कुणी समजून घेता का हो?

              कुणी समजून घेता का हो?
                                          - ना.रा.खराद
आपल्या अवतीभवती सगळीकडे फक्त एकच ओरड ऐकू येते, " मला कुणी समजून घेत नाही." आपण प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला एकदा विचारलाच पाहिजे की आपण इतरांना समजून घेतो का? 
आपल्याला इतरांनी समजून घ्यावं अशी प्रत्येकाची इच्छा आणि गरज असते.जेव्हा ही गरज आपण पूर्ण करतो, तेव्हा नक्कीच आपण एक चांगले काम केलेले असते.
इतरांना चूक ठरवण्या अगोदर त्यास अगोदर समजून घेतले पाहिजे.मला कुणी समजून घेत नाही, अशी तक्रार जवळजवळ सर्वांची असते.नात्यामध्ये , मैत्रीमध्ये समजून घेणे खूप महत्त्वाचे असते.
आपण समजावून सांगतो पण समजून घेत नाही.आज माणसाला जर कशाची गरज असेल तर ती इतरांना समजून घेण्याची.
जो पर्यंत इतरांच्या अडचणी, भावना , विचार आपण लक्षात घेत नाही,तो पर्यंत खरे काय ते आपणास समजणारच नाही.
आपण इतरांना समजून घेत नाही म्हणूनच इतर आपल्या
पासून दुरावतात.आपल्याच तोऱ्यात किंवा तऱ्हेने वागणारी माणसे इतरांना बिलकुल समजून घेत नाही.
आजचे अनेक प्रसिद्ध नेते,लेखक, तत्वज्ञानी, चित्रकार,गायक यांना त्यावेळी कुणी समजून घेतलेले नव्हते.
इतरांविषयी सहानुभूती,प्रेम असल्याखेरीज समजून घेणे
शक्य नसते.घरात देखील आई-वडील आपल्या मुलाला
समजून घेणारे नसतील तर त्या मुलाचे मातेरे होईल.
गरीब लोकांच्या अडचणी समजून घेता आल्या पाहिजेत.
अगोदरच त्रस्त लोकांना अधिकचा त्रास होऊ नये ह्याची
काळजी घेतली पाहिजे.
लहान मुल असो की वृद्ध यांना समजून घेता आले पाहिजे.कुणी भोळा असो की अडाणी यांना समजून घेतले पाहिजे.आपण जितके इतरांना समजून घेऊ शकतो,तितके आपण सौजन्यशील व समजदार ठरतो.अनेक वेळा अपमान.राग, उपेक्षा, अन्याय पचवावा
लागतो , फक्त समजून घेता आले पाहिजे.इतरांना व त्यांच्या अडचणींना समजून घेता आले की आपण एक समजूतदार व्यक्ती ठरतो.
शाळेमध्ये शिक्षकांनी तर प्रत्येक मुलाला अगोदर समजून
घेतले पाहिजे.सरसकट उपदेश किंवा शिक्षा कधीच योग्य
नसते.मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी माहिती हवी.मुलांचे भावविश्व उलगडून बघता आले पाहिजे.मुलांच्या पाठीवर
कधीतरी सहानुभूतीची थाप पडली पाहिजे.मुलांना बोलते करुन त्यांना समजून घेता आले पाहिजे.
नवरा-बायको या नात्याने तर एकमेकांना समजून न घेण्याचा चंगच बांधलेला असतो, मात्र दोघेही एकच तक्रार करतात," मला तो किंवा ती समजून घेत नाही."
समजून घेणे माणसाची फार मोठी गरज आहे.जो समजून घेत नाही, त्याच्याविषयी आपलेपणा वाटतो नाही,याउलट समजून घेणारी परकी माणसे देखील आपली वाटू लागतात.
इतरांचे दुःख,अडचणी समजून घेता आल्या तर मानवाच्या अनेक समस्या सुटतील.पिळवणूक, छळवणूक थांबेल.आपल्या समजून घेण्याच्या वृत्तीमुळे
पीडितांना दिलासा मिळेल.मानसिक उद्विग्नता थांबेल.
एकमेकांना समजून घेतले तर आयुष्य सुकर होईल.
                          
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.