्या प्रेमापुढे तो हरला.हरिणी माघारी आली.आई आणि शिरपा आता तिच्यावर पहिल्यापेक्षा जास्त प्रेम करु लागले होते.
ना.रा.खराद