विद्यालयात येणारे विद्यार्थी पालकांनी पूर्णतः शिक्षकांच्या भरवशावर पाठवलेले असतात.
आपले मुल शाळेत घडत आहे ,असेच त्यांना वाटत असते.पूर्वीच्या काळी घरचे लोक मुलांना
शिक्षकांचा धाक दाखवत असत.शिक्षण आणि शिक्षक दोहोंच्या विषयी पालकांची विश्वासार्हता
होती, त्यामुळे सर्वकाही सुरळीत होते.
विद्यार्थी संख्या माफक असल्याने सर्व विद्यार्थ्यांशी जवळीक असायची , त्यांच्याविषयी
संपूर्ण माहिती शिक्षकांना असायची.काळ बदलला, विद्यार्थी संख्या वाढली.शिक्षणाचे व्यवहारात रूपांतर झाले.'आर्थिक फायद्यासाठी शिक्षण' सुरू झाले. नैतिक बाबी दुय्यम ठरु लागल्या आणि पवित्र अशा शिक्षणाचे अधःपतन होऊ लागले. यामध्ये विद्यार्थी भरडला जाऊ लागला.पालक चिंताग्रस्त झाले.
वर्तमानकाळात शिक्षकांची जबाबदारी फार वाढलेली आहे.शिक्षक हा शिक्षक म्हणून ओळखला जावा, त्यांची प्रतिष्ठा एक श्रेष्ठ शिक्षक म्हणून असायला हवी.पैशांवरुन माणसांची किंमत ठरवली जाते , परंतु पैसा असून देखील जेव्हा किंमत नसते तेव्हा कळते की अजून काही तरी हवे आहे.
शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांचे पुरक घटक आहेत.या दोहोंमध्ये जितका जिव्हाळा, आपुलकी असेल ,मुले तितकी समंजसपणे वागतात.त्यांना जशी वागणूक मिळते ,तीच ते परत करतात.मुले वैफल्यग्रस्त ,नाउमेद होण्यामागे शिक्षकांचा नाकर्तेपणा खुप कारणीभूत आहे.केवळ इतर घटकांवर खापरफोडून आपण शिक्षक नामानिराळे नाही होऊ शकत.जवाबदारी झटकण्याची सवय सोडून दिली पाहिजे.केवळ शारिरीक दृष्ट्या शाळेत हजर राहून भरघोस पगार मिळतो परंतु आपले जे कार्य आहे ते मानसिकता बदलण्याचे आहे.
मुलांना समजून घेणे , सोपे काम नाही, त्यासाठी त्यांच्या विषयी आपणास कळवळा असला पाहिजे.मी शिकवलेला विद्यार्थी ,असे अभिमानाने सांगता यावे ,असे संचित आपल्याकडे असले पाहिजे.
शाळेत सर्व थरांतील विद्यार्थी असतात.त्याचे संतूलन आपणास साधता आले पाहिजे.गरीब मुलांची कुचंबणा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.श्रीमंत मुले शेफारणार नाहीत,याची दक्षता घ्यावी लागेल.
शिक्षकांचे चिंतन मनन विद्यार्थी केंद्रीत असले पाहिजे.आपण आपले कार्य चोख बजावले पाहिजे.आपले नाणं खणखणीत असले पाहिजे.
सर्व प्रकारचा दूबळेपणा सोडून विद्यार्थ्यांसाठीआपले विचार प्रेरणादायी ठरले पाहिजे.
विद्यार्थी आपले ऐकण्यासाठी उत्सुक असले पाहिजे.त्यासाठी आपली भाषा प्रगल्भ हवी.मुद्रा
प्रसन्न हवी, विचार श्रेष्ठ हवेत.मुलांच्या अनेक समस्या असतात.आपल्या समोर बसलेल्या मुलांना ओळखता आले पाहिजे.त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत.शारिरिक शिक्षा तर करुच नये परंतु
शब्दांचे बाण देखील सबुरीने चालवले पाहिजे.शाळेत जर त्यास समजून नाही घेतले तर कुठेच
समजुन कुणी घेत नाही आणि त्याचा परिणामठरलेला आहे.शाळा आणि शिक्षणामुळे हा प्रचंड
लोकसंख्या असलेला देश सुस्थितीत आहे.समाज भले ते विसरला असेल.
मी स्वतः शिक्षक असल्याने अनुभवातूनच लिहिले आहे.शिक्षकांचा अवमान करणे हा माझा उद्देश नाही . शिक्षकांचा मान हा त्यांचा पगार नाही तर शिक्षक म्हणून असावा एवढीच माफक अपेक्षा आहे.
- ना.रा.खराद
शिक्षक,मत्स्योदरी विद्यालय अंबड जि.जालना