जर ...तर..!
-ना.रा.खराद
आपले बहुतेक निर्णय जर आणि तर वर अवलंबून असतात.जर अटळ असला की तर मदतीला धावतो आणि कोणत्या तरी मार्गाने वेळ निभावून नेतो.जर काल्पनिक असतो,बिनभरवशाचा असतो, तर मात्र खुप लवचिक असतो.जरने दगा दिला की तर लगेच उभा राहतो.
आपले भवितव्य जरचा परिपाक असते.जरशिवाय तरचे काही अस्तित्व नाही.जर ही घटना आहे,तर प्रतिक्रिया.
जर नुसार तर ला धावावे लागते.जिथे तिथे जर तरच्या भाषेत बोलले जाते.जो तो या जर तरच्या विळख्यात अडकलेला असतो.,' जर तु खरे बोललास ,तर तुला माफ केले जाईल.' जर मला अगोदर सांगितले असते,तर मी कशाला आलो असतो.'
सर्व भाकिते , गणितं या जर तर सुत्राचा वापर करतात.तर ही तजवीज असते.'वीज गायब झाले तर जनरेटर वापरु'. जर अनिश्चित असतो,तो कधी कसा फिरेल सांगता येत नाही.तर हा उपाय असतो.तर सोबतीला असेल ,तर जरला घाबरण्याचे कारण नाही.तर हा जसा परिणाम आहे,तसा तो परिपाक देखील आहे, प्रतिक्रिया शुद्धा आहे.जिथे तिथे जरचा पसारा आहे.तर नेहमी जरचा पाठलाग करतो.जर नामोहरम करतो तेव्हा तर हा दिमतीला असतो.तर हा पर्याय आहे.
जर या अटींच्या शब्दाचा खुप वापर होतो, किंबहुना त्याशिवाय कोणतेच कार्य तडीस जात नाही.जो तो जिथे तिथे या शब्दानेच आपल्या बोलण्याची सुरुवात करतो.जरचा दबदबा सर्वत्र आहे.जर हा सर्व प्रकारात मोडतो.तो भाकीत, सूचना,गरज,धमकी, भीती, शंका, आह्वान,अटी,यश, शंका अशा कितीतरी गोष्टी
धमकी देण्यासाठी देखील जरचा उपयोग केला जातो.‘ तु माझे ऐकले नाही तर बघ.' किंवा ‘ जर तु माझे पैसे परत नाही केले तर.' कायम कानावर पडणारा शब्द जर आणि तर आहे.जर आणि तर हे जुळे शब्द आहेत.जर मी तिथे असतो किंवा मला जर ते लवकर कळले असते.घडून गेलेल्या अनेक गोष्टींचा पश्चात्ताप जर तरच्या भाषेत होतो.जर तो वेळेवर पोहचला असता. अथवा जर एक गुण अजुन मिळाला असता तर तो अधिकारी असता वगैरे.
सोयरिक जुळविताना जर मुलाला मुलगी पसंत पडली तर..! पुढची बोलणी करु.
जर मध्ये घटनांची शाश्वती नसते, परंतु तर हा पर्याय सुचवतो.ऐनवेळी येणारे प्रसंग या तरच्या माध्यमातून सुटतात.जर हा लहरी आहे.त्याची लहर कशी फिरेल ह्याचा अंदाज बांधता आला पाहिजे, तेव्हा तर हा
अचुक उपाय शोधू शकतो. सावधगिरीची बाजू म्हणून तर काम करतो.
एखाद्यास , जर तु असे वागला,तर कसे होईल.जर कळत नसेल तर तुझे तु बघ.जर ही अट असते.जर एक शर्त असते.जरचे पालन केले तरच कार्य सिद्ध होते.
केवळ आकड्यांचे गणित नाही,तर संपूर्ण जीवनाचे गणित या जर तरच्या सुत्राचा आधार घेऊन चालते.