बायकांनो एवढे कराच!

           बायकांनो एवढे कराच!
अखिल भारतीय विवाहित महिला भगिनींची क्षमा मागून काही कानगोष्टी सांगू इच्छितो.
क्षमा यासाठी की महिलांचा अपमान झाला किंवा उपमर्द झाला तर सर्व स्री संघटना जाग्या
होतील आणि अगोदरच गलितगात्र झालेल्या
माझ्या सारख्या पामराला वेठीस धरतील.तसा
पुरुषाला हा देखील अधिकार नसतो की तो बायकोपासून होणारा त्रास कुणाला सांगू शकतो.मध्यस्थी नसल्याने कुणाचे चुकते हे कळायला मार्ग नसतो.भांडणात ज्याची सरशी
होईल तो जिंकतो.
नवरा-बायको मधील भांडणे का होतात, याविषयी चिंतन आवश्यक आहे.उभयतांच्या भांडणाचा थेट परिणाम मुलांवर होतो आणि मुले हिरमुसली जातात, किंवा वाह्यात तरी होतात.
नवरा-बायकोचे नाते तसे सात जन्माचे परंतु काही महिन्यांतच त्यास घरघर लागते.लाखों
घटस्फोट होतात.कौटुंबिक कलह असतो.कसाबसा संसार पुढे ढकलत असतात.
या भांडणाचे मूळ कारण विवाह प्रथेत आहे.लग्न प्रथा म्हणून पार पडते.लग्नास कोणतीच पात्रता हवी नसते.फक्त नर आणि मादी असली की झाला विवाह.
लग्न जुळविणारे जे कुणी असतात,ते पोबारा
करतात.पंचाग वगैरे बघून लग्न जुळवून आपले
इतिकर्तव्य पार पाडतात, पुढे त्या जोडप्याचे
काय झाले, याविषयी विचारणा करत नाहीत, स्वतः ला जवाबदार मानत नाहीत.
नवरा-बायकोची विषम प्रवृत्ती भांडणाला कारणीभूत असते,जमत नसतांना जुळवून
घेतांना कुचंबणा होते, जीव मेटाकुटीला येतो.
आपण बघतो की कौटुंबिक कलहातून कसले
प्रकार समोर येतात.
लग्न हे बंधन आहे,सात जन्माचे आहे असले ऐकण्यात, वाचण्यात येते,ते खरे की खोटे माहित नाही, परंतु अल्पकाळात एकमेकांना
नामोहरम करणारे जोडपे बघितले तर, किमान
त्यांच्या बाबत तरी ते खरे वाटत नाही.
बायकांना गृहिणी म्हंटले जाते, परंतु कित्येक
घरांना बायकांमुळे ग्रहण लागले आहे.
आपला जोडीदार आपल्या मनासारखा नाही, असे काही बायकांना मनोमन वाटत असते.काहींच्या बाबतीत ते खरे असले तरी,
सर्वांच्या बाबतीत ते खरे नसते.नवरा असो वा
बायको कुणाच्या तरी चुकीमुळे संसार दुःखमय
होतो, हे टाळण्यासाठी काही तरी उपाय असायलाच हवा,नसता जन्मभर दुःख भोगावे
लागते.
संसारात बायकोने नवऱ्याला समजून घेणे गरजेचे असते,कारण नवरा हा कुटुंबाचा कणा असतो.सर्वांच्या गरजा भागविण्यासाठी धडपडत असतो.तो घराच्या बाहेर पडतो, ते
घरात काही आणण्यासाठी.तो नोकरी करत किंवा व्यवसाय ,त्यास कोणत्या अडचणी येतात, किती संघर्ष करावा लागतो, हे त्यास ठाऊक ,मात्र सर्वच स्त्रियांना ह्याची जाणीव नसते.त्याने काहीही करावे पण आपल्या गरजा
पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा असते.नवरा म्हणजे
आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे आगार
त्या समजतात.भांडी,धूणी, स्वयंपाक वगळता सर्व कामे नवरा करतो.नोकरीवाले तर त्यासाठी
देखील नोकरानी ठेवतात.मग बायकोला कोणते
काम उरते.
नवरा नावाचा नोकरच जसा तो! " बायको आहे,नोकरानी नाही." असं बोलता येते परंतु
" नवरा आहे,नोकर नाही." असं बोलण्याची सोय नाही.नवरा करतो ते कर्तव्य आणि बायको
करते तो त्याग.नवरा घेतो तो संशय आणि बायको घेते ती काळजी!
नवरा जेवायला बसला की बायको काही तरी
कुरापत काढणार, नाही तर सासरच्या मंडळींचे
गाऱ्हाणे काढणार,नसता काहीतरी मागणार त्यास सुखाचे दोन घास खाऊ देणार नाही.
बाहेरून कामावरून थकून आलेल्या नवऱ्याची
विचारपूस करणार नाही.उलट काही तरी तक्रार
मांडणार,असल्या बायका ज्यांच्या आहेत,त्यांचे
दुःख काय आहे मी सांगण्याची गरज नाही.
नवऱ्याच्या आवडीनिवडी जपल्या,त्यास समजून
घेतले ,थोडा वाणी संयम ठेवला की बघा, संसारात किती सुख दिसते.
घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण हवे, वस्तूसाठी
हट्ट धरु नये.नवऱ्याच्या कमाईपेक्षा त्यास जास्त
खर्च करायला लावू नये.सासरच्या लोकांच्या सतत चूका काढू नये.माहेरचा मोठेपणा सांगू नये.
लहानसहान गोष्टींवरून भांडणे करणे गरजेचे नसते.सोडून दिल्याने अनेक प्रश्न सुटतात.
या लेखाचा उद्देश बायकांच्या चूका काढणे हा नसून.संसार सुखाचा होवो ,यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.शेवटी प्रत्येकाने विचार केला पाहिजे,तरच हे साध्य होईल.अरे संसार संसार हा सुर नको तर वा रे संसार संसार हा सुर
ऐकावयास मिळावा , एवढीच इच्छा!🙏
    - ना.रा.खराद
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.