वाचाळवीर

                वाचाळवीर!
 कर्तृत्व शुन्य माणसे वाचाळ असतात,नुसते बडबडणे त्यांच्या स्वभावात असते, अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी माणसे बाष्पळ गोष्टी करण्यात पटाईत असतात, लोक आपल्या विनोदाला नाही तर आपल्याला हसत आहेत ,इतकी साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही, त्यांना अधिकच चेव चढतो आणि ते अधिकच चेकाळून जातात.वेळ,काळ ह्याचे भान ठेवत नाही, तारतम्य सोडलेली वेडपट माणसे आपल्या अवतीभवती आढळतात.
  मोठमोठ्याने बोलणे,सतत बोलणे,कुणाचे ऐकून न घेणे, शिष्टाचार, मानसन्मान नसणे,
 अशी वैगुण्य यांच्या ठिकाणी वसतात.इतरांची खिल्ली उडवणे,टर उडवणे, मानहानी करणे यांना आवडते.कोणतेही ध्येय नसलेली, भरकटलेली, बुरसटलेली हि माणसे असतात.कुत्सित बुद्धी,कुटाळकी करत राहणे इतकाच उद्योग ते सतत करतात.मान अपमान कशासोबत खातात त्यांना ठाऊक नसते.कुणाचेही कोणतेही यश त्यांना खुपते.शिक्षित असले तर गर्व त्यांच्या ठायी असतो.आपला मूर्खपणा हाच ते शहाणपण समजतात.
    मनात येईल ते बोलायचे, इतकेच त्यांना ठाऊक असते,नुसती चिखलफेक करत राहणे त्यांचा एकमेव उद्योग असतो.निंदा त्यांचा आहार असतो,मत्सर त्यांचा गुणधर्म असतो.सर्व घाण तोंडावाटे बाहेर काढणारी ही माणसे असतात.चांगले त्यांना सहन होत नाही, चांगल्याला वाईट ठरवण्यासाठी ते प्रयत्न करतात, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो आणि किंमतही परंतु काही विचित्र लोक अशांना प्रोत्साहन देतात.
      बाष्पळ लोक काही उपयोगी नसतात, विश्वसनीय नसतात, कर्तृत्वशुन्य असतात.
वाचाळवीर हे भित्रे ,पळकुटे असतात.नको तेव्हा बडबडणारी माणसे खरी वेळ आली की सापडत नाहीत,पळ काढतात.
   वाचाळ वेळेचा अपव्यय करतो.इतरांना काय त्रास होतो आहे, ह्याचा तो विचार करत नाही, कुठलेही औचित्य पाळत नाही.त्याच्या शब्दाला किंमत नसल्याने तो काहीही वटवट करत राहतो.वाचाळाच्या हातून कुठलेही महद कार्य घडत नाही, त्याच्या अंगी बालिशपणा असतो.त्याची वाचा झोपेल तरच बंद राहते,बोलत राहणे इतकेच तो काम करतो.त्याची बडबड म्हणजे बारा गाड्यांची खडखड असते,तो नुसता सुसाट सुटतो,त्यास वेग असतो, परंतु दिशा नसते.
        वाचाळ माणूस कुणालाही आवडत नाही, वाचाळता मानसिक रोग आहे.आत्मभान नसलेली माणसे वाचाळ असतात.काही करुन दाखवण्या ऐवजी फक्त बडबड करत राहणे या वाचाळांचा
उद्योग असतो, असले बोलघेवडे लोक कोणत्याच उपयोगाची नसतात.
                 
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.