- ना.रा.खराद
प्रत्येकास निवाऱ्यासाठी घर हवे असते.बहुतेकांचे ते असते.
ज्यांचे नसते , ज्यांचा जन्मच भाड्याच्या घरात झालेला असतो,
अशा भाडेकरुंची गरज लक्षात घेऊन अनेकांनी भाड्याने घर देणे हा व्यवसाय सुरू
केला.कित्येक घरमालक भाड्याच्या पैशावर आपली उपजीविका भागवितात.
ऐपतीप्रमाणेघर किंवा खोली निवडावी लागते.घरमालकही अनेक तऱ्हेचे असतात.प्रश्नांचा इतका भडीमार करतात की इतके उत्तरे देऊन अधिकारी होता आले असते.
घरमालकांमध्ये काही गरजवंत असतात.घर खाली ठेवले की त्यांचे घर चालत नाही.
असले घरमालक फारशी चौकशी न करता ,भाड्याने घर देऊन टाकतात.
थोडेसे समृद्ध व्यावसायिक घरमालक फार चोखंदळ असतात, त्यांच्या समोर संपूर्ण जन्मकुंडलीच मांडावी लागते.
लग्न जुळवणी इतकेच भाडे जुळवणे कठीण जाते.घरमालकाकडे घरात कायम असणारे सदस्य भाडेकरूवर पाळत ठेवून असतात.तहाप्रमाणे सर्व काही चालले की नाही ,हे ते बघतात आणि दैनिक समाचार
ते मुख्य मालकाला कळवतात.काही घरमालक हळूहळू घर मालक न राहता नुसते मालक होऊन जातात.पुरुषांच्या गैरहजेरीत स्त्रियांचे शीतयुद्ध सुरूच असते.घरमालकाची किंवा भाडेकरूंची पोरं कळीचा
मुद्दा असतात.त्यांना घरमालक आणि भाडेकरू या जन्मजात शत्रु बद्दल काही समज नसते.
कित्येक घरमालक एक तारखेलाच दारावर हजर असतात.नोकरदाराची एक तारीख एक
डोकेदुखी असते.भाड्याच्या घरात रहाणे मोठे कसरतीचे असते.घर एक मालक अनेक.पुन्हा घराला कुठलीही इजा होऊ न देता तिथे वास करायचा असतो.नळाचे पाणी,वीज यावर घरमालक करडी नजर ठेवून असतात.आपल्याकडे येणारे जाणारे यांचा ताळेबंद ठेवतात.
खुप घरमालक शाकाहारी असतात.भाडेकरु देखील शाकाहारी असल्याची खात्री करुन घेतात.रविवार वगैरे दिवशी स्वयंपाकघरात घुसून बघतात.किंवा वेगळा दर्प येतो की काय याची शहानिशा करतात.
कित्येक घरमालक मुख्य गेट ठरलेल्या वेळी बंद करतात ,आपला भाडेकरू अवेळी घरी
येणारा नसावा ,असा त्यांचा दंडक असतो.
मालकापासून कितीही त्रास झाला तरी चालतो परंतु भाडेकरूकडून तो होता कामा नये."आम्ही दोन पैसे जास्त घेतो पण भाडेकरूंशी भांडत नाही." न भांडण्याचे देखील भाडे घेतले जाते.
कित्येक घरमालक खुप गंभीरअसतात.सनकी,तापट असतात."खोली खाली रहायली तरी चालेल पण गोंगाट चालणार नाही." असे लोक पारतंत्र्यात हवे होते ,असे उगीच वाटून जाते.
घर काड्याचे,शेणाचे,मातीचे ,कपड्याचे कशाचेही असावे परंतु ते आपले असावे.
भाडेकरू कुणीच असू नये एवढेच वाटते.