विसंवाद

                                             विसंवाद
                                                          - ना.रा.खराद
दोन किंवा अधिक माणसे एकत्र आली की त्यांच्यामध्ये संवाद, चर्चा किंवा गप्पा सुरू होतात.वाचाळ सारखे बोलत राहतो तर मितभाषी आपली ओळख कायम ठेवतो.संवादाची दोन टोके विसंवाद घडवतात.
संवादाचा मध्यबिंदू फार थोड्यांना साधता येतो.बोलण्याइतकेच ऐकण्याला व ऐकण्याइतके बोलण्याला महत्व असते.हे दोन्ही ज्यास साधता येते तोच खरा उत्तम संवादक.
स्थळ,काळ, वेळ बघून,प्रसंग , औचित्य आणि शिष्टाचार पाळून बोलणे गरजेचे असते.
हास्य विनोद करतांना ओघात एखादा तिरकस शब्द संवाद विसंवाद करतो.अनेक भांडणे ही 
शब्दांच्या चूकीच्या वापराने होतात.बोलणे गरजेचे नसेल तर गप्प बसण्याइतका संयम व विवेक आपणाकडे असला पाहिजे.बोलण्याची  गरज असताना अगदी घुम्यासारखे मुग गिळून बसणेही विसंवादास कारणीभूत ठरते. आपले बोलणे इतर खरेच ऐकत आहेत की फक्त सौजन्याने वागत आहेत , हे ताडता आले पाहिजे.समोरच्याचे ऐकायचे नाही फक्त आपले त्यास ऐकावयाचे हा वेडेपणा सोडला पाहिजे.
आपल्यापेक्षा मोठा, लहान, बरोबरीचा बघून  संवाद साधता आला पाहिजे.
वयोवृद्ध,अनुभवी,ज्ञानी,व्यासंगी लोकांचे ऐकून घेतले पाहिजे.संवाद करतांना प्रत्येक मतांवर
आपले मत मांडण्याची किंवा ते खोटे ठरविण्याची गरज नसते.आपसात सलोख्याचे संबंध असतील तर संवाद
चांगला होतो.आपली वाणी उपदेशकाची वाटू नये.बोलतांना वर्मी घाव घालू नये.
आपले बोलणे'बडबड' वाटावी इतके बाष्पळ असू नये.कुणी 'घुम्या' 'मठ्ठ' समजेल इतकेही
गप्प बसू नये.
विसंवादामुळे वितुष्ट येते.इतरांशी जुळवून घेण्यासाठी उत्तम संवाद आवश्यक असतो.कुणाशी काय आणि किती बोलावे ह्याचा विवेक असावयास हवा.संवाद हार्दिक असला पाहिजे,केवळ पोकळ,नीरस शब्द चांगला संवाद साधू शकत नाही.बहुतेक वाद हे संवाद साधता न आल्याने होतात.संवादासाठी वाणी संयम आवश्यक असतो.
समोरचा अत्यल्प बोलत असेल तर आपलेही बोलणे आवरते घेतले पाहिजे.आपण कुणाशी बोलतो आहोत,याचे भान ठेवून बोलले पाहिजे.
संवादाचा स्वर देखील महत्वाचा आहे.कर्कश, फार मोठ्याने बोलणे कुणालाही आवडत नाही.
संवादामध्ये "मी" या छोट्या शब्दाचा जास्त वापर करु नये.
संवाद हार्दिक असावा.डोळ्यामध्ये तो दिसला पाहिजे.नसता मौन परवडले.संवाद जितका चांगला जमेल ,तितके इतरांशी सौख्य वाढेल , अन्यथा विसंवाद वितुष्ट वाढवेल.
                                   
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.