आयुष्याची प्रश्नपत्रिका

            आयुष्याची प्रश्नपत्रिका
                             - ना.रा.खराद
आपले आयुष्य म्हणजे प्रश्नांची मालिकाच आहे, कितीही प्रश्न सोडवले तरी नवीन प्रश्न समोर येतात.आयुष्य प्रश्न सोडविण्यासाठीच असते,असेच वाटू लागते, आयुष्याचे प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य इतका वेळ असतो , परंतु कोणते प्रश्न महत्वाचे हे आपण ठरवायचे असते.
काही प्रश्न जन्मासोबतच असतात,काही इतरांनी निर्माण केलेले असतात तर काही आपण स्वतः च निर्माण केलेले असतात.
  या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न तातडीने सोडवायचे
असतात, पर्याय असलेले प्रश्न सोडवणे सोपे जाते.मरेपर्यंत देखील न सूटणारे प्रश्न असतात.
आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेचे किमान प्रश्न तरी सोडवता आले पाहिजेत.
  कधीकधी एखादा सोपा प्रश्न सोडवता येत नाही.
अनेक उत्तरे वेळ संपल्यावर सुचतात.आयुष्याची
प्रश्नपत्रिका प्रत्येकाची वेगळी असते , त्यामुळे नक्कल करता येत नाही.
अनेकवेळा खाडाखोड करण्याची वेळ येते,कधी उत्तर माहित असूनही वेळ संपलेली असते.कधीकधी कमी महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात वेळ वाया जातो.कधी प्रश्नच
समजलेला नसतो.उत्तर चूकले आहे हे नंतर लक्षात येते.
या परिक्षेत कधी इतरांना विचारुन उत्तर लिहिले जाते, दोघांचेही चूकीचे असते.
    आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेचे काही प्रश्न 'एका वाक्यात उत्तरे द्या' अशा स्वरूपाची असतात.ही उत्तरे फार जपून द्यायची असतात.ती वस्तूनिष्ठ असतात,चूकीला माफीच नसते.एका चूकीच्या उत्तराने अनेक प्रश्न निर्माण होतात.
एका वाक्यात जो प्रश्न सुटतो तिथे दोन वाक्यामुळे उत्तर चुकत असते.अचुकता हे सुत्र हवे.वाक्य एक असले तरी ते अचुक असावे लागते.
  आयुष्यात योग्य जोड्या जुळवणे हे एक कसब
असते.जुळवतात सगळेच पण योग्य जुळवणीवर यश अवलंबून असते.घाईने जुळवलेले चुकण्याची शक्यता असते.योग्य जोड लावणे हा प्रश्न वाटतो तितका सोपा नसतो.जोडी चुकली की गोडी संपली.आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेचा हा आयुष्याचा प्रश्न असतो.
रिकाम्या जागा भरण्यासारखे अनेक प्रश्न असतात.उत्तर नसले की कायम रिकाम्याच राहतात.मागचे पुढचे संदर्भ कळल्याशिवाय ही जागा भरता येत नाही.चुकीच्या उपायाने दोन अजून दुरावतात.
 आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत ,'कारणे द्या' हा प्रश्न
फार भेडसावतो.काहीही करा त्याची कारणे
विचारली जातात,ती पटली तर ठीक नसता फार
नुकसान सोसावे लागते.ही उत्तरे बरोबरच असावीत असे नसते परंतु बरोबर वाटावीत अशी असावीत.हा प्रश्न सोडवावाच लागतो,कारण कारणाशिवाय काहीच नसते असे समजले जाते.
 'नको ते खोडा' हा प्रश्न आयुष्य पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असतो.आयुष्यामध्ये नको असलेले खुप काही असते ते खोडण्याचे काम करावयास हवे.नको ते खोडल्याविना हवे ते लाभत नाही.नको असलेले बाजुला सारता आले पाहिजे.नको ते वर आले की हवे ते खाली
राहते, म्हणून वेळीच त्याचा बंदोबस्त केला
पाहिजे.नको त्यापासून दूर राहिले पाहिजे.
आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत ,'योग्य पर्याय निवडणे '
हा प्रश्न कसोटीचा असतो.जिथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तिथे योग्य पर्याय निवडणे हे
जोखमीचे काम असते.निवडीचे स्वातंत्र्य असले
तरी निवड चूकू शकते.निवड चुकली की परवड
झाली समजा.सारखे वाटणारे अनेक पर्याय असतात पण ते सारखे नसतात.त्यामधील सुक्ष्म फरक ज्यास कळतो तोच हा प्रश्न सोडवू शकतो.
चुकीचा पर्याय फार मोठी चूक ठरते.आयुष्याची वेळ संपते, काही प्रश्न अनुत्तरित राहतात.या परीक्षेचा निकाल मृत्यूनंतर घोषित होतो ,जो बघायला आपण नसतो.
    
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.