- ना.रा.खराद
अनेक विद्वानांनी, शिक्षणतज्ञांनी, महापुरुषांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे, त्यामध्ये मी भर टाकावी एवढ्या पात्रतेचा मी नाही परंतु या व्याखेचा प्रयोग जो बालकांवर होतो ,त्याचा एक बळी मी देखील आहे, म्हणून काही गोष्टींचा ऊहापोह!
चूकीचे किंवा चूकीच्या पद्धतीने शिक्षण घेतल्यापेक्षा
ते न घेतलेले या मताचा मी आहे.
भारतामध्ये तर सुरुवातीला मुलींना व इतर उपेक्षित घटकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, यावरुन शिक्षण हे
किती संकुचित,अघोरी,अर्धवट ,तकलादू, अन्यायकारक ,लादलेले होते हे लक्षात येते.शिक्षण देणारे
ठरवत की ते कुणी घ्यायचे.
अक्षरओळख हिच शिक्षितांची ओळख झाली.जे शिकले ते साक्षर ,इतर निरक्षर! मग थोडेफार शिकले तरी साहेब झाले, कारभारी झाले आणि मग झाली शोषणाची शिक्षित सुरूवात.
ज्यांना वाचता येऊ लागले,ते झपाटून वाचू लागले.वाचता
वाचता लिहू लागले.शिकवू लागले एकंदरीत ठराविक लोकांची मक्तेदारी, वर्चस्व शिक्षणावर निर्माण झाले.
पुढे प्रचलित शिक्षण पद्धती आली.अभ्यासक्रम ठरु लागले.लिहिणारे,शिकवणारे सगळे एका माळेचे मणी.त्यांना हवे तसेच शिक्षण देण्यात येऊ लागले.शिक्षणातील कित्येक वर्षे भाकडकथा सांगण्यात गेली.संस्कार,आदर्श , व्यक्तीपुजेत समाज इतका अडकला की तो अडकला हे देखील त्यास कधीच कळले
नाही.दोरी समजून साप धरल्यासारखे होते सर्व!
त्यामुळे शिक्षणातून कधीच क्रांती निर्माण झाली नाही,हा, कारकून निर्माण झाले! साहेब झाले.
शिक्षणातील एक अघोरी प्रकार म्हणजे घोकंपट्टी , कित्येक वर्षे तो टिकला.बाराखडी,उजळणी,
कविता,गणिती सूत्र तोंडपाठ असले की झाले शिक्षण!पोपटपंची हेच शिक्षण मानले जाऊ लागले. रेड्यामूखी वेद वदवून घेणाऱ्या ज्ञानेश्वराप्रमाणे शिक्षक अर्थात गुरुजी शिष्यांकडून ते सर्व वदवून घेत.शारिरिक शिक्षेची
मुभा असल्याने यशाची पक्की खात्री.पुन्हा गुरु विष्णू, महेश्वर आणि परब्रह्म देखील.गुरुला अति महत्व दिल्याने
त्यांच्या विषयी शंका घेण्याचा प्रश्नच नव्हता.अर्थाविना पोथी वाचन हा त्याच घोकंपट्टीचा परिपाक!
इंग्रजांच्या काळात त्यामध्ये काही बदल झाला.तो इंग्रजांनी त्यांच्या सोयीचा केला.एकवाक्यता त्यामध्ये मुळीच नव्हती.
स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे निर्माण करण्यात आली.
सर्वांसाठी शिक्षण खुले झाले.गरीब, वंचित, बहुजन समाजातील मुलं मुली शिकू लागली आणि समाज परिवर्तन होऊ लागले.
खाजगी शिक्षणसंस्था हा प्रकार उदयास आला आणि शोषणाचे एक नवे दालनच जसे खुले झाले.अनेक शिक्षण सम्राट , काही अपवाद.स्वैर झाले.शिक्षण जरी वाघिणीचे दूध असले तरी गुरगुराचे नाही .
अनेक शिक्षणसंस्था चांगले कार्य करीत असल्या तरी बहुतेक संस्था बरबटलेल्या आहेत.त्यामुळे शिक्षणाचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत.जिथे शिक्षकांची अवहेलना ,छळ,शोषण होत असेल अशा शिक्षणातून कधीच क्रांती होत नाही.
समाज हा शाळेचे प्रतिबिंब आहे, त्यामुळे शाळा खुपचं
चांगल्या असल्या पाहिजेत.निकोप वातावरण, तळमळीचे शिक्षकच या समाजाला काही देऊ शकतात.
आतापर्यंत जे होते ते होते, यापुढे शिक्षणातून अपेक्षित असलेले सर्व साध्य झाले पाहिजे.आता आपण नवभारत
घडविणार आहोत.विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून सर्वांनी त्यांचे
हित बघायचे आहे.लादायचे काही नाही फक्त त्याचा विवेक जागृत करायचा आहे आणि एक व्यक्तीमत्व संपन्न नागरिक घडवायचा आहे.
चला तर आपण सर्व खारीचा वाटा उचलूया!