स्री आणि पुरुष म्हणजे नर आणि मादी इतकेच.सर्वच जीवजंतू मध्ये असलेला हा
सामान्य भेद, तोही नैसर्गिक.त्यासही भेद
यामुळे म्हणावे लागते की शरीर, भावना आणि मन यामध्ये असलेला फरक.स्री पुरुषांपेक्षा वेगळी आहे की पुरुष स्त्रीपेक्षा वेगळा आहे,तर दोघेही एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, परंतु हे वेगळेपण एकमेकांना पुरक असे आहे, आणि इथेच आपण विचार करताना चूकतो.
स्री आणि पुरुषांनी एकमेकांशी तुलना किंवा स्पर्धा न करता, एकमेकांची नैसर्गिक रचना लक्षात घेऊन साधर्म्य किंवा असंगती
शोधली पाहिजे.स्री पुरुषांच्या ठिकाणी असलेल्या क्षमता कोणत्या बाबतीत समान
किंवा भिन्न आहेत, हे लक्षात घेऊन कामाचे
वाटप केले गेले पाहिजे.समानतेच्या नावाखाली केवळ बरोबरी करायला जाणे
योग्य नसते.
स्त्रियांच्या बाबतीत भारतीयांनी एक तर तीला खुप उच्च स्थानावर नेले आहे किंवा अत्यंत तुच्छ वागवले आहे.संसाराचे रहाटगाडगे ओढतात गरीब स्त्रियांचे होणारे हाल बघितले की स्त्री किती शोषित आहे.सतत काबाडकष्ट करून आपली उपजीविका भागवणारे कुटुंब आणि त्या संसारात स्त्रियांना होणारा त्रास असहनीय
असतो.स्रियांचे शोषण या ना त्या पद्धतीने
कायम सुरू होते.भारतीय संस्कृतीच्या गोंडस नावाखाली तीला घरात डांबून ठेवले गेले.शिक्षणापासून तीला वंचित ठेवून परावलंबी ठेवले.बाप,नवरा आणि शेवटी मुलगा तीचा पालक बनला , यांच्याकडून
जशी वागणूक मिळाली तशी ती मुकाट्याने
राहू लागली.
लग्न करून तीला सासरी जावे लागते, तिथे
सर्वांशी जुळवून घ्यावे लागते, सेवा करावी
लागते,खरे म्हणजे हे किती कठीण कार्य.
परंतु ती संस्कृतीचा भाग म्हणून किंवा सर्वच स्त्रियांना असे करावे लागते यामुळे सहर्ष ती हे स्विकारते.
स्री मन आणि देहाने पुरुषांच्या तुलनेत कोमल असते.तिच्या ठिकाणी हा कोमलता असल्याने ती संगोपन करु शकते.बालकाने
कितीही सतावले, ते कसेही असले तरी आपल्या छातीचे दूध त्यास पाजल्याविना
तीला चैन पडत नाही.पतिला आपल्या ठिकाणी खिळवून ठेवणारी स्त्री म्हणजे मोठे रहस्य आहे.तिचा आदर करणं पुरुषांचे कर्तव्य आहे.गुणदोष तर दोहोंच्या ठिकाणी असतात, परंतु स्री सुलभ गुणांचा आदर केला जावा, त्यांच्या ठिकाणी ज्या असीम शक्ती वास करतात,त्यास वाव द्यावा.स्रियांना आपल्या हक्कासाठी कुठलाही लढा उभारण्याची, आंदोलन करण्याची वेळ येऊ नये.त्यांचा वाटा समानतेचा असला पाहिजे.
पुरुष हा स्त्रीपेक्षा कायम वरचढ दाखवला गेला,सर्व ग्रंथकार पुरुष.युद्ध वगैरे पुरुषांचे.अनेक राजांनी आपल्या जनानखान्यात हजारों स्त्रिया डांबल्या.स्रियां पळवणे असले प्रकार सर्रास होते.एखादे खेळणे किंवा वस्तू प्रमाणे तिला वागवले गेले.ह्याचे मुख्य कारण तीला शिक्षणापासून वंचित ठेवले हेच आहे.इज्जत, इभ्रत, संस्कृती,खानदान या नावाखाली चार भिंतीत तीला डांबून ठेवले.आपली लैंगिक भूक भागविण्यासाठी आणि मुलं जन्माला घालणाऱ्या मशिन सारखा उपयोग तीचा होऊ लागला आणि रसातळाला गेली.अनेक
ग्रंथांमधून तीच्या सर्वांगाचे लैंगिक वर्णन,उत्तेजक भाषा यामुळे ती अधिकच दाबली गेली.तमाशे, नाचगाणी यामध्ये तीला अडकवले गेले.वेश्या ,गणिका वगैरे यांचा उदय झाला आणि स्त्रियांची उरलीसुरली इभ्रत वेशीवर टांगून समाज अविचारी झाला.
स्त्रियांना याची जाणीव होऊ लागली,ती हातपाय खोडू लागली.या पुरुषवादी जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपड करु लागली आणि काही प्रमाणात ती मुक्त होऊ
लागली.स्रियांना त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागणार आहेत, कुणाचे कृपेने मिळालेले नाही तर स्वतःच्या हिंमतीने मिळवलेले स्वातंत्र्य हवे, जे टिकाऊ असते, भक्कम असते.
स्त्रियांनी रडत बसण्यापेक्षा लढत बसावे, जेणेकरून येणारी पिढी तरी स्वातंत्र्याचा स्वाद घेऊ शकेल.नवरा जितका महत्त्वाचा, तितकीच बायको महत्वाची.कुणी कमी जास्त नाही.समानतेचा विचार जिथे असतो, तिथे शोषण थांबलेले असते.
स्री आणि पुरुष यांचे संबंध सलोख्याचे असावेत, लैंगिकता हा भेदभाव असू नये.दोहोंची गरज आहे.एकमेंकाचा सन्मान ठेवत गुण्यागोविंदाने राहता येते, हे उभयतांनी दाखवून द्यावे.संस्कृती आपण निर्माण करावी.
- ना.रा.खराद