अडचणी

                                               अडचणी
                                                                  - ना.रा.खराद
 आपल्याकडे न बोलावता येणारी गोष्ट म्हणजे अडचणी! या जगात प्रत्येक मनुष्य कायम कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीत असतो.आलेल्या अडचणी सोडवत राहणे म्हणजे जीवन.अडचणी कधी लहान तर कधी मोठ्या असतात,कधी लवकर सुटतात,तर कधी बराच वेळ घेतात.एक अडचण सोडली की दूसरी हजर असते.काही अडचणी आपण स्वतः निर्माण केलेल्या असतात तर बऱ्याच इतरांकडून आलेल्या असतात.अडचणीवर मात करून पुढे चालावे लागते.
   संभाव्य अडचणींचा अंदाज घेऊन काही माणसे तत्पर असतात,तर काहींना तो अंदाज नसतो, म्हणून ते अडचणीत सापडले जातात.कित्येक अडचणीत मनुष्य कोलमडून पडतो.कुणी जाणूनबुजून आपल्या मार्गावर अडचणी निर्माण करतात, अडचणीला सामोरे जाणे हाच पर्याय असतो.अडचणीविषयी कुरबुर करत बसण्यापेक्षा त्यांवर मात करून पुढे जाण्याची हिंमत असली पाहिजे.
 अनेकवेळा आपली अडचण कुणीतरी सोडवते.अडचणीत धैर्य आणि संयम कामी येतो.काही अडचणी अनायासे निघून जातात.काही अडचणी बराच काळ आपणास नामोहरम करतात.अडचणीचे स्वरूप वेगळे असते, परंतु अडचणी सर्वांच्या वाट्याला येतात.
   आकस्मिक येणाऱ्या अडचणी सोडविणे मोठे जिकिरीचे असते, बुद्धीमान माणसे अडचणी समजून घेत, सहजगत्या त्या सोडवतात.कित्येक अडचणी या भ्रम असतात.भयामुळे त्या जाणवतात.जशा अडचणी तशा उपाययोजना करणे गरजेचे असते.अडचणी समजून घेतल्याशिवाय त्या सोडवता येत नसतात.अडचणीच्या वेळी इतरांची मदत घ्यावी लागते.अडचणीत जे उपयोगी पडतात, त्यांचे आपण कायम ऋणी असले पाहिजे.
 अडचणीत काही माणसे खचून जातात,कुणी मदत नाही केली तर माणसांविषयी घृणा वाटू लागते,
”या जगात कुणी कुणाचे नाही. " अशी नैराश्याची भाषा तो बोलू लागतो, प्रत्येक मनुष्य कधीतरी असे बोलतोच! 
पेपर लिहिताना पेनाची संपलेली शाई असो की, अडवळणी दूचाकीचे संपलेले पेट्रोल असो अडचणीचे असते.जागा व सोय अपूरी असताना मुक्कामाला थांबलेले पाहुणे असो, की बसच्या तिकीट घेण्यासाठी कमी पडलेले पाच रुपये असो,अडचण मानले जाते.चपलेचा अंगठा तुटला तरी अडचण निर्माण होते.
कधी चैन स्लिप होते तर कधी लघवीला जागा सापडत नाही.कधी निघून जाता येत नाही तर कधी थांबता येत नाही.
  अनेकवेळा बोलण्यातून आपण अडचणीत येतो.शब्द मागे घेणे किंवा पुढे रेटले जातात.क्षमा, दिलगिरी असे शब्द  वापरुन या अडचणीतून निसटता येते.अडचणीच्या वेळी बुद्धीची कसोटी असते.काही अडचणी गृहीत धरून चालाव्या लागतात.अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग माहिती नसेल तर इतरांचा सल्ला घ्यावा लागतो.चूकीचा सल्ला हा आणखी अडचणी वाढवतो.
    जीवन म्हणजे अडचणीची न संपणारी मालिकाच असते,आपण मात्र खचून न जाता, त्या अडचणी समजून घेत त्यावर मात करत राहिले पाहिजे.
    
   
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.