आठवणी
मला नोकरी मिळाल्याचे पत्र मिळाले आणि माझा आनंद गगनात मावेना.माझे नुकतेच लग्न झाले होते आणि उपजीविकेचे साधनही आता उरले नव्हते.समोर अनेक अडचणी असताना,मी सरळमार्गी चालत होतो.माझ्यासाठी शिक्षकाची नोकरी म्हणजे जीवदान होते.मत्स्योदरी शिक्षण संस्था एक नामांकित संस्था होती, संस्थेचे
अध्यक्ष स्वर्गिय अंकुशराव टोपे साहेब खुप शिस्तबद्ध पद्धतीने संस्था चालवत होते.
माझी प्रथम नेमणूक झाली, त्याठिकाणी लग्नात आलेली भांडी टेंपोत भरुन दाखल झालो.इतर शिक्षकांप्रमाणे मला पगार मिळत नव्हता, त्याबाबत मी मुख्याध्यापकांना विचारले असता, तुम्हाला अजून आर्डर नाही, त्यामुळे पगार मिळणार नाही असे कळाले,मी चिंतेत पडलो.पगार कधी आणि कसा मिळणार मला याविषयी काही माहिती नव्हते, परंतु होईल सर्व ठीक अशी स्वतःची समजूत काढली आणि जोमाने आपले कर्तव्य निभावू लागलो.विद्यार्थ्याकडून दरमहा चार रुपये जमा करुन मला महिन्याकाठी सहाशे रुपये मिळू लागले, त्यामध्ये मी कसाबसा जगू लागलो,काळ बदलेल असा आशावाद सोबतीला होता.
माझ्या स्वभावाप्रमाणे मी वागत होतो.त्याचा परिणाम माझी बदली करण्यात आली .एका नवीन शाळेत गेलो, अधिकृत नेमणूक झाली,बऱ्यापैकी पैसे मिळू लागले.हक्काचे, कष्टाची कमाई सुरू झाली.थोरल्या भावाचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या पाच मुलींचे लग्न हा माझ्यासमोर यक्ष प्रश्न होता.वडिलांना अर्धांगवायूने अंथरुणावर खिळवून ठेवले.माझ्यावर एका खोट्या गुन्ह्यात खटला चालू होता, त्यासाठी कोर्टात जावे लागत असे.घर , जमीन सर्वकाही विकले होते, अशा परिस्थितीत देखील माझे अध्यापन आणि वाचन बंद नव्हते.मला पुस्तकांनी बळ दिले.मला गाणी ऐकायला खूप आवडते,मी रेडिओवर खुप गाणी ऐकायचो , मला त्यामधून खुप आनंद मिळायचा.
माझ्या आर्थिक परिस्थितीची अनेकांनी खिल्ली उडविली, अपमानित केले, ते सर्व मी सहन केले.जगाची खरी ओळख होऊ लागली.
एका अनाथ मुलीशी माझा विवाह झाला होता,आई वडील नसल्याने सर्वकाही मला समजावून घ्यावे लागत होते.आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तेव्हा, सोबतीला कुणी नव्हते, अनेकवेळा अश्रू अनावर झाले तेव्हा ढसाढसा रडलो होतो, तरीही धैर्य सोडत नव्हतो.
अडचणीच्या वेळी कुणी मदत करत नसते, हे कटू सत्य स्वीकारले होते आणि आता जे जगायचे ते स्वतःच्या पायावर जगायचे,असा चंग बांधला होता.
काळाच्या ओघात सर्वकाही बदलले .मी कुणी फार मोठ्या पदावर किंवा आर्थिक उंचीवर नाही, परंतु माझ्यासारख्या कस्पटासमान माणसाला काठावर येण्याइतके सामर्थ्य ज्या संस्थेने दिले त्या संस्थेच्या ऋणाईत मला कायम राहून, स्वर्गिय अंकुशराव टोपे साहेब यांचे पांग फेडायचे आहे.
- ना.रा.खराद
मत्स्योदरी विद्यालय अंबड