आठवणी
- ना.रा.खराद
आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्याकडे असलेला ठेवा म्हणजे आठवणी.जसजसे आपण पुढे जावू तसतशा आठवणी साठवत जातात.गरज,प्रसंग आणि निमित्त साधून त्या वर डोकं काढतात.जीवन म्हणजे तरी काय
कडू गोड आठवणींचे गाठोडेच.हे वाहतांना
कधी जड वाटत नाही.उलट जूनी बूजलेली
जखम कुतूहलाने बघावी तशीच ती असते.
गत आयुष्याचे सारे संचित आठवणींच्या संचिकेत बंद असते.हवे तेव्हा ते उघडता येते.
आपण पुढे जात असलो तरी मागचे सोबत घेऊनच.जगलेलो आयुष्य हेच खात्रीचे ,पुढचे
आयुष्य कायम पुढेच असते.ते कधीच हाती
लागत नाही कारण ते असते मृगजळ.थांबतो
तेव्हाच कळते ,गत आयुष्य हेच आयुष्य होते.
आठवणीत रहाण्याची एक मौज,गंमत असते.
त्यामध्ये रममाण होणे सगळ्यांना आवडते.
मनुष्य जेव्हा स्वत:शी संवाद करतो तेव्हा तो
आठवणीत रमलेला असतो.हवे ते पान तो
उलगडतो आणि वावरतो मुक्त.
जगलेले आयुष्य पुन्हा लाभणार नसले तरी
आठवणीत ते पुन्हा जगता येते.आपले बालपण, बालमित्र कुणीच विसरत नाही.हे न विसरणेच जीवनाचे गमक असते.हव्याशा, नकोशा दोन्ही आठवणी सारख्याच वाटू लागतात.जीवनातले कित्येक प्रसंग डोळ्यासमोर दिसतात.किती हे दिव्य.आठवणीचा हा महासागर सारखा उसळत असतो.
काही आठवणी फार मधुर असतात.वारंवार
त्या मुद्दाम काढल्या जातात.क्वचित आठवणी नकोशा वाटतात.किती किती आठवणी.आठवणी इतरांना सांगाव्या वाटतात.जुने मित्र भेटले की आठवणीला उजाळा मिळतो.आवडलेली एखादी अचानक
भेटली की तिच्याभोवती ते घोटाळणे आठवते.झूरलेला मनाला चटका लावून जाते.
वैभवात गरीबीचे आणि गरीबीत वैभवाचे दिवस आठवतात.केलेल्या संघर्षाचे.लाभलेल्या कृपेची आठवण असतेच.
भोगलेल्या यातनांची , पाहिलेल्या स्वप्नाचीही
आठवण असते.आई वडील,आजी आजोबा
या़ंच्या मायेची आठवण.शाळेतील शिक्षकांची
आठवण असतेच.
शहरात गेलेल्यांना आपला गांव आठवतो.
निवृत्त कर्मचारी आठवणी सांगताना गहिवरून जातात.लाडात वाढलेली मुलगी सासरी गेली की सगळे तिच्या आठवणीत बुडतात.गुणवान मुलांची शिक्षक आठवण काढतात.दुष्काळाची, युद्धाची आठवण असतेच.भूकंप, महापूर कुणी विसरत नाही.
अनायास सर्व आठवणी साठवल्या जातात.
प्रसंगी त्या ताज्या होतात.जीवनात जेव्हा एकटं वाटतं तेव्हा त्याच आपल्या सोबतीला
असतात.आठवणीतली माणसे ही आपली
सोबत करतात.स्मरण हे मरण येईपर्यंत असते.जगलेले आयुष्य पुन्हा पलटून बघण्यासाठी आठवणींचे पुस्तक तयार असते.
पाहिजे तेव्हा, पाहिजे ते पान पलटायचे आणि खुशाल जगायचे मनसोक्त आपल्याच विश्वात रमायचे.