गोंधळ

                  गोंधळ
                          - ना.रा.खराद


     गोंधळ , आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.कधी आपण त्याचे मुकदर्शक असतो तर
कधी त्या गोंधळाचे घटक असतो.गोंधळ ही एक सामाजिक अगतिकता आहे.जिथे गर्दी तिथे गोंधळ.जिथे स्वार्थ, बेशिस्त तिथे गोंधळ.गोंधळ म्हणजे गोंगाट .नियमांची पायमल्ली जिथे तिथे तो ठरलेला आहे.
    सार्वजनिक ठिकाणी गोंधळ ठरलेला आहे.गोंधळाची सुरुवात घरापासून होते.घरात लहान मुले गोंधळ करतात.जिथे शांतता भंग तिथे गोंधळ माजलेला असतो.आततायीपणा, उतावीळपणामुळे गोंधळाचे वातावरण तयार होते.संयमाचा अभाव,अज्ञानामुळे देखील गोंधळ होतो.अनेक माणसे जेव्हा असंगत विचार करतात तेव्हा गोंधळ ठरलेला असतो.
    शाळेमध्ये वर्गात शिक्षक नसतांना ,क्वचित असतांना देखील गोंधळ म्हणजेच बेशिस्त,गोंगाट असतो.गोंधळलेली स्थिती गोंधळ निर्माण करते.वस्तूंचा किंवा माणसांचा ताळमेळ नसला की गोंधळ उडतो.भंबेरी उडते.अचानक तपासणीसाठी आलेले अधिकारी ,गोंधळ उडवून देतात.गर्दीच्या ठिकाणी नियम डावलले की गोंधळ उडतो.
    रस्त्यावर अपघात झाला की गर्दी जमते.विवेक सूटतो आणि गोंधळ सुरू होतो.ताळतंत्र सुटले की गोंधळ निर्माण होतो.अनेक सभांमध्ये, बैठकीत मतभेदांमुळे गोंधळ माजतो.लोकसभा , विधानसभा हे तर
गोंधळाचे माहेरघरच.कुणी कुणाचे ऐकायचे नाही,असे त्यांनी ठरवून टाकलेले असते.
    गोंधळाच्या वातावरणातच देशहितासाचे निर्णय घेतले जातात.लोकशाही म्हणजे गोंधळ असेही मानायला हरकत नाही.मतदान केंद्रावर गोंधळाशिवाय प्रक्रिया पार पडत नाही.अनेक विधेयक गोंधळातच मंजूर होतात.गोंधळी लोक गोंधळ घालतात त्यापेक्षा दैनंदिन जीवनात चाललेला हा गोंधळ अधिक रंजक असतो.
सार्वजनिक नळावर पाणी भरतांना होणारा असो की गावात पाण्याचे टँकर आल्यानंतर असो गोंधळ लक्षवेधक असतो.
    गोंधळासाठी फक्त एक ठिणगी आवश्यक असते.तसे गोंधळी जागोजागी असतातच.
भडकावण्याची कला असली की गोंधळ माजला जातो.आंदोलनकारी गोंधळ घालतात,ऐकण्याच्या स्थितीत नसतात ,त्यांना पांगविण्यासाठी पोलिस वेगवेगळे उपाय करतात,तिथे गोंधळ माजतो.
लग्नकार्यात तर खुप गोंधळ असतो.धांदल,धावपळ अपरिहार्य असते.गोंधळातही एक कैफ असतो.कुस्त्याच्या फडातला गोंधळ हा पहलवानाचा उन्माद वाढवणारा असतो. डिजेच्या तालावर नाचणारी पोरं गोंधळाचे मानकरी असतात.
मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते, तिथेही गोंगाट असतोच.काही अवचित किंवा विपरीत घडले की गोंधळ निर्माण होतो.काय करावे जेव्हा सूचत नाही तेव्हा गोंधळ होतो.
      रेल्वे, बसस्थानक, बाजार याठिकाणी कायम
गोंधळ असतो.अफवेमुळे गोंधळ पसरतो.गोंधळामुळे चेंगराचेंगरी झालेले कित्येक उदाहरणे आहेत.गोंधळ फक्त बाहेरच असतो असे नाही, आपल्या मनात देखील तो असतो.दुविधा मनस्थिती, भांबावून जाणे अशावेळी आपण गोंधळून जातो.अती आनंद किंवा मोठे  संकट मनात गोंधळ निर्माण करते.निर्णय क्षमतेचा अभाव हे मानसिक गोंधळास कारणीभूत असते.लाजाळूपणा, कमकुवतपणा यातून देखील मनुष्य गोंधळतो.
परीक्षा केंद्रावर नं. न सापडणे,लग्नाच्यावेळी
एकाचवेळी अनेक मुली आवडते, ताटामध्ये
अनेक पदार्थ असणे,कुणी धमकी देणे अशा अनेक प्रसंगांत गोंधळ उडतो.कधी कुणाच्या येण्याने तर कधी कुणाच्या जाण्याने गोंधळ उडतो.गावात वाघ शिरल्याने गोंधळ उडतो तर वर्गातून शिक्षक बाहेर गेल्याने गोंधळ उडतो.
   जीवनात गोंधळ अपरिहार्य आहे परंतु तो किती करायचा,किती करु द्यायचा हे आपण ठरवायचे.मुकदर्शक व्हायचे की त्यामध्ये सामिल व्हायचे हे मात्र आपण नक्की ठरवले पाहिजे.जागरणाचा हा गोंधळ इथेच थांबतो.
                              
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.