- ना.रा.खराद
रोग जसे शारिरीक असतात, तसे मानसिकही.
मानसिक रोग ज्याचे त्यास समजत नाहीत.इतरांमध्ये शुद्धा सर्वांना समजत नाहीत, त्यामुळे हे रोग सहजासहजी नष्ट होत नाहीत, जेव्हा ते ठळकपणे जाणवतात , त्यावेळी उपाय शक्य नसतो, म्हणून वेळीच ओळखणे गरजेचे आहे.रोग जडण्यामागची कारणे कळाली तर आपण या रोगातून मुक्त होऊ शकतो.
' तुलना' हा एक फार गंभीर आजार आहे आणि तुलना करणे अपरिहार्य जरी असले तरी ,कमी
लेखणे हा प्रकार थांबवता येतो.
अचेतन वस्तूंची तुलना होऊ शकते.दोन वस्तूंचे वेगळेपण असू शकते , परंतु श्रेष्ठ , निकृष्ट असे
काही नसावं.लहान वस्तू जिथे गरजेची असते,तिथे ती वस्तू महत्त्वाची असते.जशा सर्व लहान मोठ्या जड वस्तू महत्त्वाच्या असतात,तशी सर्वंच माणसे महत्त्वाची असतात.
विशिष्ट लोकांना महत्त्व देऊन , इतरांना निम्न लेखायचे अशी तुलना अयोग्य आहे.
जेष्ठ,मोठा, वरिष्ठ हे शब्द व्यावहारिक पातळीवर ठीक आहेत, परंतु ह्यांचा उपयोग जेव्हा दर्जा किंवा पातळी दर्शविण्यासाठी होतो तेव्हा मात्र तुलना अनाठायी, अभद्र वाटते.
तुलनेच्या या महाभयंकर रोगाने सर्वांना पछाडले आहे.अगदी बालवयापासून ह्याचा ससेमिरा मागे असतो.आई वडील मुलांना ," बघ तो .... किती हुशार आहे." अशी हेटाळणी करतात.अमूकचा
मुलगा किती पैसे कमावतो वगैरे..!
लग्नासाठी दहापाच मुली बघून तुलनेने पसंत केली जाते, म्हणजे इतर मुलींना कमी लेखले जाते.मला वाटते, ज्याच्या ठिकाणी तो योग्य असतो , उगीच स्वतः ला मोठे समजण्यासाठीआपल्या पेक्षा कुणाला तरी कमी समजायचे हा एक रोग आहे.याची पाळेमुळे बालवयातच शाळेत रुजतात.वेगवेगळ्या बक्षिसांचे आमिष,ज्यास शाळा प्रोत्साहन म्हणते ते दाखवले जाते.प्रथम वगैरेचे विष एकदा या वयात पाजले की जीवनभर ते टिकून राहते.
अमूक रंग उत्तम , तमूक निकृष्ट असे नाही तर अमूक हा तमूकपेक्षा वेगळा आहे.अमूक फूल महाग ,तमूक स्वस्त असे न समजता ती दोन फुले फक्त वेगळी आहेत, वेगळेपण मान्य आहे, परंतु एकास कमी समजायचे हे मूळीच मान्य नाही.
हत्ती मोठा आणि उंदीर लहान हे फक्त वेगळेपण समजले जावे.उंदराला देखील कमी लेखू नये.
आपण फुटपट्टी घेऊनच घराच्या बाहेर पडतो,
प्रत्येकाला मोजत बसतो.किती श्रीमंत, किती शिक्षण, कोणत्या पदावर हे माहिती करुन घेतल्या शिवाय आपणास चैन पडत नाही.नोकऱ्यात तर वरिष्ठ, कनिष्ठ हे शब्द चिकटलेलेच असतात.ह्याचे घर लहान,त्याचे मोठे तुलना करु नये.माझी इतकी इस्टेट,तुझी किती? कशाला या फालतू गोष्टी.तुलना करायची असेल तर ती फक्त स्वतः शी करा,मी
काल काय आणि कसा होतो आणि आज कसा आहे,मी बदललो का, काही सुधारणा झाली का,
अशी तुलना करावी.इतरांशी फार देणेघेणे असू नये, कुणाला लहान समजू नये आणि कुणाला
मोठेही समजू नये.जो तो आपल्या जागेवर योग्य आहे.
एकंदरीत कुणाला कमी लेखून स्वतः ला मोठे भासवण्याचा प्रयत्न करु नये.प्रत्येकाचा आदर
केला पाहिजे,आपले मापदंड लाऊन कुणाचाही उपमर्द करु नये.