- ना.रा.खराद
निसर्गाची विविध रुपे बघितली की खुप आनंद मिळतो व शिकायलाही मिळते.अगदी एखादे काटेरी झुडूप देखील दुर्लक्षित करण्यासारखे नसते. या विश्वात नतमस्तक व्हावे अशी एकच जागा आहे तो म्हणजे निसर्ग. निसर्ग हाच खरा आपला गुरू आहे.
कायम घरात बसून पाच दहा मिनिटे घराबाहेर
पडल्याने तो कळत नाही. कायम बाहेर राहून
आरामासाठी घरी परतणारांना तो ठाऊक असतो.पक्षी देखील आपल्या पिलांना घरट्यात सोडून दूर भटकतात.थकले की मग घरटे जवळ करतात. भटकंतीसाठी असीम धरती आकाश असतांना ,एकाच जागी राहणे जीवनाचा अपव्यय आहे. हा जो निसर्गाचा पसारा आहे कुणासाठी आहे. निसर्गाने आपल्यासाठी आणि आपल्याला देखील निर्माण केले आहे. निसर्गाने इतके भरभरून दिले आहे की आनंदासाठी काहीच निर्माण करण्याची गरज नाही. पण तासनतास टि.वी.
समोर बसणारांना ते उमगणार नाही. जीवनात जिवंतपणा हवा असेल तर निसर्गाशी मैत्री करावयास हवी.डोळे उघडे ठेऊन चोहोंकडे बघा.निसर्ग कसा रंग बदलतो आहे.
उगवतीचा सूर्य अस्ताचलाला जाईपर्यंत
आपले किती सौंदर्य दाखवतो.घरातले डेकोरेशन बघणारे आपण करंटे लोक ,ब्रम्हांडाचे डेकोरेशन कधी बघणार.
रात्री चंद्र, तारे बघितले तर कळते ,हे आपणासाठी आहे अगदी फ्री.कदाचित त्यामुळेच त्याचे महत्त्व वाटत नसावे.
किती प्रकारची फुले आपली वाट पहातात. कोणतेच सौंदर्य व्यर्थ नसते. त्याची उपेक्षा
करु नये. त्यांचा रंग,आकार, सुगंध कशासाठी
आहे. किती प्रकार आणि आकाराची फुले पण दिवसभर पेपरमध्ये डोके खुपसणारी आपण माणसे ,आपल्याकडे वेळ कुठे असतो.
बारा महिने फळे देणारी झाडे ,कधीतरी त्यांना
भेट द्या.आपल्यासाठी ती झाडे. ऊन,वारा,पाऊस सहन करतात. आपण फळांचा रस घ्यावा असे त्यांना वाटते परंतु फास्टफूडवरची माणसे, कितीतरी फळे आपणास माहीत देखील नाहीत,चाखणे तर
दूरच.हजारों फळांची चव वेगळी,वेळ वेगळी,रंग वेगळा,आकार वेगळा किती चमत्कार आहे हा निसर्गाचा. जांभूळ, कवठ,बोरे, चिंच ,आंबा,फणस किती हे औदार्य आणि आपण करंटे त्याकडे लक्ष देत नाही. केवळ माणसाच्या जगात वावरणारे प्राणी बनलो आहोत. आपली मैत्री फक्त माणसांसी ,उठणे,बसणे,बोलणे सगळे माणसांसी.माणूस सोडून विचार करायचे शिकले पाहिजे. आपण कुठेच एकटे नसतो. निसर्ग सतत आपल्या सोबतीला असतो.अजुन आपण खरा मित्र ओळखलाच नाही.
आकाशात उडणारे पक्षी बघा.टकमक बघणारा कावळा बघा.उंच भरारी घेणारा गरुड बघा.कोकिळेचा मधुर स्वर ऐका.निसर्गाने सर्वत्र संगीत भरलेले आहे. सळसळत्या पानांचा आवाज कानी पडू द्या.पावसाळ्यात ओरडणारे बेडूक कसे डराव..डराव.करतात. सुंदर डिझाइन असलेली फुलपाखरे का भिरभिरत असतात विचार करा.हे सगळे जगण्याचा आनंद घेण्यासाठी आहे. रात्री चमकणारा कीटक किती आनंद देतो.कोल्हे ओरडते ते उगीच नाही. हे जीवनसंगीत आहे.
खळखळणारा समुद्र बघून ज्यास जगण्याचा
अर्थ कळत नाही ,नद्या, धबधबे,झरे हे कशासाठी आहेत.
हिरवी वनराई, शेतात डोलणारी पिके आपणास वेड लावत नाहीत म्हणूनच आपण खरेखुरे वेडे बनत चाललो आहोत.
आनंदासाठी जगायचे असते. निसर्गाने तो
अमाप ठेवा मानवासाठी खुला केला आहे.
जो डोळे उघडे ठेवील त्यास तो मिळेल.