- ना.रा.खराद
पाऊस असतो हरहुन्नरी,लहरी , बेफाम, मदमस्त.विश्रांतीनंतर बरसण्यासाठी आसुसलेला, व्याकुळ,व्यापक अव्याहत लहरींचा खेळ.तो असतो सुसाट तेव्हा सोबतीला असतो तुफान वारा आणि गारा.
मेघांची गर्जना जणू युद्धाच्या मैदानात उतरलेला वीर,जशी सिंहगर्जना आणि गलितगात्र, गर्भगळीत जणू सृष्टी! विजांचा लखलखाट, कडकडाटात भेदरुन टाकतो सर्व जीवांना.
पाऊस असतो कधी नुसताच वाकुल्या दाखवणारा, केसांच्या बटी ओल्या करणारा, सुंदरीच्या गालावर मोती
बनुन राहणारा.ओघळून ओठ चिंब करणारा.झाकलेले लावण्य किंचित बाजूला सरकवणारा ,मिस्किलपणे अलगद हसणारा.
पाऊस असतो कधी जोमात , जोशात बेफाम मदमस्त घोड्यासारखा ,क्षणांत कोसळणारा ,पाणीपाणी करुन टाकणारा.सावरण्याचीही संधी न देणारा.जिकडे तिकडे सैराट धावणारा.
पाऊस असतो कधी गोंधळलेला, कुठे आणि किती बसावे यांचा हिशोब बघणारा.पाऊस कधी थांबून थांबून विश्रांती घेत बरसणारा,थकलेल्या पथिकासम.
पाऊस असतो नद्या ,ओढे,झरे यांना धुवून काढणारा ,आपले काम चोख बजावणारा कर्तव्यदक्ष सेवक.पाऊस कधी दाखवतो नुसत्याच वाकुल्या.एकटक बघणाऱ्या चातकाची तहान भागवण्यासाठी बरसतो रिमझिम.
पावसाची एक लय असते,कर्णमधुर .पावसाचा एक रुबाब असतो.
पाऊस उग्र होतो तेव्हा गय नसते कुणाचीच.शत्रुंवर तुटून पडलेल्या वीरासारखा सपासप वार करतो धारांनी.
प्रत्येक जीव मुठीत धरुन धावतो सैरावरा , तरीही गाठतोच तो काहींना, कुठेतरी.कधी पाऊस देतो चकवा.
इंद्रधनुष्य 🌈 असते प्रतिक पावसाच्या अनेक रंगाचे!