उचापती

                     उचापती
                             - ना.रा.खराद

माणसांच्या अनेक प्रवृत्ती असतात, त्यानुसार तो आचरण करतो.काही प्रवृत्ती या सदोष असतात, परंतु आत्मपरीक्षण न केल्याने त्या दिसून येत नाहीत, मात्र इतरांच्या नजरेतून त्या सूटत नाहीत.
उचापती, ही एक अशीच प्रवृत्ती आहे.नको तिथे व नको त्यामध्ये नाक खुपसण्याची ही प्रवृत्ती आहे.आपला कुठलाही फायदा किंवा नुकसान नसतांना उचापतीखोर मनुष्य उचापती काढत असतो आणि स्वतः ला अडचणीत आणत असतो.
उचापतीखोर माणसे प्रतिक्रियाशील असतात, त्यांच्याकडे वाणी संयम नसतो.हात दाखवून अवलक्षण ओढून घेणारी ही माणसे असतात.ज्या बाबींमध्ये आपला दुरान्वयानेही काडीमात्र संबंध नाही,अशाही स्थितीत तिथे
ही मंडळी कावळ्यासारखी टपलेली असतात.
अशा लोकांना इतरांच्या जीवनामध्ये फार डोकावण्याची सवय असते.इतरांचे गुपिते माहिती करुन घेणे आणि त्याचा प्रसार करणे उचापतीखोरांचा खुराक असतो.
सरळमार्गी जीवन त्यांना नको असते, काहीतरी विपरीत घडले तरच त्यांना आनंद होतो.
संशयी प्रवृत्तीची ही माणसे बुद्धीभेद करण्यात पटाईत असतात.नको तिथे जाऊन, नको ती माहिती जमा करणे व लोकांच्या न्यूनतेवर बोट ठेवणे , यामध्ये आयुष्य खर्ची
घालतात.इतरांच्या जीवनामध्ये नाहक हस्तक्षेप करणे, निंदा करणे उचापतीचा प्रकार आहे.प्रत्येक ठिकाणी डोकावण्याची सवय या लोकांना असते.कुणी काही खरेदी केले की,पैसे कोठून आणले असतील?,गाडी खरेदी केली की, काय गरज गाडीची?, घर बांधले की,घेतले असेल कर्ज!नकारार्थी प्रतिक्रिया ठरलेली.
स्वतःच्या जीवनात रस असणारी माणसे इतरांचे वाभाडे
काढत बसत नाहीत.इतरांचे विषय चघळत नाही.आपल्याशी संबंधित बाबींमध्ये आपण अवश्य लक्ष
दिले पाहिजे, परंतु उगीचच कशामध्ये लक्ष घालू नये.
कुणाच्याही बाबतीत फार माहिती घेऊ नये, फार खोलात
जाऊ नये.उगीच त्रास करुन घेऊ नये आणि कुणाला त्रास देऊ नये.
रिकाम्या वेळेत आपले छंद जोपासले पाहिजेत, उचापती
हा छंद असू नये.जीवन अमूल्य आहे, ते स्वतःसाठी खर्च
करावे, इतरांची माहिती संकलित करण्याची गरज नाही.
नाहक प्रश्न करणे, सूचना करणे, प्रतिक्रिया देणे जर टाळले तर जीवन सुखकर होईल.
उचापतीखोर प्रवृत्ती अत्यंत वाईट असते.त्यामधून काही
साध्य होत नाही.अकारण काही उकरुन काढणे वेडेपणा आहे.या प्रवृत्ती पासून दूर राहून आपण सुखाने जगू शकतो.
                         
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.