‌मृत्यु

                     मृत्यू 
                            - ना.रा.खराद


ज्याच्याबद्दल चर्चा खुप केली जाते, परंतु जो जिवंत असेपर्यंत हाती लागत नाही आणि मृत्यूनंतर ज्यांच्याशी गाठ पडते असा तो मृत्यू !
   मृत्यू कुणालाच नको आहे,त्याची भिती सर्व बाळगतात, त्याच्यापासून दूर पळतात, तरीही तो येतोच,गाठतोच खिंडीत.त्याच्यापासून कितीही पळाले तरी तो अगोदरच वाट पहात बसलेला असतो.त्यास ओळखता येत नाही,कारण तो कोणत्याही रुपात येतो.
    मृत्यू, कधीच, कुणालाही चुकवता येत नाही,जन्माइतकाच तो स्पष्ट आहे.मृत्यूजवळ कोणताच जोर चालत नाही,बळाचा वापर करून त्यास थांबवता येत नाही,त्याचा वार चुकवला जाऊ शकत नाही.
    मृत्यू सर्व जिवांना गिळंकृत करून टाकतो.मृत्यू शेवटचा घंटानाद आहे,जीवनाचा पूर्णविराम आहे.आपण जरी त्यास विसरलो तरी तो मात्र आपणास कधीच विसरत नाही, तो समानतेचा पाईक आहे,सर्व प्राण्यांना तो समान समजतो.
   मृत्यू कुठेही प्रवेश करतो, लाखों शस्त्रधारी त्यास थांबवू शकत नाही, एकदा तो आला की विषय समाप्त.
 तो भावनेला जुमानत नाही,त्यास कुणाची दया येत नाही,तो फक्त आपले कर्तव्य बजावतो,त्यास ओळख सांगून उपयोग नाही, कुठलेही पुण्य तिथे उपयोगी पडत नाही.
     मृत्यू खुप क्रुर असतो.जीवन नष्ट करतो,तो नवीन लोकांना जागा मोकळी करून देतो.तो शंभर वर्षे वाट पाहतो, परंतु काहींना मध्येच भेटतो ,तो कोणत्या टप्प्यावर गाठेल कुणीही सांगू शकत नाही.
  मृत्यू हा एक बोध आहे,जीवन समजून घेण्यासाठी,तो वरवर क्रुर वाटत असला तरी त्याचे अनंत उपकार आहेत,तो नसता तर फार वाईट झाले असते.त्याच्यामुळे
जगण्याला किंमत आहे, त्याच्या पासून सावध राहून आपण प्रत्येक पाऊल टाकत असतो, मृत्यू आहे म्हणून अनेक गोष्टी आहेत.
     मृत्यूचे आपण स्वागतच केले पाहिजे,तो फक्त पृथ्वीवरुन आपली सुटका करतो,आपला विरोध तोकडा आहे,तो टिकू शकत नाही.त्याच्याशी मैत्री करुया,तो जीवनाच भाग आहे, हे लक्षात घेऊ या.मृत्यूला समजून घेऊ या.

  
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.