पुढे धोका आहे...
- ना.रा.खराद
जसे रस्त्यावर काही धोक्याची वळणे असतात, तसे जीवनाच्या मार्गात देखील अनेक ठिकाणी धोका असतो ,तिथे सावध होणे गरजेचे असते.जीवनाच्या सुसाट वेगात ती वळणे आपण लक्षात घेत नाहीत आणि जेव्हा ती लक्षात येतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
वडीलधारी माणसे,शिक्षक, उपदेशक आपणास
सावध करत असतात परंतु आपण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. मला सर्व कळते,कुणी सांगण्याची गरज नाही,अशी दर्पोक्तीची भाषा बोलतो आणि त्याचवेळी धोका अटळ असतो.
आपण जी कृत्ये करतो,त्याचा अधूनमधून आढावा घेतला पाहिजे.आपण कुणाच्या सानिध्यात आहोत,आपण जे काही कृत्य करतो त्याचा परिणाम काय असू शकतो.आपले कृत्य कुणाला सलते आहे का , याविषयी चिंतन मनन केले पाहिजे.
कोणताही धोका किंवा संकट हे अचानक येत नसते,त्याची पार्श्वभूमी कधीतरी आपणच तयार
केलेली असते.पायाजवळ बघितले जाते, संभाव्य बाबींकडे नाही,इथेच धोक्याची घंटा असते.
आपला आहार,विहार, विचार तपासला पाहिजे.
इतरांच्या मतांवर खूप अवलंबून न राहता ,आपला आपण विचार केला पाहिजे.चूकीच्या संगतीत सापडलेली माणसे वाया जातात.मोहात गुरफटत चालले की विळखा जीवघेणा ठरतो.पुढचे धोके ओळखून
असले पाहिजे.उद्याचा दिवस हा आजच्या दिवसाचा परिपाक असतो.
कुटुंबात, कार्यक्षेत्रात व समाजात आपले आकलन अचूक असावे, निरिक्षण सूक्ष्म असावे व निर्णय तात्काळ असावेत.
धोकेबाज लोकांपासून सावध रहावे.धोक्याची
चाहूल लागली पाहिजे.शरीर झोपले तरी बुद्धी
जागी असावी.धकाधकीच्या जीवनात हातून चूका होऊ शकतात,चूक दुरुस्त करून पुढे वाटचाल करावयास हवी.कुणी धोक्याचे संकेत दिले तर त्याचा राग मानू नये.कुणी हितचिंतक समजावून सांगतो तेव्हा ते ऐकलेच पाहिजे नसता धोका ठरलेला असतो.
आपण जेव्हा मस्तवाल, बेधुंद होऊन जातो तेव्हा कुणाचे ऐकत नाही , हे न ऐकणे खूप महाग पडते.काळाची पाऊले ओळखता आली पाहिजेत.मूर्खपणाचे स्वप्न कधीच बघू नये.लायकीपेक्षा जास्त अपेक्षा करु नये.मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते असे करुन हसे करुन घेऊ नये.
आजच्या सुखातून उद्याचे दुःख निर्माण होत असेल तर ते टाळावे.अतिपरिचय किंवा अतिदुरावा घातक ठरतो.नात्यातले संतूलन राखता आले पाहिजे.कुणाचेही शब्दाने मन दुखवू नका,धोके वाढवू नका.चूक झाल्यास
क्षमा मागण्याची लाज बाळगू नका.
आपल्या समोर कायम धोके असतात, परंतु
सावध व्यक्ती त्यावर मात करु शकते.गाफिल राहू नये.सावध असावे.
कारण , पुढे धोका आहे...!