- ना.रा.खराद
गेली पंधरा महिने कोरोनाकडून जे शिकायला मिळाले, कदाचित प्रचलित गुरुंकडून शिकायला मिळाले नसते. निसर्ग हाच सर्वात श्रेष्ठ गुरू आहे.हे पुन्हा सिद्ध झाले आहे.फक्त त्याच्याकडून शिकण्याची आपली तयारी पाहिजे, शिकले तर काहीही शिकता येते. इतरांचे कौशल्य आपणास कामी येते .आपण जे सहज शिकण्यासारखे आहे, तेही शिकत नाही. स्वावलंबन फक्त पैसा कमावण्यापुरते नसते. आपण सर्व कामे पैशाने करुन घेतो त्यामुळे पैशाचे महत्त्व आणि आपला आळस वाढला.माणसे आयुष्यभर रिकामे बसून राहतील पण काही शिकणार नाहीत.
लहान सहान शेकडों अशी कामे आहेत जी आपण सहज शिकू शकतो.पण ते माझे काम नाही, असे समजून ते आपण टाळतो.
शिवाय इतरांकडून ती कामे करुन घेतली म्हणजे मालकीपणाचा एक वेगळा अहं सुखावतो.
कोरोनाने सर्वांना खुप काही शिकविले. अनेक पुस्तके, भाषणे, किर्तन यातून जे घडू शकले नाही ते 'कोरोना गुरू'करुन दाखवले.
कोरोनाने गर्दी टाळणे शिकवले.लग्न,अत्यंयात्रा ,यात्रा याठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळणे शिकवले.गरजेपुरती माणसे जमली की पुरेशी. प्रतिष्ठेसाठी माणसे जमवणे बंद करण्याचा धडा मिळाला.
दोघांचे लग्न ,दोन हजार लोकं जमवायची काय गरज.कुणी ऐकत नव्हते. अमुकच्या लग्नाला इतके लोक जमले,तमुकच्या अत्यंयात्रेत हजारों लोक होती हि प्रतिष्ठा आता संपुष्टात आली आहे.
यात्रेत होणारी गर्दी, चेंगराचेंगरी, प्रदूषण हे सर्व थांबले आहे. चित्रपट थियटर,तमाशाचे फड आता कालबाह्य झाले पाहिजेत. नेत्यांच्या सभेला होणारी गर्दी ,मोठी प्रतिष्ठा होती आता सभा कायमच्या बंद झाल्या पाहिजेत. नेत्यांची खोटारडी भाषणे ऐकूनजनता पार कंटाळली आहे.
कोरोनाने स्वावलंबन शिकवले.गेली पाच महिने मी स्वतः चे केश स्वतः कापतो आहे. तेही अगदी उत्तम. इस्री तर फारच उत्तम करु लागलो आहे.धुणी भांडी वगळता घरातील सर्व कामे आता उत्तम जमू लागली आहेत.
'होम वर्क' चांगलाच सुरू आहे.कोरोनाने इतरांची गरज कमी केली आहे. ऊठसूट याच्या त्याच्याकडे जाण्याचे खुळ कमी केले आहे. घरात सगळ्यांशी जमवून
घेण्याचे कसब पणाला लागले आहे.
या काळात सुप्त प्रतिभा जागे होऊ लागली
आहे. कच्चे कवी आता परिपक्व होऊ पहात
आहेत. जीवनाचा गंभीरपणे विचार करत अनेकजन तत्वज्ञानी झाले आहेत.
कोरोनाने धर्म हि व्यक्तीगत बाब आहे हे शिकवले आहे. उगीच मंदिरात गर्दी करुन धर्म हा माणसे जमवण्यासाठी असतो हे चूक ठरवले आहे.
कोरोनाने फूकट खाणे चूक आहे हे शिकवले आहे, सर्व प्रकारचे कर्मकांड बंद पाडले आहे.
धार्मिक स्थळी फूकट थाळी खाणे थांबवले आहे.
कोरोनाने भक्तांना त्यांची जागा दाखवून दिली
आहे. मोक्ष वगैरेच्या व्याख्या आता चांगल्या
कळू लागल्या आहेत.
नाकातोंडाचा ज्यांना गर्व होता त्यांना ते झाकावे लागत आहेत. कोरोनाने एकटे राहणे, गप्प बसणे शिकवले आहे.
कदाचित बरेच काही शिकवून कोरोना आपला निरोप घेईल. आपला 'होम वर्क ' तपासण्यासाठी परत कधीतरी येईल!