जिथे नांदते एक वेगळे जग.निरागस जिवांचा वावर.स्वछंदी पाखरांचे थवे जसे.
सर्व अमंगळ भेद विसरून खऱ्या मंदिराची जाणीव व्हावी अशी जागा.
शाळा जिथे अक्षर गिरवले जाते.जगातील सर्व जे सत आणि सुंदर आहे त्याची शिकवण दिली. जाते.एक स्वस्थ समाज घडविण्याचे कार्य जिथे केले जाते.माणसातलं पशुत्व जिथे नष्ट करून
पशुवरही प्रेम जिथे शिकवले जाते.एखाद्या करोडपतीचा पाल्य हातात झाडू घेऊन शाळा स्वच्छ करतो तेव्हा शाळा या शब्दाची ताकद समजते.शाळा सोडतांना विद्यार्थ्यांचे पानावणारे डोळे बघितले की शाळा काय असते कळते.
रस्त्यावर चालतांना मुल जेव्हा, आई बघ ते आमचे सर आहेत .असं अभिमानाने सांगतात तेव्हा, आस्था शब्दाचा अर्थ कळू लागतो.पुजाऱ्याशिवाय जिथे भक्ती असते. शिकणे हेच भजन असते.
शाळा मनातून कधीच जात नाही.आमची शाळा म्हणतांना ऊर दाटून येतो.
शाळेकडे गप्पा मारत चालणारी चिमुकली पावले . आपलं दफ्तर नीट सांभाळत धिंगामस्ती, जगण्यातली मौज सांगते. आईनं टिफिन मध्ये दिलेलं धपाटं .मधल्या सुट्टीतला बेत.
शिक्षकांचा मायेचा हात,प्रेमाची दृष्टी आणि सत्याचा स्वर जिथे अनुभवायला मिळतो ती जागा म्हणजे शाळा.मानवता हाच खरा धर्म आहे, असं जिथे वातावरण असते.असंख्य मित्रांसोबत जिथे खेळायला मिळते, गप्पा मारायला मिळतात ती जागा म्हणजे शाळा.
एखाद्या कटाक्षाने दिवस मजेत जाईल असे वातावरण जिथे असते.आमचे सर ,हा जिव्हाळा जिथे असतो.कुणी खोडी काढली तर ,मी अमूक सरला सांगेन हा विश्वास जिथे असतो ती शाळा असते.
कोट्याधीशाचा मुलगा देखील खिचडीसाठी रांगेत असतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक
वेगळी तृप्ती असते हे जिथे बघायला मिळते ती शाळा असते.
जात धर्म याच्या पलीकडे मानवता जिथे धर्म असतो ती शाळा. वाईट प्रवृत्ती आणि विचार
ज्या ठिकाणी पुसले जातात.विश्वची माझे घर शिकवण जिथे असते.जगाला प्रेम अर्पावे
असा सदभाव जिथे असतो,ती शाळा! श्रमाची जिथे लाज नाही,उलट आवड असते ती शाळा.माझी शाळा म्हणताना फुगणारी छाती सांगते,शाळा खरेच काय असते.
दिवसभर प्राप्त केलेली शिदोरी घेऊन ,सुट्टी झाली की घराकडे धावणारी मुले बघून
जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.हजारों विद्यार्थ्यांशी आलेला संपर्क , त्यातून
निर्माण झालेलं नातं,हेच माझं धन आहे.