अनेकवेळा आपल्या कानी पडणाराशब्द,'प्रतिष्ठीत'
मग ते विशेषण लावून, प्रतिष्ठीत नागरिक, प्रतिष्ठीत
व्यापारी, प्रतिष्ठीत नेता, प्रतिष्ठीत साहित्यिक, प्रतिष्ठीत गायक वगैरे.एक ना अनेक.सर्वच क्षेत्रात प्रतिष्ठीत लोक असतात ,बाकीचे अप्रतिष्ठीत.
प्रतिष्ठा म्हणजे नावलौकिक.आपली ओळख निर्माण करणे किंवा होणे म्हणजे प्रतिष्ठा.नावाजलेले असणे म्हणजे प्रतिष्ठा.'शहरातील प्रतिष्ठीत नागरिक'असे आपण
ऐकतच असतो.लोकांना आपण माहित असणे ,लोक आपणास ओळखत असणे प्रतिष्ठा मानली जाते.
प्रतिष्ठा कशी प्राप्त होते ,तीचे मोल किती हा वेगळा
विषय.प्रतिष्ठेची सीमारेषा असते का? अटकेपार झेंडा गाडणारे किंवा सातासमुद्रापार किर्ती असलेले
असेही बिरुद वापरले जाते.एखाद्याचा गुणगौरव
करतांना ,"यांची ओळख करून देण्याची गरज नाही." यांना कोण ओळखत नाही?" असे म्हंटले जाते. किर्तिवंत हे विशेषण खुप वापरले जाते.
"अवघ्या जगाला आपल्या ...ने भूरळ घालणारे." असाही उल्लेख होतो." ज्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले असे.....!
"ज्यांचा या कार्यात सिंहाचा वाटा आहे असे....!"किंवा ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय पर्याय नाही असे सर्वांचे लाडके!'
"अहोरात्र झटून ज्यांनी हे काम तडीस नेले असे आपले सर्वांचे आशास्थान."
"आमचे प्रेरणास्थान" 'ज्यांच्या आशिर्वादाविना
हे काम पूर्ण होऊ शकत नाही असे तुमचे आमचे
सर्वांचे..... भाऊ,दादा,काका,मामा!"
कुठलेही पैसेवाले,सत्तेमधले लोक प्रतिष्ठीत मानले
जातात.कुणी शहराचे नाक असते तर कुणी माथा असते.कुणी 'ढाण्या वाघ तर कुणी बिबट्या असतं.प्रतिष्ठांचे आप्तस्वकिय आपसूकच प्रतिष्ठा मिळवतात,हे अमूकचे तमूक आहेत वगैरे.
पैसेवाल्यांची प्रतिष्ठा पैशाची असते.कंगालेश्वरला
कुणी विचारत नाही.ज्याच्यापासून फायदा त्याला
प्रतिष्ठा लाभते.प्रतिष्ठा म्हणजे स्वार्थी लोकांनी
दिलेले महत्त्व.अनेकांना प्रतिष्ठेमुळे गर्व चढतो,"मला
ओळखत नाही का?" दूसरा कुणी सांगतो ,"हे अमुक अमुक आहेत." प्रतिष्ठेच्या मर्यादा असतात.
सर्वांना सर्व ठिकाणी ती लाभत नसते.लग्नसोहळ्या
मध्ये अमाप खर्च केला की प्रतिष्ठा लाभते."असे लग्न बघितले नाही."असे कुणी म्हणाले की सार्थक
झाल्यासारखे वाटते.
अनेक शाळा, महाविद्यालय प्रतिष्ठीत असतात.
"आमच्या बंड्या अमूक शाळेत आहे." सांगताना
छाती फूगते.
काही पुरस्कार प्रतिष्ठेचे आहेत,काहींची पुरस्कारांने
प्रतिष्ठा वाढते.शोकेसमध्ये दिसतील अशा ठिकाणी
ते मांडले जातात.प्रतिष्ठेची हाव हा एक मानसिक
आजार आहे, परंतु तो लोक वाढीस लावतात.
एखाद्याचा उल्लेख,"अमुक पुरस्कार प्राप्त."असा
केला जातो.राजकारणात देखील ,भोगलेली पदे
मरेपर्यंत किंवा मरणानंतरही साथ सोडत नाहीत.
'माजी', या शब्दांनी घातलेला धुमाकूळ आपण
बघतोच आहोत.आता तर प्रतिष्ठेचा एक नवा फंडा
आला आहे,'भावी..' हुजरे आणि चमचे नेहमीच
हरबऱ्याच्या झाडावर चढवतात व आपली पोळी
भाजून घेतात.
प्रतिष्ठेसाठी केली जाणारी धडपड फार केवीलवाणी
असते.चर्चेत रहाण्यासाठी काहीही उलटसुलट केले
जाते.नावाजणे जेव्हा गरज बनते ,तेव्हा ते पातळी
सोडते.
आपल्या त्यागामुळे,योग्यतेमुळे आपसूकच लाभलेली प्रतिष्ठा महत्त्वाची असते, परंतु त्यासाठी क्लृप्ती किंवा शक्कल लढवून ती मिळवणे केविलवाणा प्रयत्न असतो,कारण लोक सर्व जाणून असतात.
लोक आपल्या फायद्यासाठी' उदोउदो' करतात.त्यास प्रतिष्ठा समजण्याची चूक करु नये.
आपली प्रतिष्ठा कशामुळे आणि कुणामुळे आहे,हेही
तपासले पाहिजे.प्रतिष्ठीत असणे खरेच गरजेचे आहे का? अंहकाराचे ते दूसरे नावच नाही का?खरी प्रतिष्ठा एखाद्याच्या ह्रदयात जागा निर्माण करणे होय.
कधीतरी तपासून बघावे एवढेच!
ना.रा.खराद
8805871976