- ना.रा.खराद
संस्थाचालकाकडून मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना मारहाण, मुख्याध्यापकाने शिक्षकास झोडपले किंवा शिक्षकाने मुख्याध्यापकास! शिक्षकाने शिक्षकास मारहाण केली तर कधी पालकांकडून शिक्षकास मारहाण.शिक्षकाची विद्यार्थ्यांस मारहाण तर कधीतरी विद्यार्थ्यांकडून शिक्षकास मारहाण!! अशा बातम्या रोज
झळकतात, तेव्हा मन सुन्न होते.शिक्षण क्षेत्रात हिंसेचा शिरकाव चिंतेची बाब आहे.
किमान हे क्षेत्र तरी हिंसेला अपवाद ठरेल,असे वाटत होते परंतु इथेही निराशाच. वैचारिक क्षेत्रात मतभेद असणे नवलाचे नाही.विद्यार्थांच्या हितासाठी शिक्षकांची खलबते, विचारविनिमय यामध्ये चुकीचे काही नाही, परंतु व्यक्तिगत फायद्यासाठी, वर्चस्व किंवा महत्वाकांक्षेसाठी आकांडतांडव करणे ,प्रसंगी हिंसक होणे सर्वथा चुकीचे आहे.
कुणी खुपच गंभीर चूक केली असेल त्यासाठी रितसर, कायदेशीर मार्ग आहे, परंतु तितका संयम जर या क्षेत्रातील लोकांकडे नसेल तर शिक्षणाचे भवितव्य धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही.निर्भय अशा शैक्षणिक वातावरणतच निकोप असे शिक्षण होऊ शकते, हिंसेने ते कसे टिकणार?
शिक्षणात देखील टोळीयुद्ध सुरू होते की काय,असे वाटू लागले आहे.अंहकार आणि महत्वाकांक्षा यांनी पछाडलेले , ईर्ष्या, द्वेष यांनी पेटलेली माणसे कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही.ही अन्य माणसे
शिक्षण क्षेत्रातील राक्षस आहेत.या क्षेत्राचा
सत्यानाश करण्याचे पातक काही लोक
करतांना दिसत आहेत.निकोप, निर्भेळ,निर्भय वातावरणातच शिक्षणाचे ध्येय साध्य होऊ शकते, मात्र हिंसेचे वाढते बळ हे साध्य होऊ देत नाही.
गलेलठ्ठ पगारामुळे शिक्षकांना आलेली सुबत्ता याचा उपयोग अधिक वाचन,चिंतन,मनन यासाठी व्हायला हवा.विविध कौशल्य,छंद जोपासले जावेत
यासाठी उपयोग व्हावा,त्या पैशातून मस्तवालपणा, बेफिकिरी वाढत असेल तर हा न पचलेला पैसा आहे.
आजच्या शिक्षक दिनाची या क्षेत्रातील सर्व
घटकांनी हिंसेपासून दूर राहण्याचा संकल्प
केला पाहिजे.विवेकाने वागून संयम बाळगला पाहिजे.वैचारिक मतभेद हे वैचारिकच राहिले पाहिजे.व्यक्तिगत आकस बाजूला सारून एकत्रितपणे विद्यार्थी हित बघितले पाहिजे.षडयंत्र, कूटनीती ह्याला थारा असता कामा नये.खल प्रवृत्ती सोडून
आपण शिक्षक असल्याचे कायम भान ठेवले पाहिजे.एक चांगला समाज घडविण्याचे पवित्र व महान कार्य आपण हाती घेतलेले आहे,ते चोखपणे बजावत असताना हिंसेचा वापर बिलकुल होता कामा नये,तरच ते शक्य होईल.नसता त्याचे पातक आपल्या वाट्याला येईल, यामध्ये कुठलीही शंका नाही.