- ना.रा.खराद
माणसाला आपल्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तेव्हा तो यशस्वी होतो.
जो जितका जबाबदारीने वागतो, तितका तो कर्तव्यदक्ष समजला जातो.जबाबदारी दिलेली असो की
स्विकारलेली असो,ती पार पाडणे क्रमप्राप्त असते.जबाबदारी छोटी असो की मोठी ती निभावून नेली पाहिजे,नसता बेजबाबदारपणाचा ठपका आपल्यावर बसतो.
कोणतेही काम कुणालातरी करावे लागते किंवा ते इतरांकडून करुन घ्यावे लागते, दोन्ही बाबी आवश्यक असतात.एकाचाही बेजबाबदारपणा हा कार्य नासू शकतो.जबाबदारीची जाणीव असणारी माणसे काहीही झाले तरी आपले काम चोख बजावतात, परंतु जाणीव नसणारी माणसे खुप नुकसान करु शकतात.
कामातील ढिसाळपणा,विवेकहीनता किंवा घिसाडघाई बेजबाबदारपणाच आहे.
कोणत्याही कामासाठी लागणारी बुद्धी, नियोजन,संयम आणि तत्परता असल्याखेरीज कार्य योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी होत नाही.निकृष्ट कामे बेजबाबदारपणाचा परिणाम असते.आपली जबाबदारी काय आहे हे कळण्यासाठी बुद्धी लागते, जाणुनबुजून एखाद्या कामात कुचराई करणं हा कामचुकारपणा आहे, म्हणजे बेजबाबदारपणा आहे.
आपले काम जेव्हा आपण चोखपणे बजावत नसतो, तेव्हा आपण अपयशी तर होतोच, परंतु ते काम आपण करण्यास लायक नाहीत,असाही अर्थ लावला जातो.अनेक मोठमोठी संकटे बेजबाबदारपणामुळे
उद्भवतात.कोणतीही जवाबदारी लहान नसते.ज्यामुळे एखादे मोठे काम नासते किंवा थांबते ती जवाबदारी
लहान कशी असेल, त्यामुळे कुणीही आपली जबाबदारी नाही किंवा ती लहान आहे,असे मूळीच समजू नये.
जवाबदारी एकप्रकारे कर्तव्य असते, ते पार पाडण्याशिवाय पर्याय नसतो.त्यामधील कुचराई कुचकामी ठरते.जवाबदारी एक वसा असतो.तो टाकता येत नाही.जवाबदारी न निभावणे म्हणजे बेजबाबदारपणा.
हा बेजबाबदारपणा बालक,स्री, पुरुष कुणाच्याही ठिकाणी असू शकतो, जगातील बहुतेक अप्रिय घटना घडतात, त्या याच बेजबाबदारपणामुळे.चालढकलपणा, वेळकाढूपणा व निष्काळजीपणा बेजबाबदारपणाचे कारण असते.वेळ न ओळखणे, तत्पर नसणे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे.लक्षात न येणे किंवा लक्ष न देणे.दिलेला शब्द किंवा वेळ न पाळणे बेजबाबदारपणा आहे.
अनेक अपघात यामुळे होतात, अनेक रोगी डाक्टरच्या बेजबाबदारपणामुळे मरण पावतात.अनेक आरोपी पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे पळून जातात किंवा निर्दोष सुटतात, अनेक विद्यार्थी शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे नापास होतात,तर अनेक शिक्षक मुख्याध्यापकांच्या बेजबाबदारपणामुळे वाह्यात होतात. अनेक पालकांच्या बेजबाबदारपणामुळे पाल्य भरकटतात.
कोणतेही काम हे जवाबदारीने पार पाडले जावे, बेजबाबदारपणामुळे नुकसान होते, अडचणी वाढतात.