शिक्षक उवाच...
- ना.रा.खराद
शाळेत असतांना शिक्षक अनेक वेळा मला 'दगड' म्हणायचे, तसे ते आलटून पालटून सर्वांनाच म्हणायचे,मनावर घ्यावं असं ते वय नव्हतं , पुन्हा शिक्षकांचे बोलणे मनावर घ्यायचे नसते असे आम्हाला घरुन सांगितलेले असायचे.
आमचे खरे नाव काहीही असले तरी शिक्षकांनी
आमची लक्षणे बघून सर्वांचे नामकरण करुन टाकलेले असायचे.शिक्षकाचा शब्द म्हणजे प्रमाण होता.शाळा सुटली की त्याच नावाने उदोउदो व्हायचा.शिक्षकांनी सर्व नावांचा बट्ट्याबोळ केलेला असायचा.हजेरीच्या वेळी
देखील शिक्षक खरे नाव घेत नसत.
गाढवा,बैल,नालायक,नेभळटा,मूर्खा,रेडा, कुत्रा,
बेडूक,मांजर ,धसकट,रेडा अशा कितीतरी शिव्या शिक्षक बहाल करत असत.शाळेत मुलांना 'वळण' लावण्यासाठी पाठवतात हे तर सर्वश्रुत आहे.वळण सरळ नसते हे मात्र खरे!
शिक्षकांचा मार कमी आणि शिव्या जास्त खाल्लेल्या.प्रत्येक शिक्षकाच्या शिव्या म्हणजे
आम्हाला मेजवानी असायची.'गाढव ' ही शिवी तर शाळेचे ब्रिद असायचे.प्रत्येक विद्यार्थ्यांला कधीतरी गाढव संबोधले जायचे.एखादे वेळी सर्वांना 'गाढव' म्हंटले जायचे.आम्ही त्याच्या खोलात जात नसू.
देहकाठी, रंगावरून काही विशेषणे लावली जायची.काळ्या मुलांना 'कोळशा' , चंचल मुलाला 'माकडा' ,मट्ठ मुलाला 'बैल' बिनधास्त
संबोधले जायचे.दगड,माती,धोंडे हे तर नित्याचेच.उंचीवरुन,जाडीवरुन काही नावे निश्चित व्हायची.'पैलवान' छोटू किंवा मोटू म्हंटले
जायचे.डूक्कर म्हंटले तरी मुलं हसायची.
शिक्षकांची मने इतकी सरळ होती की त्यांचे वाकडे बोलणे देखील सरळ घेतले जायचे.
शिक्षकांवरची श्रद्धा इतकी होती की शिव्या
देखील ओव्या वाटायच्या.आजही एखाद्या
शिक्षकाची शिवी आठवली की सगळा शैक्षणिक
इतिहास डोळ्यासमोर तरळतो.