- ना.रा.खराद
कोण जाणे का, परंतु औपचारिकतेचा मी कायम तिटकाराच केलेला आहे.औपचारिकता केवळ दिखाऊ असते, त्यामध्ये हार्दिक असे काहीच नसते.स्वत:च्या नाही तर इतरांची मर्जी राखण्यासाठी तीचा वापर केला जातो.
जे सहज,सुलभ आणि स्वाभाविक आहे तेच मला भावते.उगीचच बडेजाव , सारवासारव, जमवाजमव अस्वाभाविक वाटते.
मला एका ठिकाणी भोजनाचे निमंत्रण होते.मी तसे बाहेर कुणाकडेच जेवत नाही,त्याचे कारण
ती नको असलेली औपचारिकता . अत्यंत गंभीर अशा वातावरणात जेवणाचे ताट आले.व्यवस्थितपणा सांभाळण्यात तो बिचारा मेटाकुटीला आला होता.अगोदरच हजार सूचना
दिलेल्या असल्याने आपले काही चुकते की काय या भीतीनं तो वाढपी फारच तणावात दिसला.
त्या घरातील इतर चार-पाच माणसे लक्ष ठेवून होती ,आग्रह करण्याची औपचारिकता कसोशीने पाळत होती.त्या घरातील स्त्रिया देखील चोरट्या नजरेने माझ्या भोजन क्रियेला
न्याहाळत होती.माझी चर्वण करण्याची स्वाभाविक गती व आवडीच्या पदार्थांवर यथेच्छ
ताव मारण्याची खोड व कढी वगैरेंचा फूरका यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे आवश्यक होते.
जेवतांना एका व्यक्तीकडे दहा जन बघत असतील तर ते जेवण केवळ औपचारिक होऊन
जाते.आपण जर जास्त जेवलो तर स्वयंपाकघरात हळू आवाजात," इश्य! किती खातो, काही लाजलज्जा नाही लोकांना." पुढे मात्र," जेवा पोटभर, फार थोडे जेवलात!"
कसेबसे अर्धवट जेवण उरकले व औपचारिकता म्हणून म्हणालो," फारच सुंदर स्वयंपाक,सुगरणी
आहात." बायांना पुरुषांनी केलेली प्रशंसा खरी वाटत नसते हा भाग वेगळा!
एकाच्या घरी गेलो, त्याच्याकडे माझे उसने पैसे होते, अनेक वेळा मागणी करुन ते मिळत नव्हते
म्हणून मी घर गाठले.महाशयांनी दरवाजावर जाताच हात जोडले," या...या..आपली पाऊले
लागू द्या आमच्या घराला." मनात म्हणालो," चांगले गालावर बोटे उमटायला आलो,थांब लेका." औपचारिक पाणी,चहा आला.तहान असो नसो पाणी दिलेच जाते.पिल्या पाण्याला माणसे जागत असतील कदाचित! त्याने अत्यंत गोड शब्दांत मला निरोप दिला." आपण उगीच तसदी घेतली,मी आणून देतो घरी." माणसे
कटवायची आणि पटवायाची असतील तर गोड बोलणे किती उपयोगी पडते हे माझ्या लक्षात आले.
एखाद्या ठिकाणी प्रमुख वक्ता वगैरे असले की मग तर औपचारिकतेचा कळस होतो.पाहुण्यांचा
अतिरंजित परिचय ऐकून श्रोते खुललेले असतात.जवाबदारी वाढलेली असते कारण नसलेले अनेक गुण त्याने सांगितलेले असतात,ते खोटे ठरु नये म्हणून खुप आटापिटा करावा लागतो. ' हा इथे कशाला झक मारायला आला.' असे ज्यांना वाटते ते देखील औपचारिकता निभावतात व "खुप छान बोललात ." असं ठोकून देतात.शाब्दिक औपचारिकता बिनखर्ची असते.फक्त अंगी कौशल्य हवं.
आता प्रत्येक गोष्ट औपचारिक होत चालली आहे.हार्दिक असे काहीच उरले नाही.खरेखुरे आता उरले नाही फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सर्व काही केले जाते.ज्यामध्ये राम नसतो.
-