- नारायण खराद
आपल्याकडे आपले म्हणून जे काही आहे ते विकण्याची वेळ येणे फार कष्टप्रद असते. त्याचा प्रत्यय मला वारंवार आला.बालवयात आपण काहीच करु शकत नाही,याची खंत,शल्य आजही आहे .जे चालले ते बघत रहाण्याशिवाय पर्याय नसतो.पण मनाला जी वेदना होते, ती कायम घर करते आणि कधीतरी अलगद त्या
आठवणी दाटून येतात .दोन तीन वर्षोचा असतांना आईचे कर्करोगाने निधन झाले. त्यावेळी उपचारांसाठी जमीन विकावी लागली होती,असे मला कळाले.वडील खुप मायाळू होते. त्यांनी आई कधीच आठवू दिली नाही. सावत्र आईने संगोपन केले.खुप लाड केले.आमच्यासाठी खुप पैसा खर्च केला .खुप कर्ज व्हायचे.वडील चिंतेत असायचे.कुठलाही मार्ग नसायचा.
आमच्याकडे बरीच जमीन होती. गाई म्हशी, बैल,बकरी होते. मला त्यांचा खुप लळा होता.आपलेपणा वाटायचा.त्यांच्या शरीरावरुन हात फिरवला की सुख लाभायचे.त्यांचे मोठमोठे डोळे पाणावलेले असायचे.मी गहिवरून जायचो.'
'वनरसी'नावाची एक हडकुळी गाय होती.माझ्या जन्मापूर्वी पासून ती आमच्याकडे होती.दूध जास्त देत नसे.तरीही ती आमच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे होती.माझी सावत्र आई तीला फार जीव लावत असे.तिला बाजारात विकले तेव्हा मी खुप रडलो होतो. ज्या खुंटीला ती बांधलेली असायची,ती खुंटी रिकामी बघून खुप आठवण यायची.चांगली दूध देणारी म्हैस अचानक विकली तेव्हाही खुप वाईट वाटले.
नंतर बैल विकले.एकापाठोपाठ एक असे सर्व
जनावरं विकली गेली.
आमच्याकडे एक बकरी होती.मी इतर कुणालाही तीची देखभाल करु देत नसे.मी तिच्यासाठी शेतातून हिरवा चारा आणत असे. तिच्याशिवाय क्षणभरही मला करमत नसे.ती मला कोठूनही ओळखत असे. माझ्याकडे धाव घेत असे. त्या बकरीसारखे प्रेम मला कधीच अनुभवायला मिळाले नाही. तिला विकायचे अशी कुजबुज माझ्या कानावर आली.मी रात्री उठून तिच्याजवळ जाऊन रडत बसलो.बाजारचा दिवस उजाडला .मोठ्या भावाने तिला खुंटीवरुन सोडले आणि बाजारच्या दिशेने निघाला. ती मोठमोठ्याने ओरडत होती .मला खुप वाईट वाटत होते. त्या दिवशी मी जेवलो नाही, मला ताप आला.अगतिकता काय असते, याचा अनुभव बालवयात वारंवार येत होता.
पुढे आर्थिक परिस्थिती खालावत चालली. शिक्षणासाठी खुप पैसा खर्च झाला. कर्जाचा डोंगर उभा राहिला. जमीन विकणे एकमेव पर्याय होता.जमीन विकणे हा सर्वात मोठा हादरा होता.नामुष्की होती. जीविकेचे एकमेव साधनही चालले होते. त्या मातीशी आम्ही एकरुप झालो होतो.जन्मदात्या आईच्या पदस्पर्शाने पावन ती माती होती.आमच्या रोजीरोटीचे ते एकमेव साधन होते.जमीन विक्री निघाली.माझे काळीज फाटले होते. मी स्वतः लावलेली अनेक झाडे शेतामध्ये उभी होती ,मी त्यांची देखभाल करायचो.प्रत्येक झाड जसे माझ्याशी बोलत होते.आता काही झाडांना फळे आली होती.लिंब,बाभूळ बांधावर मोठ्या दिमाखात डौलत होती .त्या झाडांच्या फांद्यांवर मी लहानपणी खेळलो होतो.बाभूळ न्याहाळत होतो.जणू ती सर्व सृष्टी माझ्या नसानसात आपले जागा करुन होती.ती जमीन विकली जाणार या विचाराने मी गांगरुन गेलो.गावभर जमीन विकल्याची चर्चा होऊ लागली.गावात फिरताना लाज वाटू लागली.
ज्या पाऊलवाटेने मी रोज शेतात जात असे. त्या वाटेने माझी पाऊले जड पडू लागली.जमीन विकली जाणार. या रस्त्याने आपली ये जा बंद होणार या विचाराने मी हादरुन गेलो होतो.अवघे काही दिवस उरले होते.ज्या दिवशी खरेदीखत झाले, माझ्या पायाखालची जमीन सरकली, आम्ही निराधार झालो.
एवढे सगळे कमी की काय, आमचे राहते घर विकण्याची वेळ आली. ज्या घरात माझे बालपण गेले.कणाकणात मला जिथे मला माझी आई दिसते.ज्या आंगनात मी खेळलो.त्या घराची विक्री माझ्यासाठी सर्वात मोठा हादरा होता.अत्यंत दुःखदायक ती बाब होती.आता ते जुने काही उरले नाही. पण मनात ते कोरलेले आहे. ते कधीच मिटल्या जाणार नाही.
जनावरं,जमीन, घर विकल्या गेल्याचे शल्य आजही आहे. न जानो कुठपर्यंत असेल!