कार 'भारी

                        'कार 'भारी
                                         - ना.रा.खराद
दसऱ्याचा मुहूर्त साधत मी कार खरेदी केली.मला अजुन कळाले नाही, मुहूर्त काय असतो.असो,अनेक गोष्टी आपण नकळत करतो.चाळीतल्या मोजक्या लोकांना तशी चाहूल लागलेलीच होती.दसरा म्हटलं की चाळीत नवी कार येणार हे ठरलेलेच.तसे आमच्या चाळीत चाकरमानेच जास्त.पहिल्या पंधरा वर्षांत घर आणि पुढच्या पंधरात गाडी
हे नोकरदारांचे व सपरिवार स्वप्न असते.वरची कमाई असणारे चाकरमाने हे यश लवकर संपादन करतात.तोंडावर शुभेच्छा देणारे लोक माघारी मात्र चांगलेच उटणे काढतात." दोन नं चा पैसा आहे, पगार तर लंगोट घ्यायला तरी पुरतो का!" 
गाडी घरी आणायची म्हणजे सपरिवार शो रुम गाठावे लागते.तेथील झगमगाट बघून डोळे दिपून जातात.दिपलेल्या डोळ्यांना स्पष्ट दिसत नसते.बायका पोरांच्या चेहऱ्यावर कधी नव्हे एवढे समाधान असते.आपण माणसांमुळे
नाही तर त्याने मिळवलेल्या वस्तूंमुळे खुश होतो,हेही अनुभवयाला मिळाले.शोरुमधले ते
व्यावसायिक स्वागत फारच लोभस होते. आमच्याकडे गाडीची चावी सोपवली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते की," खुदा खैर करे.." पुजा वगैरे उरकण्यात आली.मुले दरवाजा उघडून आत शिरली.हार्न गरज नसतांना वाजवले.शहराबाहेर पडलो.नव्या गाडीत बसण्याचा आनंद घेत चाळीत पोहचलो.सणामुळे सर्व रहिवासी घरीच होते.
गाडी चाळीत पोहचली तसे पोरं जमा झाली. पळत जाऊन घरी सांगू लागली," त्या काकांनी
नवी कार आणली." चाळीतले लोक ते ,लागले प्रतिक्रिया द्यायला. एक गृहस्थ म्हणे," इथं सायकल लावायला जागा नाही आणि आला कार घेऊन, काही कळतं का लोकांना." 
लोक म्हणजे स्वत: वगळून सर्व. एक गृहस्थ गाडीजवळ आले आणि," काय किंमत?" मी म्हणालो ," सात लाख." तो गृहस्थ मोठ्या हीन भावनेनं बोलला ," आमच्या रमेशने मागच्या वर्षी पंचवीस लाखांची गाडी घेतली."
माझ्या सात लाखांचे त्यांनी मातेरे करुन टाकले.किमान त्यावेळी तरी त्यांनी ते बोलायला नको होते.
चाळीतल्या चाळीसीतल्या बायकां कुजबुज करत होत्या." एवढा पैसा कोठून आणतो,काय
ठाऊक." दूसरी म्हणे,"तिकडे लोकांचे मुंडके मोडतो आणि भरतो घर." कुणीतरी बोलले,"
सगळं बायकोचं ऐकतो बैलोबा." माहेरुन चार पैसे आणले असतील,लागली तोरा मिरायला."
कुणी कारचा रंग चांगला नसल्याचे नमूद केले. कुणी आपण कार घेण्याची घाई केली असे म्हणाले तर कुणी फारच उशीर केला असेही म्हणाले.
शेजारचे गणपतरावांनी तर ,"कोणत्या बॅंकेचे फायनान्स केले?" असे सर्वांसमक्ष विचारले.
काठावर पास झालेल्या मुलाला त्याचे मार्क विचाराल्यासारखे वाटले. कार म्हटलं की लोन
हे नातं इतकं घट्ट झाले आहे .
एकाने तर फार खोचक प्रश्न केला,"कार घेतली,आता डिझेलला पैसे कोठून आणणार?" मी मजेत म्हणालो,"तुम्ही आहात ना." तेव्हा त्यांना बरे वाटले.
चाळीतल्या लोकांचे प्रश्न आणि सूचना न संपणाऱ्या होत्या.त्यांना बगल देत मी घरात
शिरलो परंतु चाळीतल्या लोकांचे बोल मी विसरु शकलो नाही.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.