मूर्ख हा खुप त्यागी असतो,कारण त्याचा फायदा इतर घेतात.

                                                    मूर्खांची गरज
                                                                      - ना.रा.खराद
 या जगात जितकी गरज शहाण्यांची आहे, तितकीच मूर्खांची आहे.शहाण्या लोकांनी कायम मूर्खांचा उपयोग किंवा वापर केलेला आहे, परंतु श्रेय शहाणपणाला दिले किंवा घेतले जाते, मूर्खपणाला नाही.या जगात मूर्ख लोक नसते तर शहाणी माणसे काहीच करु शकले नसते.कोण शहाणा आणि कोण किती शहाणा यामध्येच सर्व वेळ वाया गेला असता.
   मूर्ख असणे सर्वांना कमीपणाचे वाटते, परंतु मूर्ख असणे म्हणजे त्यागी, परोपकारी असणे होय.स्वत:च्या फायद्यासाठी सुध्दा मूर्ख असणे गरजेचे आहे.जगात शहाण्या लोकांचे हाल आपण बघतो.म्हणून तर मूर्खपणाचे सोंग तरी घ्यावे लागते.कुठल्याही शहाण्या माणसाचे कुणी समर्थन करत नाही,कारण शहाण्याचे शोषण करता येत नाही,त्यास फसवता येत नाही,त्याचा हवा तसा वापर करता येत नाही, म्हणून शहाण्याच्या तुलनेत मूर्ख लोकप्रिय असतो.
  जसे गाढवांकडून काहीही काम करुन घेतले जाते.कितीही ओझे टाका गुपचूप वाहते, काही तक्रार नाही, माणसेही अशीच म्हणजे गाढवांसारखी विनातक्रार काम करणारी प्रिय असतात.कुठल्याही मालकाला मन आणि बुद्धी नसलेली अशी मूर्ख माणसे प्रिय असतात,ती आपल्या तालावर नाचली पाहिजेत इतकेच!
 आज जिकडे तिकडे मूर्ख लोकांचे दिवस चांगले आले आहेत.मूर्खांना लाभणारे यश हा चिंतनाचा आणि चिंतेचा देखील विषय आहे.मूर्खांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो.कोणतेही काम धडाडीने पूर्ण करणे त्याचा स्वभाव असतो.तर्क वगैरेची त्यास गरज नसते.कशालाही फक्त ' हो' म्हणायचे त्यामुळे तो वरिष्ठांना प्रिय होतो.डोके फक्त ओझे वाहण्यासाठी असते,अशी त्याची समजूत असते.ते फक्त फायदा तिथे टेकतात आले तरी आपले भले होते,अशी त्याची धारणा असते.
  निसर्गाने मूर्ख माणसे निर्माण करुन खुप संतुलन ठेवले आहे,नसता शहाण्या लोकांनी खूप धुमाकूळ घातला असता.जसे मूर्खांचा शहाणे वठणीवर आणतात तसे मूर्ख देखील शहाण्या लोकांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतात.त्यांना त्यामध्ये यश लाभल्याचे कित्येक उदाहरणे आहेत.
   आपण मूर्ख आहोत असे कुणालाही मान्य नसते, त्यामुळे मूर्ख कोण हे ओळखणे कठीण असते.जो यशस्वी होतो त्यास शहाणा समजले जाते, आणि अनेक मूर्ख यशस्वी झाल्याची लाखो उदाहरणे सर्वच क्षेत्रात सापडतात.उलट अयशस्वी व्यक्ती कितीही शहाणी असली तरी त्यास मूर्ख समजले जाते.
   मूर्ख व्यक्ती हा फार महत्वाचा घटक असतो,त्याचा कसाही वापर करता येतो.त्याची पिळवणूक,शोषण सहज करता येते,त्यास फसवता येते.कित्येक मूर्ख जे स्वतःला शहाणे समजतात आणि मूर्खपणा करत राहतात आणि फसले जातात,लुटले जातात.
    समाजाच्या जडणघडणीत मूर्खांचा खुप मोठा वाटा आहे, परंतु श्रेय मात्र शहाणे घेतात.कोणत्याही तर्कात न बसणाऱ्या हजारों गोष्टी मूर्ख करत असतात किंवा त्यांच्याकडून करुन घेतल्या जातात.मूर्ख स्वतःचा फायदा बघत नाही, लोक त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करतात, त्यामुळे तो खूप त्यागी मानला पाहिजे.शेवटी मूर्खांची
गरम नसती तर मूर्ख विधात्याने निर्माण केली नसती, संतुलन ठेवण्यासाठी त्यांची गरज होती, त्यामुळे मूर्ख हा उपेक्षित राहू नये, त्यांचाही यथोचित सन्मान व्हावा.मूर्ख मूर्खांच्या कामी यावा.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.