- ना.रा.खराद
स्वाभिमान हा माणसातील सर्वोच्च गुण आहे.स्वाभिमानी असणे म्हणजे लाखात एक असणे होय.अत्यंत गरीब व्यक्तीही स्वाभिमानी असू शकते तर अत्यंत श्रीमंत स्वाभिमानी नसू शकते.स्वाभिमानी कुणापुढे हात पसरत नाही.कुणाच्या कृपेने त्यास काही मिळवायचे नसते.अकारण कुणाची स्तुति किंवा निंदा तो
करत नाही.स्वाभिमानी व्यक्ती स्वत्वाचा आदर करते.स्वत:ला कमी लेखत नाही.लाचारीची भाषा करत नाही.
नम्रता बाळगूनअसते परंतु भयाने झूकतनाही.गरीबीतही इज्जतीने जगते.फायद्यासाठी कुणाच्या मागे धावत नाही.
स्वाभिमानी व्यक्ति सगळे गमावू शकते परंतु स्वाभिमान नाही.अशा व्यक्तिला नमवणे सोपे नसते.लाचार,हूजरे लोक स्वाभिमानी व्यक्तिचा तिरस्कार करतात.
स्वाभिमानी व्यक्ती नीडर असते.मोडेल पण वाकणार नाही अशा बाण्याची ही माणसे असतात.स्वाभिमानी व्यक्तीला फूकटचे काही नको असते.कष्टाची भाकरी खाणे त्यास आवडते.स्वाभिमानी व्यक्ति लालची नसते,कपटी नसते.सडतोड असते.असली व्यक्ति दब्बू नसते.स्वार्थासाठी कुणाच्या चपला उचलणे ते कदापि करु शकत नाही.
त्यांचा करारी बाणा असतो.इतरांच्या सन्मानाची त्यास गरज नसते.स्वत:चा सन्मान करणे हाच खरा सन्मान असतो तोच खरा स्वाभिमान असतो.
जिथे अनादर होतो तिथे स्वाभिमानी व्यक्ति जात नसतो.कुणाच्या मागेपुढे फिरणे त्यास जमत नाही.ताटाखालचे मांजर तो होऊ शकत नाही.कुणाचे उपकार त्यास नको असतात.स्वाभिमानी व्यक्ति स्वतंत्र विचारांची असतात.भाऊगर्दीत सामिल होणे त्यास पटत
नाही.स्वाभिमानी व्यक्ति उणे बोलणेे सहन करु शकत नाही.उपमर्द केला तर खपवून घेत नाही.जिथे मान नाही तिथे जात नाही.
कुणाकडून काही अपेक्षा बाळगत नाहीत.
फूकटचे काहीच नको असते.स्वार्थासाठी कुणाची आरती ओवाळणे त्यांच्या रक्तात नसते.इज्जत प्राणापेक्षा प्रिय असते.खरेपणा हा या व्यक्तिचा स्वभाव असतो.
ज्याच्याकडे स्वाभिमान आहे,त्यांच्याकडे सर्वकाही असल्यासारखे आहे.स्वाभिमान नसेल तर सर्वकाही असून नसल्यासारखे आहे.