धमकी महात्म्य

              धमकी महात्म्य
                           - ना.रा.खराद
मनुष्य हा धमकावणारा प्राणी आहे. दैनंदिन जीवनात तो कितीतरी धमक्या देतो किंवा ऐकतो.धमकी देण्यासाठी धमक असावी लागते.आपले इच्छित साध्य करण्यासाठी अथवा इतरांचे इच्छित साध्य न होऊ देण्यासाठी धमकीचा वापर होतो.तसे प्रत्येक जन धमकी देतो.विशेषतः आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीवर ती चांगला परिणाम करते.अनेकवेळा धमकीनेच काम भागते.धमकीचे यश बघता तीची सार्थकता लक्षात येते.
 एखाद्यास घाबरविणे धमकीचा उद्देश असतो.
बायको माहेरी निघून जाण्याची धमकी देते.शत्रु राष्ट्रांना आक्रमण करण्याची धमकी दिली जाते.
धमकीचा परिणाम हा देणाऱ्याच्या ताकतीवर
अवलंबून असतो.जन्मापासूनच धमकी सुरू
होते.आई वडील आपल्या अपत्यास धमकी
देतात. आई म्हणते,"दूध पी नाही तर तुला चोर मारेन." "हात पाय धुवून ये ,नाहीतर जेवायला नाही देणार." वडील देखील धमकी देतात. "शाळेत नाही गेला तर पोलीसाकडे देईल." "अंघोळ नाही केली तर मास्तराला सांगेल." धमकीचे बाळकडू घरामध्येच मिळालेले असते. उद्देश जरी चांगला असला तरी धमकी ही वाईटच असते. धमकीने काम होते हा संस्कार नकळत होतो.पुढे तो मुलगाही धमकी देवू लागतो."मला सायकल नाही दिली तर मी शाळेत जाणार नाही."मला
सहलला जाण्यासाठी पैसे नाही दिले तर मी घर सोडेन." 
शाळेत शिक्षकांकडून तर इतक्या धमक्या दिल्या जातात की धमकी देण्यावर शासनाने बंदी आणली तर शिक्षकांना आपले काम करणे कठीण होईल."टि.सी. देवू." " वर्गाच्या बाहेर काढू." "कानामागे देईल "वगैरे. 
पोलिस तर सतत धमक्या देत असतात. गुन्हेगारास घाबरविणे हा  त्यांचा उद्देश  असतो. "आत टाकू" अत्यंत भयंकर धमकी दिली जाते. नेहमीच्या गुन्हेगारावर त्याचा परिणाम होत नाही. पोलिसांना आपले व्यावसायिक कौशल्य धमकीने प्राप्त होते.
बहुतेक लोक धमकीला घाबरून गुन्हा करत
नाहीत.गुंडाना तर धमकी शिवाय पर्याय नसतो. गर्दी च्या ठिकाणी धमकी दिली की दहशत तयार
होते. ज्याची भिती वाटते तोच खरा गुंड.धमकी देण्याचे कसब गुंडाकडे असतेच.
फाडून टाकीन, जाळून टाकीन, गाडून टाकीन
असे काहीही करायचे नसतांना तशी धमकी
द्यायची असते तेव्हा दहशत निर्माण करता येते.
दोन देश एकमेकांना धमकावतात. कामगार
मालकाला काम बंद करण्याची धमकी देतात.
बायको नलऱ्याला माहेरी जाण्याची धमकी देते.नवरा घरातून हाकलून देण्याची धमकी देतो.वीजमंडळवाले वीज कट करण्याची धमकी देतात. राजकीय पक्ष पाठिंबा काढण्याची धमकी देतात.
नोकरीवरून कमी करण्याची धमकी,बदली करण्याची धमकी.जाळून घेण्याची धमकी.
आयुष्यभर धमकी देणे आणि ऐकणे जगण्याचा एक भाग बनला आहे. धमकी शिवाय जगणे अशक्य झाले आहे. आपण धमकी देणे बंद करुया.प्रेमाचे साम्राज्य निर्माण करुया!
       

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.