घड्याळ मी लहान असतांना, मोठ्या भावाच्या लग्नात त्यास एक घड्याळ आले होते. त्याकाळी रेडिओ आणि घड्याळ शिक्षणातल्या सक्तीच्या विषयांसारखे होते. मी पहिल्या वर्गात शिकत होतो. माझ्या हट्टापायी ते घड्याळ मला देण्यात आले. "लहान तोंडी मोठा घास" प्रमाणे लहान मनगटावर ते मोठे घड्याळ. "मूर्ती लहान, किर्ती महान" तसे मनगट लहान, घड्याळ महान "अशी माझी अवस्था झाली. घड्याळाचा हात मी सारखा बघायचो. मित्रांना घड्याळास हात लावू देत नसे. 'दूरुन बघा' अशी ताकीद देत असे. इतर एकाही मित्रांकडे घड्याळ नव्हते, म्हणून त्याचे सर्वांना कुतूहल होते.. घड्याळ वेळ बघण्यासाठी असते, हेही तितकेसे माहित नव्हते. इतर कुणीतरी समजंस लोक माझ्या घड्याळात वेळ बघायचे, आणि इतके वाजले असे सांगायचे. मला त्याच्यासी सोयरसुतक नसायचे.वेळ कशाला म्हणतात, हेच माहिती नव्हते तर वेळ बघणे कसे कळणार! डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ आल्यापासून उजव्या हाताकडे दूर्लक्ष झाले होते. मी बघायचो, घड्याळातले तीन काटे कधीच एका जागेवर नसायचे. त्यातील एक काटा भरभर पळायचा. अंगकाठीने तो सडपातळ होता.मला त्याचे विशेष आकर्षण होते. पुढेकळाले त्यास सेंकदकाटा म्हणतात. इतर दोन काटे त्याच्या मागोमाग संथ गतीने चालायचे. एकदा मी तिघांना एकमेकांवर बसलेले बघितले होते. तो दुर्मिळ योग होता. घड्याळ कानाला लावले की आवाज यायचा. मित्रांना खरे वाटायचे नाही. त्यांच्याही कानाला मी घड्याळ लावायचो. एकदा घड्याळाची चावी फिरवली. सारे काटे फिरायला लागले.गंमत वाटू लागली. पाहिजे तेव्हा, पाहिजे तितके वाजू लागले. वेळ बघणे सोडून, त्या घड्याळाचा मी सर्व उपयोग केला. ती वेळ गेली. ते घड्याळ गेले आणि तो भाऊही! ना.रा. खराद
