दुःखाचा अनुभव प्रत्येकास आहे. किंबहुना तोच अनुभव आहे. सुखाची तर एक झुळूक असते. दुःख तर कायम,पाचवीला पुजलेले.दुःख ही एक भावना आहे. त्या भावनेची तीव्रता दाहक असते.दुःखाची कारणे हजारों लाखों असतात. ती कारणे एकसारखी नसतात.
प्रत्येकजन आपले दुःख कवटाळून बसलेला असतो.खरे म्हणजे मनुष्य दुःखाशिवाय जगू शकत नाही. कारण दुःखामध्येच जीवनाचे गमक आहे. कधीतरी दुःख दूर होईल या आशेने मनुष्य जगत राहतो.धडपड करतो.दुःखाशिवाय सुख कशाला म्हणतात ते कळत नाही. आपले सुख देखील दुःखातून होणारी सुटका आहे. दुःखच नसेल तर सुख कशाला म्हणावे!
आम्ही बालपणी वीज गायब झाली की निराश व्हायचो आणि वीज परत आली कीआनंदीत होऊन टाळ्या वाजवायचो.वीज तर अगोदरही होती.असण्याने कुणी टाळ्या वाजवल्या नाही. नसणे हि दुःख देणारी बाब असली तरी असण्याचे सुख त्यावर अवलंबून आहे.अनेक श्रीमंत माणसे अधूनमधून आपल्या अगोदरच्या गरीबीच्या आठवणी काढतात. अश्रू ढाळतात ,ते आवश्यक आहे.श्रीमंतीचे सुख गरीबीच्या आठवणीत दडलेले असते.
चार दिवस दवाखान्यात गेले , सुट्टी झाली की सगळीकडे सुख दिसते. दिवसभर शाळेत बंदिस्त मुले शाळा सुटली की धूम ठोकतात. जी मुले अगोदरच बाहेर आहेत ,त्यांना हा आनंद भेटत नाही. आपणास जितके सुख हवे
असेल तितके आपण दुःख भोगण्यास तयार असले पाहिजे.
दुःखात मनुष्य कणखर बनतो. परिस्थितीशी तडजोड करता आली तर दुःखही सुख वाटायला लागते.दुःख सुख हे केवळ शब्द आहेत. कुणीही कायम सुखी किंवा दुःखी नसते.
मी अटक असतांना खुप दुःखी झालो होतो.रडलो देखील पण भूक लागली तेव्हा पोलिसांनी जेवण दिले तिथेही मी चवीने जेवलो मी सुखी झालो.भाराभर दुःख कणभर सुखाने दूर होते.
इतरांच्या दुःखाने दुःखी व्हावे म्हणतात. मग तर दुःखाची भरच झाली.दुःखी माणसाचे दुःख दूर करावे जमले तर!
अनेक माणसे नाहक दुःखी होतात.स्वतः दुःखी राहून नाही तर स्वतः सुखी राहून इतरांचे दुःख कमी करता येते.
अपेक्षा पू्र्ण न होणे,अपमान, अवहेलना, संकटे, गरीबी,आजार,भांडणे वगैरे दुःखाची कारणेअसतात. अनेकवेळा इतरांना आपण दुःखीसमजतो.कष्टकरी लोकांबद्दल तसे वाटते.जसे गरीबांना वाटते श्रीमंत लोक सुखी आहेत. हे वास्तव नसते. मीच फक्त दुःखी आहे सारे जग मात्र सुखी आहे. माझ्याच वाट्यास सगळे दुःख आले ,अशा तक्रारीआपणऐकतो.प्रत्येक जन तक्रार करतो.माझ्यावर अन्याय झाला. मला डावलले. मला विचारत नाही. मुलं लक्ष देत नाहीत. माझ्याकडे हे नाही, ते नाही. एक ना दोन हजार गाऱ्हाणे घेत माणसे जगतात.
दुःख कुणी कशाचेही बाळगते.त्याची गरजच असते. मोठा बंगला बांधून त्यात राहत असतांनाही झोपडीतल दिवस आठवतच तो बंगल्यात राहण्याचे सुख अनुभवतो.स्कोडामध्ये फिरतांना आपला सायकल प्रवास तो सांगत राहतो.आपल्या जीवनातील संघर्ष सांगणे सर्वांना आवडतात. सर्व चरित्रे आणि आत्मचरित्रे त्यानेच भरलेली आहेत. मी कसा.सुखी आहे. कोणते थाट भोगतो याचे एकही पुस्तक नाही. दुःखाचा काळ हाच खरा जीवंत काळ असतो.तहान जितकी जास्त ,तितके पाणी पिण्याचे सुख जास्त. उन्हात फिरल्यानंतर सावलीचे महत्व कळते.ज्यांच्या वाट्याला कोणताच संघर्ष नसतो ते लोक दुःख निर्माण करतात. मनुष्य सुखाशिवाय जगू शकतो पण दुःखाशिवाय नाही. ज्यांच्याकडे सर्वकाही आहे. त्यांच्याकडे कलह यामुळेच असतो.अर्ध्या भाकरीसाठी जिथे वणवण भटकावे लागते तिथे फूकटचे कलह नसतात.जितका संघर्ष कमी तितके फूकटचे दुःख जास्त. चपलेचा अंगठा तुटला तरी दुःख होते.कुठे पायाचा तुटला तरी तमा नाही.
तमा न बाळगणे हा दुःखाला पळवून लावण्याचा मार्ग आहे. आवडीचे परिधान नाही मिळाले म्हणून सालभर दुःखी राहणारी लोक आहेत. केवळ साडीचा रंग आवडला नाही म्हणून आदळ आपट करणाऱ्या स्रिया आहेत. ज्या स्वतः तर दुःखी होतात व संपूर्ण कुंटुबीयांना दुःखी करतात. टाळण्यासारखी अनेक दुःख आहेत. थोड्याशा अकलेने दुःख दूर ठेवता येते परंतु अनेक मूर्ख लोक दुःख चघळत बसतात. क्षुल्लक गोष्टींचे दुःख करतात. आपणच आपल्या सुख दुःखाचे निर्माते आहोत. इतरांना त्यासाठी कारणीभुत मानू नये. सुख दुःख सोबतच असते. क्षणात त्याचे रंग बदलतात. आपण फक्त साक्षी बनायचे.खरे म्हणजे आपणास दु:खाची खुप गरज आहे,दु:खाचेही एक सुख असते, प्रत्येकजन ते अनुभवतो परंतु त्याने याबद्दल कधी विचार केलेला नसतो.
चला तर यापुढे दु:खाचेही स्वागत करु,दु:ख मिळाले तर त्याचाही अनुभव घेऊ!