इफेक्ट कोरोनाचा सर्वच ठिकाणी दिसून येतो आहे.

                                          इफेक्ट कोरोना
                                                           - ना.रा.खराद
 कोरोना पित्यर्थ सतत बाहेर पडणारी माणसे आता घरात पडून आहेत.सप्ताहात एकदा घरी असले की कसे गोड वाटायचे.आता मात्र खिडकीवाटे डोकावले तरी ,डोकावण्याचे सुख काय असते याचा अनुभव येतो.नेहमी बापाची घरी येण्याची वाट बघणारी पोरं, एकदाचा हा बाप कधी बाहेर जातो याची वाट बघत आहेत.बाहेर संचारबंदी आणि घरातही. 
बोनस मिळाल्यासारख्या सुट्टया पोरं भोगत आहेत. "तुम्ही घरी थांबत नाही," अशी ओरड करणाऱ्या बायका ,"हा मेला बाहेरच असलेला बरा". असे मनातल्या मनात बोलू लागल्या आहेत. बाहेर मात्र, तुम्ही घरी असले की घर
भरल्यासारखे वाटते असे म्हणत असतात.बायकांना जमते हे सर्व!
घरात एक टि.वी. एक रिमोट असते. एक झोपल्याशिवाय दूसऱ्याच्या हातात तो रिमोट येत नाही. सगळ्या मालिका अर्धवट बघण्याची वेळ महिलांवर आली आहे. सर्दी, खोकला,ताप मोठे तापदायक झाले आहेत. कुणी बाधित तर नाही ना ,नेहमी कमीजाने नाक पुसले जायचे.कुठेही ते मोकळे व्हायचे.पाच पन्नास लोकांत नाक शिंकरले जायचे.इतरांच्या रूमालाने ते पुसले जायचे.पण आता आचारसंहिता लागू आहे.
घरात बसून आता अनेकजन तत्वज्ञानी होऊ लागले आहेत. जीवन म्हणजे काय यावर ते चिंतन करू लागले आहेत. संताचे वचने चघळू लागले आहेत.
दिवसा झोपू नये म्हणणारे घरात लोळत आहेत. काहीच न करणे हे काहीही करण्यापेक्षा किती त्रासदायक असते याची प्रचिती त्यांना येत आहे. घरात बसल्याने वाहनांना आराम मिळत आहेत. या काळात अपघातात मरणारी माणसे अजून जिवंत आहेत. एरवी ग्राहकाला आवाज देणारी भाजीवाली,आता ग्राहक तिला आवाज देत आहेत. पोलिसांना हात मोकळा करण्याची संधी मिळत आहे.शिक्षक पोरांच्या कटकटीतून सूटले आणि बायकोच्या कटकटीत सापडले आहेत. "बायकोपेक्षा मुख्याध्यापक बरा ".असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. बसचालक "घरी बस "चालक झाले आहेत. लालपरीचा वियोग ते सहन करत आहेत. घरात असले की उधारी कुणी मागत नाही. बाहेरचे धक्के टळले आहेत. घरात असले की मोबाईलशी खेळता येते.घरात असले की घरच्यांना, "कुठे
असतील "अशी काळजी करण्याची गरज नाही. घरी असले की कळते बायकांना किती कामे असतात." तू घरी काय करते दिवसभर?" हा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. एरवी बाहेर हुंदडणारी पोरं आता बापासमोर पुस्तके
घेऊन बसली आहेत. बाप नावाचा ताप काय असतो त्यांना कळू लागला आहे." गड्या आपली शाळा बरी"असे त्यांना वाटू लागले आहे. 
बाहेरख्याली माणसे गुदमरून गेली आहेत. बोलघेवडी माणसे घरातल्या लोकांना नकोसी झाली आहेत." हा बाहेरच बरा होता ".असे दबक्या आवाजात एकमेंकाशी बोलत आहेत. बाहेर सतत काही तरी चटपटीत खाणारी माणसे घराला खानावळ समजून सारखे काहीतरी खायला मागत आहेत. "खानावळीत जन्मला असता तर बरे झाले असते",अशा शिव्याशाप मनात दिला जात आहे. वरुन तुमच्यामुळे आम्हालाही मिळते असे पालपूदही जोडले जात आहे.
काही अतिगंभीर माणसे चिंताग्रस्त आहेत. एका ठिकाणी बसून आहेत.यांच्यापेक्षा कोरोना बरा! असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. पाहुण्यांची वर्दळ कमी झाली आहे.एरवी एवढ्या तेवढ्या कारणांनी माहेर गाठणारी बायको सासरी निपचित पडून आहे."पोरं शाळेतच बरी."
असे पालकांना वाटू लागले आहे.पोरांनी पालकांच्या नाकी नऊ आणले आहे.एरवी "मास्तरांना काय काम असते?" असा गवगवा करणारी मंडळी,"मास्तर लोकांची कमाल आहे बुवा "असं एकमेकांना बालू लागली आहेत.
सतत बाहेर फिरुन काळवंडून गेलेली माणसे रंगांनी उजळून निघाली आहेत.वृद्धांना तरुणांचा सहवास लाभतो आहे.
माणसे घरात असल्याने इतर पशू पक्षी मुक्तपणे वावरतआहेत.सर्वच माणसे घरात असल्याने चोरांचे धंदे ठप्प
पडले आहेत.घरात असल्याने अनेकांचे वजन वाढले आहे.रोडरोमियोंचे 'बूरे दिन' आले आहेत.
करमणूकीच्या सर्व साधनांचा वापर होत आहे.कुठेतरी अडगळीत पडलेल्या कला नव्या जोमाने समोर येऊ लागल्या आहेत.नव कलाकारांना या कोरोनाने जन्म दिला आहे.पाकिटमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कधीही पुस्तके न वाचणारी माणसे मिळेल ते पुस्तक वाचत आहेत. निश्चित वाचकाची संख्या बळावत आहे. लेखकांचे अच्छे दिन येणार.
आपल्या साहेबाच्या कटकटीतून सगळेच सुटले आहेत.कटकटीशिवाय जीवन कसे असते याचा ते अनुभव घेत आहेत.
गर्दीशिवाय न राहू शकणारे नेते. "गर्दी करु नका" असे कळवळून सांगत आहेत. ही कोरानामय स्थिती आहे.
 .    
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.