भाषणे; नको असलेली.

                                    भाषणे; नको असलेली.                             -  ना.रा.खराद

   आजकाल भाषणे खुप दिली जात आहेत. नको त्या ठिकाणी, नको ते,नको तितके बोलले जात आहेत. श्रोते हक्काचे असले की मग भाषणांना जास्तच जोर चढतो.पूर्वी फक्त विद्वान लोकांची भाषणे असायची.आता मूर्खइतके बोलू लागले आहेत की त्यांना आवरणे कठीण होऊन जाते.बरे भाषणे कुठे असावीत याचेही ताळतंत्र उरले नाही. स्मशानभूमीत भाषण,लग्नसमारंभात ,वाढदिवस ,जावळं!अनेक वक्ते गिधाड जसे मढ्यावर टपून असते, तसे भाषणाची संधी शोधत असतात. काहीही बोलणारे बोलण्यासाठी सदैव सज्ज असतात. अशा लोकांची भाषणे सदैव तीच असतात.प्रसंग कोणताही असो,भाषण तेच आणि तितकेच. कमी बोलणे त्यांना कमीपणाचे वाटतो. टाळ्या मिळाल्या की त्यांना जोर चढतो.अत्यंत हास्यास्पद बोलले जाते.शाळकरी मुले त्यात भरडली जातात. चिमुकल्यांना काय चालले हे उमगत नाही. पण वक्ता आपले ज्ञान पाजळत असतो.काही लग्नसमारंभात तर नेत्यांची आशिर्वादपर भाषणे उपस्थितांसाठी शाप ठरतात. देशाची सेवा घडावी वगैरे असे बोलले जाते तेव्हा हसू आवरत नाही.
  शोक सभेतील भाषणे लोकसभेतील भाषणांसारखी असतात.विरोधी नेते आतून जाम खुश असतात तरी पोकळी निर्माण झाली म्हणतात आणि पोटनिवडणुकीची तयारी करतात.तालुक्याची किंवा जिल्ह्याची हानी झाली
असे ठासून सांगतात.ऐकणारांनाही माहिती असते की खोटे बोलतो आहे.
 नेते प्रचार सभेतून तर काहीही बोलतात. समर्थकांच्या टाळ्या त्यांचा चेव वाढवतात. घोंगडे गुंतलेले असले की भाषणे ऐकावी लागतात किंबहुना तसे दाखवावे लागते.शाळांमधून लहान मुलांची भाषणे कुतूहलाचा विषय असला तरी टिळक,गांधी ,नेहरू वगैरे वरची भाषणे त्यांची दमछाक करतात. घोकून आठवडा गेलेला असतो.मध्येच विसर पडतो.शब्दांचा आशय माहीत नसतो.
  अनेक वक्ते बोलतांना आरडाओरडा करतात. कानफाडू भाषणे .अनेकांना इतरांचा वेळ खाण्याची सवय असते. संपत आल्यासारखे विधाने करून पुन्हा धागा पकडून त्याच ठिकाणी येतात.एकच विचार पुन्हा पुन्हा सांगतात. बाष्पळपणा असतो.भाषणाला खोली कमी असली की लांबी जास्त असते. मी आपला जास्त वेळ घेणार नाही ,अशा विधानाने सुरवात होते मात्र मी जास्त वेळ घेतला याने शेवट.
   उपदेशपर भाषणे तर फारच कंटाळवाणी असतात,पचनी न पडणारा आदर्शवाद नकोसा होतो.प्रमुख मार्गदर्शक
या बिरुदामुळे वक्ता बेभान झालेला असतो.बाजीप्रभुने तलवार चालावी तसे चौफेर शब्दांचा भडीमार श्रोते सहन
करत असतात.आयोजकाचा धाक किंवा सन्मान ठेवण्यासाठी ते ऐकावे लागते.
अनेक वक्ते वादग्रस्त विधाने करतात. काही माहिती असलेले सगळेच बोलू पहातात. काहींना आपण फार चांगले बोलत आहोत असे वाटते, म्हणून बोलत असतात.
बोलण्याचा विषय,वेळ,प्रसंग,श्रोत्यांची ओळख,असे सगळे भान ठेवून बोलणे गरजेचे आहे. तोच खरा शहाणा वक्ता!

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.