संयम अनेक मानवी गुणांपैकी एक आहे.संयमी माणसे मानसिक दृष्ट्या परिपक्व असतात.अधीरता, उतावीळपणा, आततायीपणा ,धांदल,गडबड,घाई हे संयमाचे शत्रु आहेत.संयम बाळगल्याने मोठे नुकसान
टाळता येते.संयमी माणसे शहाणी असतात.क्षमाशील असतात.माणसाची पारख त्याच्या
ठिकाणी किती संयम आहे यावरून होते.संयमासाठी मनोनिग्रह लागतो.इतरांना
समजुन घेण्याची क्षमता अंगी असावी लागते.
स्वत:चा अंहकार आणि मोह ओळखावा लागतो.कुणी आपल्या विषयी काही चूकीचे बोलले,
आपल्या मनाविरुद्ध मत प्रकट केले तर त्याचे उत्तर संयमाने देता आले पाहिजे.आवेश, आकांडतांडव करु नये.शक्य असेल तर तात्काळ उत्तर देऊ नये.समोरच्या प्रमाणे आपण प्रतिक्रिया देणे म्हणजे संयमाचा अभाव असल्याचे दिसून येते.संयमाने अनेक प्रश्न सुटतात.संयम हा रामबाण आहे तो ज्याच्याठिकाणी आहे तो निश्र्चितच श्रेष्ठ ठरतो.भांडणे तर कुत्रे मांजरे करतात . मनुष्य मात्र संयमाने त्यावर मात करु शकतो.
आपलेच घोडे पुढे असावे हा विचार संयमाचा अडसर आहे.बसण्यासाठी पुढची जागा हवी,
जे चांगले आहे ते मलाच मिळाले पाहिजे.काहीही असो अगोदर मला मिळाले
पाहिजे,माझे वाहन सर्वांच्या पुढे धावले पाहिजे असले वर्तन संयमाचा अभाव दाखवते.मी तात्काळ परतून बोललेच पाहिजे असे त्यास वाटते.इतरांचे हिसकावून घेण्याची त्याची प्रवृत्ती असते.संयमी माणसाकडे सहनशीलता देखील असते.आपल्यावर अन्याय होत आहे हे माहिती असूनही तो संयम बाळगतो.आपल्या मतांसाठी तो आग्रही नसतो.इतरांच्या मतांचाही तो आदर करतो.
स्वत: इतकेच महत्व तो इतरांना देतो.हिसकावणे, बळकावणे,पटकावणे हे संयम नसलेल्या लोकांचे काम असते.अगोदर इतरांचा विचार करणारा मनुष्य मोठ्या मनाचाही असतो. मनात उठणारे आवेग थांबवता आले पाहिजे.
जे संयमाने मिळते ते उतावीळपणे मिळत नाही.आपल्याच ताटावर ओढण्याची प्रवृत्ती
अमानवीय आहे.रागावर नियंत्रण ठेवता आले तरच संयम बाळगता येतो.अंहकाराला बळी
पडले की संयम सूटतो.
चारचौघात वावरताना संयमाची गरज असते. वाणी संयम तर असलाच पाहिजे.
संयम एकप्रकारे नियंत्रण असते.संयमाने वर्तन करणाऱ्या लोकांना पश्र्चाताप करण्याची वेळ
येत नाही.आक्रमता कमी करुन संयमी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.