जमाना झटपट आणि पटपटचा आला आहे,' वेळ नाही 'असा सर्वत्र टाहो आहे.जो तो घाईत आहे.
लवकर, हा आजचा मूलमंत्र आहे.कुणाला जेवायला तर कुणाला झोपायला वेळ नाही.कुणाकुणाला तर मरायला वेळ नाही.
आता सर्वकाही तयार मिळत आहे.आता घर बांधावे लागत नाही,पायी वारी करावी लागत नाही, कपडे शिवून घ्यावे लागत नाही,असे वाटते,आपण वस्तू वापरत नसून वस्तू आपणास वापरत आहेत.पूर्वी लोणचे,पापड घरोघरी तयार केले जायचे, अनेक प्रक्रियेतून ते जायचे,लागलेला वेळ एक वेगळाच आनंद देऊन जायचा.मुलीच्या सासरी पाठवलेले किंवा सुनेच्या माहेरहून आलेले लोणचे वेगळीच चव द्यायचे.पदार्थापेक्षा ज्या मायेने ते बनवले जायचे, त्यामुळे लज्जत वाढत असे.पूर्वी लग्नाला लागणारा विलंब आतुरता वाढवत असे, पाहुणे एकत्र आले की नाते घट्ट होत असे.आता येण्या अगोदर जाण्याची भाषा बोलली जाते.वाढत्या साधनांमुळे स्वयंपाक झटपट तयार होत आहे, परंतु विझणारी चूल,मारलेली फूंकर त्या अन्नाची गोडी आज नाही.
झटपटच्या जमान्यात कशाचीही खात्री नाही.कुणालाही थांबायला वेळ नाही.पूर्वी तपश्चर्या अनेक वर्षे चालायची तेव्हा ज्ञान प्राप्त व्हायचे,आता ज्ञान देखील रेडिमेड, पाहिजे तितके, पाहिजे ते! आता काही मिळवावे लागत नाही, फक्त पैसा मिळवायचा,बाकी सर्व मिळते.
झटपट पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत,जो तो लवकर श्रीमंत होऊ पहातो आहे.धीर आता कुणाकडेच नाही.थोडा विसावा, निवांतपणा मिळेना झाला आहे.कुणी कुठेच थांबायला तयार नाही.बसमध्ये पायरीवर पाय ठेवला,तरी गाडी थांबत नाही.दोन मिनिटे उशीर आता खुप वाटू लागला आहे.
कुणी, कुठेही, कशासाठीच थांबायला तयार नाही, सामान्य माणूस शुद्धता, माझ्याकडे वेळ नाही, असे म्हणतो.मग वेळ गेली कुठे? तासनतास गप्पा मारणारी माणसे आता दिसत नाही.जवळच्या नातेवाईकाच्या घरी जायला वेळ नाही.चहाच्या टपरीवर एक मिनिट थांबायला आपण तयार नाही.जीवनातील अशी घाई म्हणजे निव्वळ कुत्रा धावतो तशी आहे.निवांत थांबवण्यात, बोलण्यात एक वेगळीच गंमत असते,ती अशा झटपट मध्ये कधीच नसते.आपण जर कुठेच स्थिर होत नसू, त्यासाठी आवश्यक तितका वेळ देणार नसू, तिथे पूर्ण मनानं बसत नसू,तर हे अस्थैर्य आहे, आणि हे अस्थैर्य म्हणजे अशांती आहे, आणि या अशांती मुळे आपण सुख गमावून बसलो आजेवताना देखील झटपट, चर्वण करायला वेळ नाही.माणसाचे असे हे जगणे, माणसाला झटपट संपवते.
थांबणे,वाट बघणे यामध्ये आतुरता असते.पाहिजे ते झटपट पाहिजे अशी मानसिकता टिकाऊ नसते.लगेच सांग, मला आताच पाहिजे हा आग्रह उपयोगी नाही.घाई योग्य नाही.थोडा वेळ, उसंत हवी.आजची सर्व धावपळ यातून होणारा मनस्ताप, किंवा ओढाताण जीवघेणी ठरते.सतत उद्विग्न असणे, खुप क्रुर आहे.रममाण होणं गरजेचे आहे,आपले छंद जोपासण्यासाठी उसंत हवी, मानसिक स्थैर्य हवे.या झटपटच्या नांदी लागून आयुष्य झटपट संपून जाते.थोडे वेळ द्यायला शिका, निवांत राह्यला शिका.
थोडा वेळ द्यायचे शिकले पाहिजे.उसंत असली पाहिजे.निवांत राहता आले पाहिजे.सतत धावाधाव योग्य नसते.कधीतरी थांबले पाहिजे.मी अगदी निवांत आहे,असे वाटले आणि बोलले पाहिजे.तरच त्या जगण्याला अर्थ आहे.थांबला तो संपला,असे नाही तर जो थांबला नाही तो संपला हे खरे आहे.