प्रसंगावधान

                 प्रसंगावधान
जीवन जशी विविध प्रसंगांची मालिकाच आहे.कोणत्या वेळी काय प्रसंग येईल याचा अंदाज वर्तविता येत नाही.प्रसंगाला सामोरे जाणे हेच जीवन असते, त्यासाठी प्रसंग ओळखता आला पाहिजे.स्वत:च्या किंवा इतरांच्या रक्षणासाठी प्रसंगावधान राखता आले
पाहिजे.तात्काळ व अचूक निर्णय क्षमता यामध्ये
यश दडलेले असते.प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तात्काळ उपाय सूचला तरच बचाव होतो.वेळ गेली आणि जाग आली ,असे चालत नाही.
कित्येक वेळा आपण बघतो , प्रसंगावधान राखल्याने अनेक वाईट प्रसंग टाळता येतात.
एका प्रसंगात शेतात वाघ 🐯 अंगावर आला आणि त्या माणसाने बाजूला रोपट्याभोवती असलेली जाळी ओढून त्यामध्ये जाऊन बसला,
वाघ त्याचे प्राण घेऊ शकला नाही.
संकटात चालते तीच खरी बुद्धी असते.एरवी बडबड करण्यात काही अर्थ नसतो.प्रसंग ओळखण्यासाठी तीक्ष्ण नजर लागते.प्रसंगोचित
वर्तन करणे गरजेचे असते.निर्णयक्षमता हवी असते.
अफजलखान भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रसंगावधान राखले , म्हणून त्यांचे
प्राण वाचू शकले.अवतीभोवती कोणते वातावरण आहे,काय घडू शकते , काही विपरीत
घडले तर काय करावे लागते याची पूर्वकल्पना
असावयास हवी.कुठेही गाफिल राहू नये.जीवन
हे अनाकलनीय आहे.कोणत्या वेळी कोणता प्रसंग ओढवेल सांगता येत नाही.लहान चूक देखील मोठे संकट उभे करु शकते.प्रसंगाला सामोरे जावेच लागते.क्षणाचा विलंब देखील जीवघेणा ठरु शकतो.धैर्य कसोटीअसते.औचित्य साधले पाहिजे.
प्रसंगावधान राखून निर्णय घेतला तरच यश पदरी पडते.उशीरा सुचलेले शहाणपण उपयोगाचे नसते.कधी लहान चूकातून मोठे संकट उभे राहते तर कधी , प्रसंगावधान राखल्याने मोठे संकट टळते.
वाहकाच्या प्रसंगावधान राखल्याने राखल्याने अनेक अनर्थ टळल्याचे उदाहरणे आहेत आणि ते न राखल्याने अनेक प्रसंग ओढवलेले आहेत.
वाईट प्रसंगातून मार्ग काढला पाहिजे.हतबल न
होता प्रासंगिक निर्णय घेतला तरच सूटका किंवा
हित साधले जाते.प्रसंग गमावणे म्हणजे यश गमावणे आहे.प्रसंगी काहीही करावे लागते.
प्रसंगाची ती गरज असते.लोखंडाचे चणे खावे लागतात.अपमानाचे विष पचवावे लागते.लोहार
जसे घणाचे अचूक घाव घालतो.खाली तापवलेले लोखंड आणि वरुन घणाघात ,किती
प्रसंगावधान ते! संकटात देखील स्वतः ला सुरक्षित ठेवता आले पाहिजे.गाफिलपणा संकट
ओढवतो.एका व्यक्तीच्या प्रसंगावधान राखल्याने
अनेकांचे प्राण वाचू शकतात तर एकामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात.
प्रसंगी माघारही घेता आली पाहिजे.प्रसंग निभावून नेता आला पाहिजे.अडेलपणा काही येत नसतो.प्रसंगाची गरज लक्षात घेतली पाहिजे.
केवळ संकटात नाही तर सामान्य स्थितीत देखील प्रासंगिक निर्णय घ्यावे लागतात.वेळ काळ ओळखून मूळ स्वभाव बदलला पाहिजे.
अडून बसणे नडते.कुठल्याही प्रसंगी आपले अवधान असले पाहिजे.तेच आपणास तारु शकते.प्रसंगी गप्प बसावे लागते.लपावे लागते.
थांबावे लागते,धावावे लागते,टाळावे लागते .
प्रसंगी जे करावे लागते ते करावेच लागते.प्रसंगा
समोर नमावेच लागते.कुत्रे मागे धावले की आपसूकच आपण दगड उचलतो, तसे जीवनात
जसा प्रसंग तसा निर्णय घ्यावा लागतो.समयसूचकता ही काळाची गरज असते.
ज्यास प्रसंगावधान राखता येते त्याचे आणि त्याच्यामुळे इतरांचे देखील जीवन सुकर होते.
          
ना.रा.खराद, मत्स्योदरी विद्यालय अंबड
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.