घडामोडी

                     घडामोडी
                               - नारायण 
जीवन म्हणजे घडामोडींची मालिकाच आहे,त्याचा शेवट देह नष्ट होतो , पुन्हा जन्म होतो.
बालवयात वाळूचे खोपे बनवायचे आणि पुन्हा मिटवायचे, चिखलाचे बैल वगैरे निर्माण करायचे पुन्हा नष्ट करायचे.फाटलेल्या चड्डीला ठिगळ लावलं जायचं.आता लक्षात येतंय संपूर्ण आयुष्य घडामोडींनी भरलेले आहे.निर्माण आणि नष्ट करण्यात आयुष्य काठावर पोहोचते.
जूने जाऊ द्या..कवी उगीच नाही म्हणत.काळाच्या ओघात अनेक गोष्टी नष्ट होतात, नव्या उदयास येतात.जूने घर पाडून नवी 🏠 घरे बांधली जातात.काहीतरी विकून काही तरी खरेदी केले जाते.दागदागिने तर सतत आपले रंगरुप पालटत राहतात.भंगार समजून फेकलेले कुणीतरी डागडुजी करून उपयोगात आणते.
कधी भूकंप,वादळ येते, खुप काही नष्ट होते, परंतु जीवन थांबत नाही, पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली जाते.
जे आज जसे आहे, ते उद्या तसेच असेल असे नाही.कोणत्याही वेळी काहीही बदल होऊ शकतो, कारण घडामोडींची प्रक्रिया कधीच थांबत नाही.रात्री कळी अवस्थेत असलेलं फूल सकाळी उमललेल्या अवस्थेत दिसते,नंतर कोमेजून जाते.घडामोडीचा एक स्रोत असतो,तो थांबणार नाही.स्थित्यतंर जीवनाचा अविभाज्य भाग आहे.उंच डोंगर भूईसपाट होतात.जगाचे नकाशे बदलतात, सत्ता बदलते.
मुलगी सासरी जाते,सुन घरात येते.आजोबा मरण पावतात,नातू जन्माला येतो.
निसर्ग देखील आपले रंग सतत बदलत राहतो.बदलणे हेच जीवनाचे संतुलन आहे.
मुर्दाड,कठोर, साचेबद्ध हे काय जीवन आहे, कधीतरी ओसंडून वाहिले पाहिजे.जसा समुद्र कधीतरी खवळतो,शांत वाहणारे वारे कधीतरी सुसाट वेगाने वाहते.एरवी शांत असणारे ढग कधी कधी गर्जना करतात.
आपला एकच एक स्वभाव घेऊन जगू नका,सतत बदलत रहावे.जीवनाचे सर्व पैलू न्याहाळावे , घडामोडींची भीती बाळगू नये.
जोडतोड, तडजोड, मोडतोड जीवनातील अविभाज्य भाग आहे,त्याचा खेद नसावा.मानवाचा संपूर्ण इतिहास हा घडामोडींचा आहे.जगात सातत्याने काही बदल होत असतात.कधीकाळी राजेशाही होती,आता लोकशाही.कित्येक देश एकाचे दोन तीन झाले,तर अनेकांचे एक झाले.
संयुक्त कुटुंब विभक्त होते.जूने पूल पाडून
नवे बांधले जातात.जसे निर्माण सातत्याने होत असते, तितक्याच प्रमाणात नष्टही होत असते.
जूने विकून नवे खरेदी केले जाते.इथले विकून, तिथे खरेदी केले जाते.शासनकर्ते बदलत राहतात.मंडप उभा केला जातो , आडवा केला जातो.झाड वाढवले जाते, तोडले जाते.खुप निखळते, गळून पडते.
घडामोडींना कधीच घाबरायचे नसते.जे अटल आहे, ते घडणारच , आपण फक्त नवीन काही करत रहायचे.
रद्दी, कचरा, भंगार केव्हातरी उपयुक्त ,मोलाचे होते.आज जे मोलाचं आहे, ते उद्या व्यर्थ ठरु शकते.मोलहीनला
मोल प्राप्त होऊ शकते.घडामोडीचा हा स्रोत कायम सुरू असतो.
जसे डोक्यावरचे केस कधीकाळी काळे होते,दाट होते.काळानुरुप ते रंग बदलतात.
अनेक शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होऊ शकतो.या घडामोडींचा स्विकार करणे आणि त्यांना सामोरे जाणे हेच खरे जीवन होय.
       
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.