माहेरचा पुळका

                                        माहेरचा पुळका!
                                                      - ना.रा.खराद
 विवाहित स्त्रियांसाठी माहेर म्हणजे पंढरी! माहेरच्या आठवणीत ती सासरी वावरत असते.पूर्वी सणासुदीला किंवा लग्नकार्य किंवा दुःखद प्रसंगी स्री माहेरी जात असे, परंतु हल्ली रस्ते, वाहने आणि मोबाईल यामुळे स्त्रिया सतत माहेरच्या संपर्कात असतात.हा अतिरेकी हस्तक्षेप भावाचा संसार बिघडवून टाकतो आणि स्वतःच्या संसार देखील दुर्लक्षित होतो.
   पूर्वी नांदायला गेले की मुलगी सासरची होऊन जायची,तिथली माणसे यामध्ये ती रुळायची आणि एक आपलेपण तिस प्राप्त व्हायचे.माहेरचा निरोप किंवा सांगावा याशिवाय जास्त संपर्क नव्हता,स्री पूर्णपणे
सासरची होऊन जायची.आता मात्र परिस्थिती इतकी बदलली आहे की स्री आता सासरची होतच नाही.रोजच्या माहेरच्या संपर्काने, हस्तक्षेपामुळे दोन्हीकडचे संसार बिघडवून जात आहेत.
   माहेरच्या रोजच्या विचारपूसमुळे आणि सासरच्या मंडळींना उपेक्षित ठेवल्यामुळे ज्या दुहेरी अडचणीत नवरोबा सापडतो.माहेरच्या सल्ला घेत सासरी वागायचे हे नवे खुळ इतका धुमाकूळ घालत आहे की, सांगण्याची वेळ आली आहे की, आमच्या संसारात नाक खुपसू नका. सासरची नाती जर जपली तरच ती खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकते.सासरा,सासू ,ननंद,दीर ,जाऊ हेच खरे आपले नातेवाईक आहेत,असे मनापासून वाटल्याशिवाय खरे सुख लाभणार नाही,केवळ शरीराने सासरी राहून मनाने माहेरी रमलेल्या स्त्रिया दोन्ही घरचे वाटोळे करून टाकतात.येणेकेणे माहेरी धावणारी स्री सासरी कधीच रमू शकत नाही, सासरच्या लोकांना तीचे हे वागणे पटत नाही, यातून लग्न म्हणजे केवळ एक औपचारिक बाब बनते, तिथे खरा जिव्हाळा,प्रेम कधीच निर्माण होऊ शकत नाही.
    सासरच्या लोकांशी तुसडेपणा करायचा आणि माहेरच्या लोकांशी सलगी , हे धोरण कधीही आत्मघातकीच ठरेल.एकदा लग्न झाले की आपले सासर हेच आपले सर्वस्व मानणारी स्री गृहलक्ष्मी ठरते.
आपल्या सासु सासऱ्याला विचारायचे नाही आणि माहेरी मात्र आपल्या आईवडिलांची  सुनेने सेवा केली पाहिजे,हा दुतोंडीपणा स्री चारित्र्याचा ऱ्हास दाखवतो.
आपले माहेरचे सतत गुणगान करत, सासरच्या लोकांचा अपमान करायचा यातून फक्त मनस्ताप वाट्याला येऊ शकतो,सुख समाधान कधीच नाही.माहेरच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे तेथील
लोक देखील आपल्यावर नाराज होतात,एकवेळ अशी येते की दोन्ही कडील लोकांनी आपल्याला मनातून काढून टाकलेले असते.
 आपल्या भावाच्या संसारात फार डोकावणारी, भावजयीची सतत झाडाझडती घेणारी विवाहित दोन्ही घरचा विचका
करते.नाते खुप नाजूक असते, थोड्याशा कारणाने त्यामध्ये वितुष्ट येते.
  आपल्या घरातील बारीकसारीक गोष्टी माहेरी सांगणे किंवा तेथील विचारणे अनाठायी असते.ही नसती उठाठेव थांबली पाहिजे.सासरी इतके रमले पाहिजे की माहेरची आठवण देखील येऊ नये.माहेरी इतके गुंतू नये की सासरी रमू नये. दळणवळणाची व संपर्काची साधने इतकीसुलभ झाली आहेत की आता कशाचीही ओढ राहिली नाही.आता फक्त ओढाताण आहे.कधीमधी माहेरी जाणारी स्री आपला सन्मान कायम राखते.आईवडिलांना देखील आपली मुलगी सासरी रमलेली खुप आवडते.
  आपले तेच असते , जिथे आपलेपणा असतो.आपण सासर आणि तिथले नातेवाईक आपले समजल्याशिवाय आपणास कुणी आपले समजणार नाही आणि हे कुठल्याही स्त्रीसाठी मारक आहे, म्हणून पूर्णपणे सासरचे होऊन जावे आणि माहेरच्या संसारात जास्त हस्तक्षेप करु नये, तरच दोन्हीकडचे संसार सुखी होतील.
  
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.