- ना.रा.खराद
माणसाच्या अंगी असलेल्या अनेक दोषांपैकी मुजोरपणा हा दोष सर्वत्र आढळतो.मुजोरपणा ज्यांच्या अंगी असतो तो व्यक्ती कोणत्याही ठिकाणी असो मुजोरपणा करतोच.हा मुजोरपणा इतरांना फार त्रासदायक ठरतो.कितीही टाळले तरी अशा कित्येक मुजोर
लोकांशी संपर्क येतोच.
प्रत्येक व्यक्तीला मुजोरपणाला सामोरे जावे लागते.मुजोरपणाचा सोस अनेकवेळा सोसावा
लागतो.आपली गरज असेल तर मुकाट्याने तो
सहन केला जातो.कुठे कुठे तर मुजोरपणाचा कळस बघायला मिळतो.मुजोरपणा जसा स्वभावात असतो तसा तो अधिकाराने, वर्चस्वानेही निर्माण होतो.
इतरांचा अवमान, उपमर्द करणे, तुच्छ लेखणे,धमकी देणे,बढाया मारणे हा मुजोरपणाचा भाग असतो.दमनकारी भूमिका असते.लोक आपल्यासमोर तोंड उघडत नाही हा अंहकार त्याच्या ठायी असतो.
कित्येक वेळा मुजोर व्यक्ती आपली कुवत जाणत नाही ,आवेश आणि रागात गरळ ओकतो
आणि स्वतः ची फजिती करुन घेतो.
मुजोर व्यक्ती इतरांचा मुलाहिजा ठेवत नाही.छोट्याशा अधिकाराने उन्मत होतो,पिसाळतो.मुजोरपणा जिथे व्यक्ती तिथे आढळतो.बड्या अधिकाऱ्यामध्ये तर आढळतो, लहान सहान अधिकारावरली माणसे देखील
आपल्या मुजोरपणाचे प्रदर्शन करतात.नको तिथे , नको तितका तिळपापड करणे, आरडाओरडा करणे हा लोकांचा स्वभाव असतो.त्रागा, चिडचिड करणे स्थायीभाव असतो.आडमुठेपणा तर मुजोरपणाची ओळखअसते.
बसमध्ये एखादा कंडक्टर मुजोर असतो.प्रवाशांशी उद्धटपणे वागतो.त्यांना मागे ढकलतो.काहीही बोलतो.तिकिट,सूटे पैसे यावरुन आगपाखड करतो.हमरीतुमरीवर येतो.लहान मुले, स्त्रियांना ,गरीब, अपंगांना शिवीगाळ करतो .
शाळा महाविद्यालयात अशा प्रकारचे मुजोरपणा
करणारे शिक्षक असतात.आपल्या अधिकाराचा
मनमानी वापर करतात,त्यांचे ते निरंकुश वागणे
एक प्रकारे मुजोरपणाच असते.त्यांच्या अधिनस्थ विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावा लागतो.लहान चुकांबद्दल मोठी शिक्षा करणे,वाट्टेल ते उरकणे ,चूक नसतानाही मारहाण करणे, अवमान करणे वगैरे केल्या जातात.
एखाद्या बैंकेत देखील असा एखादा कर्मचारी असतोच ,तो ग्राहकांशी मुजोरपणा करतो.शंका
निरसन करत नाही.नीट समजावून सांगत नाही.
कागदे फेकून देतो.रागाने बोलतो.
पोलिस तर मुजोरपणाचा कळसच करतात.शिव्यानेच संवाद सुरू करतात.उत्तरदेण्याऐवजी उलट प्रश्न करतात.कारण नसतांनाधमकावतात.आम्ही करु तेच खरे या न्यायाने वागतात.प्रत्येक व्यक्ती गुन्हेगार असल्यासम वर्तन करतात.पोलिस आणि पुन्हा मुजोर मग तर विचारुच नका.लोकांचा किती छळ होत असेल कल्पनाच केलेली बरी!
अनेक दुकानदार खूप मुजोर असतात.गिऱ्हाईक
म्हणजे त्यांना याचक वाटतो.खुळखुळणाऱ्या पैशाच्या जोरावर मुजोरपणा खुप फोफावतो.दुकान मोठे असेल,मालक श्रीमंत असेल तर त्यास जगातले सगळी माणसे गरीब वाटतात.वेळोवेळी आपला मुजोरपणा दाखविल्याशिवाय ते राहत नाही.
पत्रकार, वार्ताहर वगैरे तर जसे जगाचे तारणहार
स्वतः ला समजतात.नेते मंडळींपैकी काही नेते
भलतेच मुजोर असतात.लोकांवर छाप टाकण्यासाठी मुजोरपणाचा अवलंब करतात.
जिथे व्यक्ती तिथे हा मुजोरपणा तळ ठोकून असतो.तो अनाठायी असतो.त्याचा त्रास इतरांना होतो.आपल्या ठिकाणी असलेला हा दोष आपण दूर करुया आणि एक चांगला माणूस म्हणून नाव करुया.लोकांशी सौजन्याने
वागूया!